Sunday, June 23, 2024

भारतीय चित्रपटाचे ‘जनक’ दादासाहेब फाळके यांनी अशाप्रकारे दिले चित्रपटांना जीवनदान, वाचा त्यांचा प्रवास

भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या दादासाहेब फाळके  यांची गुरुवारी (16 फेब्रुवारी) पुण्यतिथी आहे. दादासाहेब यांनी अशा काळात सिनेमाच्या जगात पाऊल ठेवले जेव्हा भारतात सिनेमा अस्तित्त्वात नव्हता. दादासाहेबांनीच चित्रपटाला जीवन दिले आणि नवीन ओळख देखील दिली. अशा चित्रपटप्रेमी दादासाहेबांचे 16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय चित्रपट उद्योग जगातील दर वर्षी सर्वाधिक चित्रपट निर्मितीसाठी ओळखला जातो. भारतातील जवळजवळ प्रत्येक तरुणाला  चित्रपटांमध्ये काम करण्याचा इच्छा असते. परंतु यामागचा संघर्ष किंवा येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे हे  दादासाहेबांनाकडून शिकले पाहिजे. त्यांच्या स्मृतीदिनाचे अवचित्य साधून आपण त्यांच्या चित्रपट प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत…

दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचे मूळ नाव धुंडिराज गोविंद फाळके आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील संस्कृतचे पंडित होते. बडोदा येथील कला भवन येथे दादा साहेबांचे शिक्षण पूर्ण झाले. तेथे त्यांनी शिल्पकला, अभियांत्रिकी, चित्रकला, पेंटिग आणि फोटोग्राफीचा अभ्यास केला.

सन 1910 मध्ये तत्कालीन मुंबईत अमेरिका-इंडिया पिक्चर पॅलेस मध्ये ‘द लाईफ ऑफ क्राइस्ट’ दाखवला गेला होता. थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहणाऱ्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी टाळ्यांचा कडकडाट करत निश्चय केला की, आपणही भारतीय धार्मिक आणि पौराणिक पात्रांना रुपेरी पडद्यावर जिवंत करायचे.

दादासाहेबांना त्यांचे ध्येय स्पष्टपणे दिसत होते. आपला चित्रपट बनवण्यासाठी इंग्लंडला जाऊन चित्रपटासाठी लागणारी काही साधने आणायची त्यांची इच्छा होती. या प्रवासात त्यांनी आपल्या आयुर्विम्याचे संपूर्ण भांडवलदेखील पणाला लावले. इंग्लंडला पोहोचल्यावर दादासाहेब पहिल्यांदा बायस्कोप फिल्म मासिकाचे सदस्य झाले. इंग्लंडच्या तीन महिन्यांच्या दौऱ्यानंतर दादासाहेब भारतात परतले.

त्यानंतर त्यांनी मुंबईच्या थिएटरमधील सर्व चित्रपट पाहिले. दोन महिने ते दररोज संध्याकाळी चार ते पाच तास सिनेमा बघायचे आणि उर्वरित वेळ चित्रपट निर्मितीत व्यतीत करायचे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला आणि जवळजवळ त्यांची दृष्टीही गेली.

त्यानंतर दादासाहेबांनी ‘राजा हरिश्चंद्र’ नावाच्या चित्रपटाची सुरुवात केली. हा चित्रपट भारतातील प्रथम चित्रपट म्हणून ओळखला जातो. दादासाहेब हे त्यांच्या चित्रपटाचे सर्वकाही होते. त्यांनी ते तयार केले, दिग्दर्शक देखील तेच होते, वेशभूषा डिझाईन, लाईटमॅन आणि कॅमेरा विभाग देखील त्यांनीच सांभाळला होता. चित्रपटाच्या पटकथेचे लेखकही तेच होते. 3 मे 1913 रोजी तो कोरोनेशन सिनेमा बॉम्बे येथे प्रदर्शित झाला. हा भारतातील पहिला चित्रपट होता.

‘राजा हरिश्चंद्र’च्या यशानंतर दादासाहेब फाळके यांनी मागे वळून पाहिले नाही. यानंतर दादासाहेब यांनी व्यावसायिकाच्या सहकार्याने फिल्म कंपनीची स्थापना केली. ‘हिंदुस्तान फिल्म्स’ असे या कंपनीचे नाव होते. ही देशातील पहिली फिल्म कंपनी होती. त्यांनी मॉडेल स्टुडिओही बनवला. त्यांनी कलाकारांना तसेच तंत्रज्ञानांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या आयुष्यातील चांगले दिवस फार काळ टिकू शकले नाहीत. जोडीदाराबरोबर त्यांच्या बर्‍याच समस्या सुरू झाल्या. 1920 मध्ये त्यांनी हिंदुस्तान फिल्म्समधून राजीनामा दिला. यासह त्यांनी सिनेमा जगातून निवृत्तीची घोषणा देखील केली.

‘राजा हरिश्चंद्र’पासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द 19 वर्षांपर्यंत चालली. ‘राजा हरिश्चंद्र’च्या यशानंतर त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत 95 चित्रपट आणि 26 लघु चित्रपट बनवले. त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘मोहिनी भस्मासुर’ (1913), ‘सत्यवान सावित्री’ (1914), ‘लंका दहन’ (1917), ‘श्री कृष्ण जन्म’ (1918) आणि ‘कालिया मर्दन’ (1919) यांचा समावेश आहे. त्यांचा शेवटचा मूकपट ‘सेतुबंधन’ आणि शेवटचा चित्रपट ‘गंगावतरण’ होता.

त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 1969 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली. हा भारतीय सिनेमाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. या पुरस्काराची प्रथम प्राप्तकर्ता देविका राणी चौधरी होती. 1971 मध्ये भारतीय पोस्टने दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ शिक्के जारी केला. त्यावर त्यांचे चित्र होते.(dadasaheb phalke lesser known facts about the father of indian cinema)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल
अभिनेत्री हेमांगी कवी पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘हे माझं पहिलं व्हॅलेंटाईन… ,’

 

हे देखील वाचा