Sunday, May 19, 2024

‘त्या’ वादग्रस्त ट्वीटमुळे राम गोपाल वर्मा सापडले अडचणीत, पोलिसात गुन्हा दाखल

सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटमुळे त्यांच्याविरुद्ध हजरतगंज कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी उभ्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एक वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये असभ्य शब्द वापरून टिप्पणी केली होती, ज्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. या प्रकरणी अलीगंज येथील कुर्सी रोड येथील रहिवासी मनोज कुमार सिंग यांनी हजरतगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली, ज्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, पोलिस अधिकारी बी प्रसाद राव यांनी सांगितले की, “आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे, जी आम्ही कायदेशीर मतासाठी पाठवली आहे. कायदेशीर अभिप्राय मिळाल्यानंतर आम्ही राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करू.”

राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट
राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट (Ram Gopal Varma Tweet) केले होते की, “जर द्रौपदी राष्ट्रपती असेल, तर पांडव कोण आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत?” भाजप नेत्याने हे ट्वीट पुरावा म्हणून पोलिसांकडे सोपवले आहे.

राम गोपाल वर्मा यांची कारकीर्द
राम गोपाल वर्मा हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते आहेत. ७ एप्रिल, १९६२ रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या राम गोपाल वर्मा हे तेलुगू सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्येही काम करत आहेत. वर्मा हे बॉलिवूडमधील उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक भारतीय आणि जागतिक स्तरावरील पुरस्कार जिंकले आहेत. त्यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ‘सत्या’, ‘सरकार’ आणि ‘रक्तचरित्र’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा