देशभरात कोरोना विषाणूचा प्रभाव पहिल्यापेक्षा थोडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. पण कमी झाला आहे, याचा अर्थ असा नाही की कोरोना संपला आहे. हा प्राणघातक विषाणू अजूनही अनेकांच्या प्रियजनांना त्यांच्यापासून कायमचं लांब करत आहे. अलीकडेच, प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम याने या व्हायरसमुळे त्याचे पालक गमावले आहेत. भुवन बामने स्वतः त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना ही दु: खाची बातमी दिली आहे.
भुवन बामने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने पालकांसोबतचे त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना भुवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कोव्हिडमुळे मी माझ्या दोन्ही लाइफलाईन गमावल्या. आई आणि बाबांशिवाय काहीही पूर्वीसारखे होणार नाही. एका महिन्यात सर्व काही विस्कटलं आहे. घर, स्वप्ने, सर्व काही.”
भुवनने पुढे लिहिले की, “माझ्या जवळ आई नाही, माझ्या जवळ वडीलही नाहीत. आता मला सुरुवातीपासूनच जगायला शिकावे लागेल. इच्छा नाहीये. मी एक चांगला मुलगा नव्हतो का? मी त्यांना वाचवण्यासाठी सर्व काही केले नाही का? आता मला या प्रश्नांसोबत जगावे लागेल. त्यांना पुन्हा पाहण्यासाठी मी वाट बघू शकत नाही. मी प्रार्थना करतो की तो दिवस लवकरच येईल.”
भुवन बामच्या या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी आणि त्याचे मित्र कमेंट करून त्याला दिलासा देत आहेत. राजकुमार राव, ताहिरा कश्यप, आशिष चंचलानी, कॅरी मिनाटी, मुकेश छाबरा यांनीही भुवनच्या या पोस्टवर कमेंट करून दुःख व्यक्त केले आहे. सर्वजण भुवनला अशा वेळी धैर्य राखण्यास सांगत आहेत.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भुवन बामलाही कोरोनाची लागण झाली होती. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले होते की, “गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब होत आहे. टेस्टचा रिपोर्ट आला आहे आणि मला कोव्हिड-१९ ची लागण झाली आहे.”
भुवन बामबद्दल बोलायचे झाले, तर तो एक प्रसिद्ध यू ट्यूबर आहे. त्याला ‘बीबी की वाईन्स’ म्हणून ओळखले जाते. भुवन शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ बनवून चाहत्यांचे खूप मनोरंजन करत असतो. मात्र दुसऱ्यांना हसवणारा भुवन आता स्वतः दुःखाच्या अंधारात लोटला गेला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-