Friday, April 19, 2024

लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

गायक हरिहरन यांच्या आवाजाची जादू पूर्वीप्रमाणेच कायम आहे. त्यांनी आपल्या आवाजाने प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श केला आहे. मग ते ‘बॉम्बे’ चित्रपटाचे ‘तू ही रे तू ही रे’ गाणे असो किंवा काजोल आणि प्रभुदेवावर चित्रित ‘चंदा रे चंदा रे’ हे गाणे असो, त्यांनी सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या आवाजाने प्रभावित केले आहे. या प्रतिभावान गायकाचा आज वाढदिवस आहे. हरिहरन यांचा जन्म 3 एप्रिल 1955 रोजी मुंबईतील एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांना संगीताचा मोठा वारसा लाभला होता. म्हणून त्यांना लहानपणापासूनच संगीताचे धडे मिळत गेले. ते दिवसाला सुमारे 13 तास रियाझ करत असायचे.

हरिहरन यांनी हिंदीव्यतिरिक्त मल्याळम, तेलगू, कन्नड, भोजपुरी आणि मराठी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 1992 मध्ये त्यांनी एआर रहमानसोबत गाणे गायला सुरू केले आणि तेव्हापासून ते एक सुप्रसिद्ध नाव बनले. त्यांनी ‘गमन’ चित्रपटातील ‘अजीब सानेहा मुझ पर गुजर गया यारों’ या गाण्याद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले होते.

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल हरिहरन यांना पद्मश्री आणि दोन राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. त्यांनी कर्नाटकी, हिंदुस्थानी क्लासिकल, गझल ते पॉप आणि बॉलिवूडमधील बरीच गाणी गायली आहेत.

तरुण कलाकार आणि गायकांनी इथे लक्ष दिले पाहिजे, ज्यांना लवकरात लवकर लोकप्रिय व्हायचे आहे. हरिहरन लोकप्रिय आणि यशस्वी झाल्यानंतरही तासन्तास संगीताचा सराव करत असे. ते दिवसाला 13 तास सराव करायचे. त्यांनी यामागचे कारणही सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, जीवनात संघर्ष करणे का महत्त्वाचे आहे? ते म्हणतात की, “स्ट्रगल केल्यामुळे जीवनाच्या भावाची समज वाढते, जी कलेच्या दृष्टीकोनातून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.”

हरिहरन त्यांच्यापेक्षा मोठ्या लोकांकडून शिकण्याची कोणतीही संधी सोडत नसे. यामुळे, संगीताच्या जगात त्यांनी स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, जेव्हा ते पहिल्यांदा गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत स्टेजवर गात होते, तेव्हा त्यांनी हरिहरन यांना एक खास धडा दिला होता. हा किस्सा आठवत ते म्हणाले, “मी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच बंगालच्या एका शोमध्ये गात होतो. हे गाणे होते ‘ये रात भीगी भीगी.’ स्टेजवर जाण्यापूर्वी लतादीदी म्हणाल्या, हरी पहिल्यांदा गाणे गात आहेस, तर जास्त वर आणि प्रेक्षकांकडे बघू नकोस. जेव्हा कोणीतरी म्हणतो की वर बघू नका, तेव्हा आपण त्याच गोष्टीसाठी उत्साहित असतो.”

ते पुढे म्हणाले, “त्यांनी मला सांगूनही मी ऐकले नाही. त्याठिकाणी दहा लाखाहून अधिक लोक बसले होते. इतक्या लोकांना प्रथमच एकत्र पाहून काही क्षणांसाठी माझे लक्ष विचलीत झाले. मग अंतरा सुरू होताच माझ्याकडून चूक झाली. 2 मिनिटांनंतर जेव्हा मी दीदींकडे पाहिले, तेव्हा मी प्रेक्षकांकडे का पाहिले हे पाहून त्या हसत होत्या.”

हे देखील वाचा