दादा कोंडके म्हणजे मराठी मनोरंजनसृष्टीला पडलेले एक सुंदर आणि हवेहवेसे स्वप्न. मराठी सिनेसृष्टीवर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवणारे आणि विनोदाचे खरे बादशाह किंबहुना विनोदाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे दादा कोंडके हे सर्वांसाठीच आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आज (8 ऑगस्ट) दादा कोंडके यांची जयंती आहे. आजच्याच दिवशी 1998 साली दादांनी या जगाचा निरोप घेतला आणि मनोरंजनसविश्वाला पोरके केले. आज दादा कोंडके हे नाव जरी उच्चारले तरी चेहऱ्यावर एक खोडकर हसू आल्याशिवाय राहत नाही.
कोणत्याही पिढीतील व्यक्ती असली तरी तिला दादा कोंडके (Dada Kondke) हे माहित नसेल असे होतच नाही. दादा यांचा अभिनय तर प्रभावी होताच मात्र त्यांच्या अभिनयाची सर्वात मोठी जमेची बाजू होती त्यांची जबरदस्त टायमिंग असणारी संवादफेक. त्यांची संवादफेक, बोलण्याची कला आणि नजरेत भरणारे व्यक्तिमत्व त्यांना नेहमीच इतरांपेक्षा वेगळे करायचे. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. फक्त अभिनयच नाही तर ते उत्तम दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते. त्यांनी मराठीसोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
दादा कोंडके यांचा जन्म खंडेराव कोंडके आणि सखुबाई कोंडके यांच्या घरी 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईत झाला. गोकुळाष्टमीच्या दिवशी दादांचा जन्म झाल्याने त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. पुढे अचानक त्यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले आणि दादांवर अगदी कमी वयात घरही जबाबदारी आली. घर चालवण्यासाठी त्यांनी ‘अपना बाजार’ मध्ये साठ रुपये पगारावर काम करण्यास सुरुवात केली. हे काम करत असतानाच दादा सेवादलाच्या बँडमध्ये देखील काम करू लागले. दादा काम करत असले तरी त्यांचे छंद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ते त्यांना मिळालेल्या वेळात गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी लिहिणे आणि त्यांना चाली लावणे आदी कामं करायचे. पुढे सेवादलात असताना त्यांची भेट दिग्गज अभिनेते निळू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली, आणि सेवादलाच्या नाटकांमध्ये दादा छोटी-छोटी कामे करू लागले. दादांना त्यांच्या बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे परिसरातील लोकं ‘दादा’ म्हणू लागले आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली.
वसंत सबनीस यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यामुळे दादा कोंडके एक अभिनेता म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आले. या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात 1500 हून अधिक प्रयोग झाले आणि दादा मोठे नट म्हणून उदयास आले. दादांनी ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून माघार घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. पुढे 1069साली भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे दादांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हटके आणि द्विअर्थी संवाद फेक हे दादांचे मुख्य वैशिट्य होते. पुढे हीच त्यांची ओळख बनली आणि प्रेक्षकांच्या मानवर त्यांनी राज्य करण्यास सुरुवात केली. दादांच्या चित्रपटाची रसिक चातकासारखी वाट बघायचे.
पुढे दादांनी ‘सोंगाडया’ या त्यांच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. हा सिनेमा 1971साली प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळीचा एक किस्सा आजही सर्वांच्या लक्षात असेल. अनेकदा या किस्स्याबद्दल आपण दिग्गज लोकांकडून ऐकले असेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी दादा कोंडकेंनी कोहिनुर चित्रपटगृहाची ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवली होती मात्र असे असूनही चित्रपटगृहाच्या मालकांना सुपरस्टार देव आनंद यांचा “तीन देवीया” सिनेमा प्रदर्शित करायचा होता. जेव्हा हे दादांना समजले तेव्हा त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची भेट घेत त्यांना विनंती करत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर शिवसैनिकांनी कोहिनुर चित्रपटगृहासमोर निदर्शने केली. त्यानंतर कोहिनूरमध्ये दादांचा ’सोंगाडया’ प्रदर्शित झाला आणि तुफान यशस्वी देखील झाला. या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून सिनेमागृहाच्या मालकांनी देव आनंद यांचा ‘तेरे मेरे सपने’ खाली उतरवला आणि सोंगाड्या पुन्हा लावला. संपूर्ण महाराष्ट्राने ‘सोंगाड्या’ला अमाप प्रेम दिले. लोकांचा हा न भूतो अन भविष्यती असा प्रतिसाद पाहून दादा देखील भारावून गेले. त्यांनी लगेच त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली.
