आपल्या देशात सर्वात जास्त पैसा कररूपाने जर कोणत्या उद्योगातून जात असेल तर तो आहे चित्रपट उद्योग! अब्जावधींची उलाढाल या चित्रपट उद्योगातून होत असते. अशात चित्रपट सृष्टीतील कलाकार असतात जे कोटींमध्ये मानधनदेखील घेतात आणि कोटींमध्येच सरकारला करदेखील देतात. शाहरुख, सलमान, अमिताभ, अक्षय, आमिर या आणि अशा काही बड्या कलाकारांकडून सरकारला कररूपात किती मोठी रक्कम जात असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. यात आता आणखीन एका नव्या कलाकाराची भर पडली आहे. ज्याचं नाव आहे कपिल शर्मा. होय कपिल शर्मा सुद्धा प्रामाणिकपणे भारत सरकारला कर देतो आणि त्याचं राष्ट्रीय कर्तव्यदेखील बजावतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कपिल नेमकी किती रक्कम ही कररूपात भरत असेल? चला तर मग आज आपण याचबद्दल जाणून घेऊयात.
कपिल शर्मा हा सध्याच्या घडीला विनोदाचा बादशहा आहे असं म्हटल्यास कदाचित अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने घरा घरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विनोदाबरोबरच कपिलला निवेदक आणि गायक म्हणूनही ओळखलं जातं. इतकंच नाही तर कपिलने फोर्ब्स सेलिब्रिटीच्या यादीमध्ये पहिल्या १०० लोकांमध्येही स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. लोकांना हसवण्याची अद्भुत कला असलेला कपिल चित्रपट तसेच जाहिरातींमधूनही काम करतो. मात्र, सरकारला कर देण्याच्या बाबतीत कपिल कोणत्याही सुपरस्टारपेक्षा मागे नाही. कपिल नेमका किती कर भरतो याबद्दल त्याने स्वतःच त्याच्या शो मध्ये एकदिवस खुलासा केला होता.
कपिलने ‘द कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ शोद्वारे प्रेक्षकांना भरपूर हसवलं आणि आता तो ‘द कपिल शर्मा शो’ सह लोकांचं अगदी त्याच प्रतीचं मनोरंजन करतो. या शो मध्ये एक दिवस माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन पाहुणी म्हणून आली होती. या कालावधीत कपिलने एका वर्षामध्ये सुमारे १५ कोटींचा कर भरल्याचं उघड केलं होतं. कपिल सोबतच असंही म्हणाला होता की, आपल्या देशाच्या विकासासाठी आयकर म्हणजेच इनकम टॅक्स हा भरला पाहिजे.
विशेष म्हणजे ऐश्वर्याबरोबर गंमतीशीर विनोद करताना कपिलने स्वत:ला एक गरीब व्यक्ती म्हणून संबोधलं होतं. कपिलच्या या विधानावर नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले होते की, ‘हा एका वर्षामध्ये तब्बल १२ कोटी रुपये कर भरतो आणि स्वत:ला गरीब म्हणतो.’ त्याच वेळी कपिलने त्यांची चूक दुरुस्त करताना म्हटलं होतं की, ‘मी १२ नव्हे तर १५ कोटी रुपये कर भरतो, देशाच्या प्रगतीसाठी कर भरणे आवश्यक आहे’. कपिलच्या या खुलास्यानंतर चाहते हसले तसेच आश्चर्यचकितही झाले.
जरी कपिल आज इतकी मोठी रक्कम कररूपात भरत असला तरी महत्त्वाची बाब म्हणजे कपिल शर्मा एकेकाळी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील पोलिसात होते. कपिलला सुरुवातीपासूनच विनोदामध्ये रस होता. अशा परिस्थितीत तो आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लाफ्टर चॅलेंज’मध्ये सहभागी झाला होता. इतकंच काय या शोमुळे कपिलने बरीच प्रसिद्धी मिळविली आणि त्यानंतर त्याला ‘कॉमेडी सर्कस’ मध्ये काम मिळालं. कॉमेडी सर्कसमध्ये देखील कपिलने अपार यश मिळवल्यावर स्वत: चा ‘द कपिल शर्मा शो’ शो सुरू केला ज्यात सेलेब्स त्याच्या शोमध्ये मुलाखत देण्यासाठी येतात. कपिलचा हा शो चाहत्यांना प्रचंड आवडतो. बॉलिवूड स्टार्सशिवाय कपिलच्या शोमध्ये आजपर्यंत, हॉलिवूड स्टार्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटरही मुलाखतीसाठी येऊन गेले आहेत. कपिल ने हे त्याचं सारं यश त्याच्या अपार मेहनतीमुळे आणि टॅलेंटमुळे कमावलं आहे.










