Friday, April 19, 2024

वाढदिवस स्पेशल: राजकुमारी ते ‘चक दे’तील प्रीती सबरवाल, असा आहे कोल्हापुरच्या सागरीका घाटगेचा प्रवास

चक दे गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सागरिका घाटगे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ८ जानेवारी १९८६ ला महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे तिचा जन्म झाला. सागरिका शिकत असतानाच तिला जाहिराती आणि चित्रपटाच्या ऑफर येत होत्या. मात्र तिच्या वडिलांनी आधी सागरिकाला शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते.

सागरिकाने २००७ साली आलेल्या ‘चक दे इंडिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिने प्रीती सबरवाल या हॉकीपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री या विभागात स्क्रीन पुरस्कार आणि लॉयन्स गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सागरिकाने फॉक्स, मिले ना मिले हम, रश, इरादा या हिंदी सिनेमांसोबतच दिलदारीयान या पंजाबी आणि प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमातही काम केले.

खूपच कमी लोकांना माहित असेल की सागरिका एका राजघराण्याची राजकुमारी आहे. हो सागरिकाची आजी सीता राजे घाटगे ह्या इंदोरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या होत्या. तर पणजोबा कर्नल एफडी घाटगे यांचे कोल्हापूरजवळच्या कागल येथील शाही परिवाराशी संबंध होते. सागरीकाचे वडील विजयेंद्र घाटगे हे इंदोरच्या शाही घराण्याचे कुलदीपक आहे. शिवाय विजयेंद्र हे हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते देखील आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहेत.

सागरिकाने २०१७ साली क्रिकेटर झहीर खान सोबत लग्न केले. या दोघांची लव्हस्टोरी खूपच सुंदर आहे. तसे पाहिले तर क्रिकेट आणि बॉलिवूड याचे खूप जुने नाते आहे. अगदी शर्मिला टागोर, नवाब पटौदी यांच्यापासून ते आताच्या विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यापर्यंत अनेक सुंदर जोड्या या दोन्ही क्षेत्रात तयार झाल्या. या दोघांची भेट ही एका कॉमन मित्रामुळे झाली. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या आणि मग ते प्रेमात पडले.

सागरिका आणि झहीरने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मग लग्न करायचा निर्णय घेतला. युवराज सिंग आणि हेजलच्या लग्नात या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहण्यात आले होते. झहीरला पाठिंबा देण्यासाठी सागरिका अनेकदा क्रिकेटच्या सामन्यांना देखील गेली होती. दोघांनी एप्रिल २०१७ मध्ये सोशल मीडियावर त्यांनी साखरपुडा केल्याची माहिती दिली. त्यानंतर नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांनी अगदी छोटेखानी सोहळ्यात लग्न केले.

सागरिकाने चित्रपटांसोबतच ‘बॉस’ या वेबसिरीज मधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले आहे. शिवाय तीने खतरो के खिलाडी या रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून देखील सहभाग घेतला होतो.

हे देखील वाचा