पुढे 1972 साली दादांचा ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर शाब्दिक पब्लिसिटी होत होती, की खुद्द शो मॅन राज कपूर यांनी त्याचा धसका घेतला आणि ऋषी कपूर यांचा पहिला सिनेमा असलेल्या ‘बॉबी’ सिनेमाचे प्रदसरहून पुढे ढककले. ‘बॉबी’ तब्ब्ल पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. माध्यमातील माहितीनुसार ‘बॉबी’ प्रदर्शित करताना राज कपूर यांनी सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती देखील केली होती. दादांना हिंदी सिनेसृष्टी नेहमीच पाण्यात पाहायची कारण दादांच्या चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटांना चित्रपटगृह मिळायचे नाही. त्यामुळे याचा परिणाम हिंदी चित्रपटांच्या व्यायसायावर व्हायचा.
‘सोंगाड्या’ सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये बाळासाहेबांनी केलेली मदत दादा कधीच विसरले नाही. त्यानंतर ते बाळासाहेबांच्या जवळपास सर्वच सभांना उपस्थित राहुन भाषणे देत. दादांवर लोकांचे जिवापाड प्रेम असल्यामुळे त्या सभांना प्रचंड गर्दी देखील होत असे. निवडणुकीच्या प्रचाराची भाषणे करताना दादा विरोधी पक्षाचा त्यांच्या खास शैलीत चांगलाच समाचार घ्यायचे. आजही दादांची जुनी प्रचार सभेतील भाषणे आवर्जून ऐकली जातात.
दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी ती कमाल करून दाखवली जी अजूनपर्यंत कोणत्याही अभिनेत्याला करता आली नाही. दादांचे सलग नऊ चित्रपट हे पंचवीस आठवडे सुपरहिट ठरले होते. एवढे चित्रपट सलग सुपरहिट होणे हे चित्रपट सृष्टीतील एक नवीन रेकॉर्ड होते जे आजही अबाधित आहे. आज पर्यंत कोणताही निर्माता या रेकॉर्डच्या आसपास देखील पोहोचू शकला नाही. दादा हे खरोखरच बहुआयामी व्यक्तिमत्व होते. उषा चव्हाण या अभिनेत्रीने दादांसोबत जास्तीत जास्त चित्रपट केले. द्विअर्थी विनोद आणि चित्रपटातील नायिकेशी प्रमाणाबाहेर केलेली लगट या कारणांमुळे सेन्सॉर बोर्ड आणि दादा यांच्यातील वाद हे नित्याचे समीकरण बनून गेले होते.
राम राम गंगाराम, आगे की सोच, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, पळवा पळवी, पांडु हवालदार, आली अंगावर, मुका घ्या मुका, एकटा जीव सदाशिव, येऊ का घरात? , सासरचे धोतर, तुमचं आमचं जमलं, तेरे मेरे बीच में, खोल दे मेरी जुबान, गनिमी कावा, तांबडी माती, सोंगाडया, आंधळा मारतो डोळा, बोट लावीन तिथे गुदगुल्या. 1975 मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी अशोक सराफ या नव्या उमेदीच्या कलाकाराला संधी दिली. अशोक सर्फ यांची कारकीर्द उभी करण्यामध्ये दादांचा मोलाचा वाटा होता.
दादांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी नलिनी कोंडके यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि अंतर्गत वादाने त्यांनी घटस्फोट घेतला. पुढे दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटातील अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याबरोबर दादांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते, मात्र दादांनी यावर कधीच भाष्य केले नाही. दादांचा नलिनी यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर दादा आणि उषा चव्हाण हे लग्न करणार असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरल्या. मात्र त्या शेवट्पर्यंत फक्त अफवाच राहिल्या.
दादांचा 14 मार्च 1998 रोजी पहाटे 3.30 ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत्यूनंतरही दादा सतत वादांमध्ये राहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवरून आणि वारसाहक्कावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दादांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांच्या संपूर्ण संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन करायला सांगितले होते. त्या संस्थेची विश्वस्त म्हणून अभिनेत्री उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख (त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के आणि वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले आणि त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.
दादांची एक हटके आणि कायम स्मरणात राहणारी स्टाईल नेहमीच प्रेक्षकांसाठी आकर्षणाची बाब होती. दादांची गाणी, त्यांच्या गाण्यांचे प्रवाहापलिकडील बोल, त्यांचा लूक, डान्स सर्वच गोष्टींनी तुफान लोकप्रियता मिळवली. आजही अनेक मोठमोठे विनोदी कलाकार त्यांच्या अभिनयातून दादांना कॉपी करताना दिसतात. मात्र दादा हे एकमेव व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सारखा दुसरा अभिनेता कधी झाला नाही आणि होणार नाही. त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर ‘एकटा जीव’ हे चरित्र देखील लिहिले गेले आहे. दादांच्या सारख्या सदाबहार व्यक्तिमत्वाला त्रिवार अभिवादन.
हेही वाचा-
‘पुष्पा’मधील भंवर सिंगने ‘अशी’ केली होती करिअरला सुरुवात, इरफान खानच्या चित्रपटाने मिळालेली प्रेरणा