Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड गुलशन कुमार हत्याकांडाबाबत २४ वर्षानंतर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; आरोपीची ‘ही’ शिक्षा कायम

गुलशन कुमार हत्याकांडाबाबत २४ वर्षानंतर मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; आरोपीची ‘ही’ शिक्षा कायम

देशातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी म्हणून ‘टी- सीरिज’ला ओळखले जाते. या म्युझिक कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गुलशन यांच्या हत्याकांडाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला आहे. (Bombay HC Pronounce Verdict In Director Gulshan Kumar Murder Case)

न्यायालयाने आरोपी रऊफ मर्चंटची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाने गुलशन यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी रमेश तोरानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. १२ ऑगस्ट, १९९७ रोजी मुंबईच्या जुहू येथील जीतनगर परिसरात गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली होती. जवळपास २४ वर्षांनंतर या प्रकरणावर न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला आहे, ज्याची सर्वजण दीर्घकाळापासून वाट पाहत होते.

न्यायमूर्ती जाधव आणि बोरकर यांच्या खंडपीठाने गुलशन कुमार हत्याकांडाबाबत निर्णय जाहीर केला. उच्च न्यायालयात एकूण चार याचिका नोंदवण्यात आल्या होत्या. त्यातील तीन याचिका हत्यामध्ये सामील असलेल्या रऊफ मर्चंट, राकेश खाओकरविरुद्ध आहेत. दुसरीकडे एक याचिका महाराष्ट्र शासनाची होती. ही याचिका बॉलिवूड निर्माते रमेश तोरानी यांची निर्दोष मुक्तता करण्याबाबत होती. त्यांच्यावर हत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप होता, ज्यामधून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने इतर आरोपींच्या याचिकेवर अंशत: सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाची सुनावणी करत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, रऊफ मर्चंट हा पॅरोलवर बांगलादेशला पळून गेला होता, त्यामुळ तो कोणत्याही उदारतेचा हकदार नाहीये.

खरं तर, मर्चंटला गुलशन कुमार हत्याकांडामध्ये न्यायालयाने दोषी ठरवले होते. एप्रिल, २००२ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सन २००९ मध्ये त्याला आजारी असलेल्या आईला भेटण्यासाठी पॅरोल (कैद्याची विशिष्ट मुदतीकरता केलेली सशर्त मुक्तता) मिळाली होती. यादरम्यान तो बांगलादेशला पळून गेला होता. तरीही नंतर त्याला बांगलादेश पोलिसांनी बनावट पासपोर्टच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. मर्चंटला बांगलादेशमध्ये अटक केल्यानंतर, आधी गाझीपूरच्या काशिमपूर तुरुंगात ठेवले होते.

‘टी- सीरिज’चे संस्थापक गुलशन कुमार हे १२ ऑगस्ट, १९९७ जीतनगर येथील जीतेश्वर महादेव मंदिरात सकाळी ८ वाजता गेले होते. त्यावेळी त्यांना तब्बल १६ गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

गुलशन कुमार यांची ‘टी- सीरिज’ ही कंपनी सध्या त्यांचा मुलगा भूषण कुमार सांभाळतो. तो या कंपनीचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. याव्यतिरिक्त गुलशन यांना दोन मुलीही आहेत. त्यांचे नाव तुलसी कुमार आणि खुशाली कुमार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा