रणधीर कपूरसोबत केली मुख्य अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात; ऋषी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर ठोकला चित्रपटसृष्टीला रामराम


ऐंशीच्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री जिने तिच्या अदाकारीने अक्षरशः सर्वांना वेड लावले होते. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केलेली ही मुलगी पुढे जाऊन एक मोठी स्टार अभिनेत्री बनेल याचा कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल. जी आज 63 वर्षाची झाली आहे, तरीही तिच्या लोकप्रियतेत कणभर देखील फरक पडला नाही. आजही तिचे चाहते तिची एक झलक बघण्यासाठी आतुर असतात. जिच्या सौंदर्याकडे आणि फिटनेसकडे बघून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही अशी बॉलिवूड मधील वन ऍंड ओन्ली नीतू सिंग कपूर.

नीतू गुरुवारी (8 जुलै) त्यांचा 63 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 8 जुलै, 1958 मध्ये दिल्ली येथे झाला होता. त्यांनी केवळ वयाच्या आठव्या वर्षी बेबी सोनिया या नावाने अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी बाल कलाकार म्हणून 1966 मध्ये ‘सूरज’ या चित्रपटात काम केले होते. चला तर मग त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया…

त्यांनी ‘दस लाख’, ‘दो कालिया’, ‘वारीस’, ‘पवित्र पापी’‌ ‘रफू चक्कर’, ‘खेल खेल में’, ‘महाचोर’, ‘दिवार’,’कभी कभी’ यांसारख्या चित्रपटात काम केले होते. नीतू सिंग यांनी 1973 साली एक अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा चित्रपटात काम केले. तो चित्रपट होता ‘रिक्षावाला.’ हा चित्रपट फ्लॉप झाला पण नीतू सिंग हिट झाल्या. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. त्या बॉलिवूडमधील एक स्टार अभिनेत्री झाल्या. त्यानंतर नीतू यांना आयुष्यातील ती संधी मिळाली ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले होते. त्यांना 1973 मध्ये त्या ‘यादों की बारात’ या चित्रपटातील ‘हम दीवाना दिल’ या गाण्यात दिसल्या होत्या. त्या एकाच गाण्याने त्यांना संपूर्ण देशात ओळख निर्माण झाली.

नीतू सिंग यांनी जवळपास 50 पेक्षाही अधिक चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. यानंतर त्यांच्या आयुष्यात ऋषी कपूर आले. त्या दोघांनी जवळपास 12 चित्रपटात एकत्र काम केले. त्यांच्या प्रेमात अनेक चढ-उतार आले पण शेवटी त्यांनी लग्न केले. पडद्यावर त्यांची जोडी सर्वांनाच खूप आवडायची.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची पहिली भेट ‘बॉबी’ या चित्रपटाच्या शूटिंगवर झाली होती. त्यावेळी नीतू या कोणत्यातरी वेगळ्या चित्रपटाची देखील शूटिंग करत होत्या. असं म्हणतात की, नीतू सिंग यांचा साधेपणा ऋषी कपूर यांना खूप आवडला होता. त्यानंतर त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या शूटिंगवर ऋषी कपूर हे नीतू सिंग यांना खूप त्रास द्यायचे त्यामुळे नीतू सिंग यांना ते आवडत नव्हते. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ऋषी कपूर हे परदेशात निघून गेले होते, तेव्हा त्यांनी नीतू सिंग यांना एक पत्र लिहिले होते की, त्यांची खूप आठवण येत आहे. यानंतर नीतू सिंग यांना देखील ऋषी कपूर आवडायला लागले होते. त्यानंतर त्या दोघांनी 22 फेब्रुवारी, 1980 रोजी लग्न केले. त्यावेळी नीतू केवळ 21 वर्षांच्या होत्या.

ऋषी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करणे सोडून दिले होते. त्यावेळी कपूर घराण्याचा असा नियम होता की, त्यांच्या घरातील मुली आणि सूना चित्रपटात काम करत नाही. त्यावेळी अशी बातमी पसरली होती की, नीतू सिंग यांनी जबरदस्तीने अभिनय क्षेत्र सोडले आहे. परंतु त्यांनी त्यावेळी खुलासा केला होता की, अभिनय सोडण्याचा निर्णय या सर्वस्वी त्यांचा होता, त्यांच्यावर कोणीही दबाव आणला नव्हता.

त्यानंतर 26 वर्षांनी नीतू सिंग पुन्हा चित्रपटसृष्टीत आल्या आणि त्यांनी ‘लव्ह आज कल’, ‘दो दूनी चार’ आणि ‘बेशरम’ यांसारख्या चित्रपटात काम केले. ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर एकट्याच राहत होत्या. कधीतरी त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आणि मुलगा रणबीर कपूर त्यांच्याकडे येत असायचे. नुकतेच काही दिवसांपूर्वी नीतू सिंग जेव्हा एका रियॅलिटी शोमध्ये गेल्या होत्या, तेव्हा त्या त्यांच्या पतीची आठवण काढत रडत होत्या. त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

मागील काही दिवसांपूर्वी नीतू सिंग या ‘इंडियन आयडल 12’ च्या मंचावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, “ऋषी कपूर आणि त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले होते. इतरांमध्ये होते अगदी तसेच. परंतु तरीही त्यांनी एकत्र चित्रपटात काम केले होते. ‘झुठा कही का’ या गाण्याचे चित्रीकरण करताना ऋषी कपूर तेथे नव्हते. त्यामुळे शूटिगला चार दिवस लागले होते. आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. परंतु जेव्हा आम्ही पडद्यावर यायचो तेव्हा लोकांना असे वाटायचे की, आमच्यात खूप प्रेम आहे. जसं की काही झालंच नाही.”

आज नीतू 63 वर्षाच्या झाल्या आहेत पण त्यांच्या फिटनेसकडे आणि सौंदर्याकडे पाहून कोणीही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर

-वाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’


Leave A Reply

Your email address will not be published.