Friday, July 5, 2024

‘ओ अंटावा’ गाण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफरने पुढे ढकलली होती सर्जरीची तारीख, वाचा हिट गाण्यामागील स्टोरी

अल्लू अर्जुन आणि समंथा रुथ प्रभूच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. चित्रपटाच्या यशात सर्वात मोठा वाटा या चित्रपटातील ‘ओ अंटावा’ या प्रसिद्ध गाण्याचाही होता. सध्या सर्वत्र हे गाणे तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर सगळीकडे रील्स सुद्धा तयार होत आहेत. या गाण्याच्या निर्मितीची कथाही अशीच रंजक आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी याबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंटावा’ (O Antava) गाण्याचीच चर्चा सुरू आहे. या गाण्याने सर्वांना अक्षरश: वेड लावले आहे. या गाण्यानेच या चित्रपटालाही भरभरून यश मिळवून दिले आहे. या गाण्यासोबतच सर्वात जास्त चर्चा होतेय ती अल्लू अर्जुन आणि समंथाच्या अप्रतिम डान्सची. या डान्सच्या स्टेपने सगळ्यांनाच वेड लावले होते. त्यामुळेच या चित्रपटाच्या यशात या गाण्याचाही मोलाचा वाटा होता असच म्हणावं लागेल. या गाण्याचे कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. याबाबत त्यांनी अल्लू आणि समंथाच्या सरावाविषयी अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.

एका मुलाखतीत बोलताना गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांनी सांगितले की, “चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्याआधी २, ३ तारखेला मला अल्लू अर्जुनचा कॉल आला आणि या एक गाणे तयार करायचे असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी माझ्या डोळ्याची सर्जरी करायची असल्याने मी त्यांना खूप उशिरा कॉल केल्याचे सांगत त्यांना नकार दिला. मात्र, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने डॉक्टरांना सांगून माझ्या सर्जरीची तारीख पुढे ढकलल्याने मी हे गाणे करण्यास होकार दिला. यावेळी मी पहिल्यांंदाच समंथाला कोरिओग्राफ केले आहे.” मात्र, दोघांनीही अवघ्या दोन दिवसात हा डान्स केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या मुलाखतीत त्यांनी समंथासोबत पहिल्यांदा काम केल्याचा अनुभवही सांगितला. यावेळी ते म्हणाले की, “समंथा खूपच निराश होती. कारण चित्रपटात हे गाणे टाकण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला. या गाण्याचे दिग्दर्शन मी करणार आहे हे सुद्धा तिला माहित नव्हते. कदाचित हे गाणे दुसरेच कोणीतरी शिकवणार होते. मात्र, अल्लू अर्जुनने मला हे गाणे करण्याची विनंती केली. सोबतच या गाण्यात काही मादक मूव्हजही टाकण्यास सांगितले होते.”

या मादक आणि भडक दृश्यांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, अशी दृश्ये अनेक प्रकारची असतात. यामध्ये जास्त अंगप्रदर्शनच करावं असं काही नसतं. हे सर्व भाग कलाकाराच्या ऍटिट्यूडवर अवलंबून असतात. त्यामुळे अल्लू आणि समंथाने या गाण्यात जोरदार ऍटिट्यूड दाखवला आहे, यामुळेच हे गाणे लोकप्रिय ठरल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-

हे देखील वाचा