Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड खलनायक बनूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात दलीप ताहिल, शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाने दिली खरी ओळख

खलनायक बनूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात दलीप ताहिल, शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाने दिली खरी ओळख

आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेते दलीप ताहिल यांनी चित्रपटसृष्टीत त्यांचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आज एक लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेते म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली आहे. अशातच चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दलीप आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास.

दलीप ताहिल यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९५२ रोजी ताजनगरीमधील आगरा येथे झाला. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात, थिएटरमध्ये आणि टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक वेबसीरिजमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी शेरवूड स्कूल नैनीतालमधून शिक्षण घेतले आहे. शाळेत शिकताना त्यांच्यातील अभिनयाचा किडा बाहेर आला. शाळेत असतानाच ते डान्स आणि नाटकात भाग घेऊ लागले. त्यांना शाळेत असताना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता.

त्यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ते आगरावरून मुंबईला आले. त्यांनी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या अभिनयाचे शिक्षण चालू केले. तसेच सेंट जेवियर कॉलेजमधून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचा अभिनयातील रस वाढला आणि त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांना चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली. त्यांनी १९७४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी ‘अंकुर’ या चित्रपटात काम केले.

या चित्रपटात काम केल्यानंतर बरेच दिवस त्यांच्याकडे काम नव्हते. त्यानंतर १९८० मध्ये त्यांना ‘शान’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली. यानंतर ते नावारूपाला आले. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले परंतु शाहरुख खानच्या ‘बाझीगर’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले होते.

यानंतर त्यांनी आमिर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’, ‘राम लखन’, ‘त्रिदेव’, ‘डर’, ‘इश्क’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘कहो ना प्यार है’, ‘राजा’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

त्यांनी बऱ्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. यासोबतच त्यांनी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पात्र निभावले होते.

त्यांनी अनेक पंजाबी चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी ‘बुनियाद’ या मालिकेत काम केले. तसेच त्यांनी ‘स्वार्ड ऑफ टिपू सुल्तान’ मध्ये देखील काम करून आपल्या अभिनयाची छाप सर्वत्र सोडली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.

हेही नक्की वाचा-
दिल तो पागल है चित्रपटाला 26 वर्ष पुर्ण, यशराज फिल्मने शेअर केला व्हिडिओ
लाडक्या ‘शितली’चा अंदाज तुम्हालाही लावेल वेड; पाहा फोटो

हे देखील वाचा