स्टारकिड असूनही फ्लॉप ठरला फरदीन, कोकिन सेवनामुळे खराब झाले करियर तरीही आहे कोटींची प्रॉपर्टी


बॉलिवूड म्हणजे अशी दुनिया जी नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करते. जो कलाकार काळाच्या प्रवाहात असतो, कॅमेरावर सारखा दिसत असतो त्यालाच आणि आजच्या नवीन नियमानुसार ज्याला सोशल मीडियावर जास्त फॅन फॉलोविंग आहे त्यालाच या झगमगाटी क्षेत्रात जास्त मागणी असते. या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची सुरुवात जरी ठीक झाली असली, तरी त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. मात्र पुढे नशिबाने साथ न दिल्याने अनेक कलाकार या इंडस्ट्रीमधून हळूहळू गायब झाले. यातलेच एक नाव म्हणजे फरदीन खान.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा हँडसम फरदीन खानने गेल्याच महिन्यात त्याचा ३७वा वाढदिवस साजरा केला. ८ मार्च १९७४ ला मुंबईत त्याचा जन्म झाला. फरदीनचे वडील फिरोज खान हे ८०/९० च्या दशकातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते होते. शिवाय त्यांचे घराणे हिंदी सिनेसृष्टीशी विविध बाजूनी देखील जोडलेले होते. फरदीनने त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयात करियर करण्याचे ठरवले.

फरदीनने १९९८ साली आलेल्या आणि फिरोज खान यांनी निर्मित केलेल्या ‘प्रेम अगन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. फरदीनचा हा पहिलाच सिनेमा जोरदार आपटला. सिनेमा जरी फ्लॉप झाला असला तरी त्याला सर्वात्कृष्ट पदार्पणाच्या फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. त्याला या सिनेमाने खूप फॅन फॉलोविंगसुद्धा मिळवून दिली. पहिल्याच सिनेमात मिळालेल्या अपयशाने खचून न जाता त्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली.

फरदीनला यशाची चव चाखता आली ती राम गोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ सिनेमाने. त्याने या सिनेमात प्रभावी अभिनय करत प्रेक्षकांसह समीक्षकांचीही वाहवा मिळवली. सोबतच सिनेमाने चांगला बिजनेस देखील केला. त्यानंतर फरदीनने एका पाठोपाठ एक ‘लव के लिए कुछ भी करेगा’, ‘प्यार तूने कया किया’, ‘हम हो गए आपके’, कितने दूर कितने पास’, ‘ओम जय जगदीश’, ;कूच तुम काहो कूच हम कहे’, ‘ख़ुशी’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले मात्र या सिनेमांना यश मिळाले नाही.

त्यानंतर त्याने २००३ साली पुन्हा राम गोपाल वर्मा यांच्या ‘भूत’ या सिनेमात काम केले आणि हा सिनेमा हिट झाला. याचवर्षी त्याने फिरोज खान यांच्या ‘जानशीन’ सिनेमात काम केले, मात्र या वेळेलाही ही जोडी फ्लॉप ठरली. २००४ साली त्याने गोविंद निहलानी यांच्या ‘देव’ यासिनेमात काम केले, हा सिनेमा खूप गाजला. या चित्रपटामुळे फरदीनने अमिताभ बच्चन, ओम पुरी आदी दिग्गज कलाकारांसोबत काम केले.

फरदीनचा २००५ साली आलेला ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. या सिनेमामुळे त्याने त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे सर्वांना त्याचे कौतुक करायला लावले. मात्र पुन्हा या सिनेमानंतर आलेल्या शादी नं १, एक खिलाडी एक हसीना, प्यारे मोहन, आर्यन, जस्ट मॅरीड आदी चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर २००७ साली तो दिसला साजिद खानच्या ‘हे बेबी’ या सिनेमात. हा चित्रपटदेखील हिट झाला. त्यानंतर २००९ साली आलेला ‘ऑल द बेस्ट’ सिनेमा हा त्याचा शेवटचा हिट सिनेमा होता. २०१० साली आलेला ‘दुल्हा मिल गया’ सिनेमानंतर फरदीन कुठेच दिसला नाही.

फरदीन जेवढा त्याच्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झाला तेवढाच किंबहुना जास्त तो त्याच्या २००१ साली झालेल्या कोकिन कांडामुळे प्रसिद्ध झाला. २००१ साली फरदीनला कोकेन आणि इतर नशेच्या वस्तूंच्या वापरामुळे अटक झाली, आणि त्याचे आधीच हेलकावे खाणारे करियर पूर्ण बुडाले. या संपूर्ण घटनेतून बाहेर येऊन पुन्हा त्याला त्याची इमेज बदलायला बराच वेळ लागला.

चित्रपटांमधून गायब झालेला फरदीनचा काही वर्षांपूर्वी एक फोटो खूप व्हायरल झाला होता. ज्यात तो वाढलेले वजन आणि बेढब शरीरात दिसत होता. फरदीनला ओळखणे देखील मुश्किल झाले होते. एकेकाळी हँडसम असणारा फरदीन खूपच विचित्र दिसत होता. या फोटोवरून फरदीनला खूप ट्रोल देखील करण्यात आले होते. मात्र काही काळाने जेव्हा फरदीन मीडियासमोर आला तेव्हा तो एकदम फिट आणि पूर्वीच्या फरदीनसारखा दिसत होता. त्याच्या या मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे फरदीन आता पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक करणार यावर चर्चा रंगताना दिसत आहे.

फरदीनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने नताशा सोबत डिसेंबर २००५ साली लग्न केले. नताशा ही जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी आहे. नताशाला फरदीनने एका प्रवासादरम्यान फ्लाइटमध्ये प्रपोज केले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी लग्न केले. फरदीन आणि नताशा यांना एक आठ वर्षाची मुलगी दियानी इसाबेल आणि चार वर्षाचा मुलगा अजारियस आहे. नताशा आणि फरदीनला अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना एकत्र पाहिले गेले आहे.

फरदीन जरी अभिनयात फ्लॉप ठरला असला तरी त्याच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे. द रिचेस्ट आणि सेलिब्रिटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार फरदीनकडे २९२ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा केला जातो. मुंबईसोबतच त्याची बंगळुरूमध्ये १०० एकरची जागा आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.