पूर्वीच्या काळी किंवा अगदी आजही आपण आपल्या मनोरंजनविश्वावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असूनही, अभिनयाची वाट पकडली. आज देखील अनेक कलाकार त्यांचा व्यवसाय, नोकरी सांभाळत अभिनयात देखील त्यांचे नाव गाजवत आहे. आज जरी अशा कलाकारांचे प्रमाण कमी असले, तरी पूर्वी कलाकार त्यांचे काम करत फावल्या वेळात अभिनय करायचे.
असेच एक कलाकार म्हणजे ‘दारा सिंग.’ आपल्या धिप्पाड देहबोलीमुळे आणि भारदस्त आवाजामुळे त्यांनी अभिनयाच्या जगात स्वतःचे एक वेगळे नाव तयार केले. अभिनयात येण्यापूर्वी ते एक पेहलवान म्हणून प्रसिद्ध होते. आज दारा सिंग यांची पुण्यतिथी. आजही दारा सिंग यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रेक्षकांच्या लक्षात आहे. एक पहेलवान अभिनेता होते, ही गोष्टच जरा पचनी पडायला अवघड आहे. मात्र या गोष्टीवर दारा सिंग यांनी अंमल करत ती यशस्वी देखील करू दाखवली.
दारा सिंग यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत १९५२ साली ‘संगदिल’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. आज या लेखातून आपण त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से जाणून घेणार आहोत.
दारा सिंग यांचा जन्म अमृतसरमध्ये १९ नोव्हेंबर १९२८ मध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव दारा सिंग रंधावा असे होते. लहानपणापासूनच त्यांना कुस्ती खेळण्याचा खूप नाद होता आणि त्यांचे शरीर देखील कुस्तीसाठी चांगले होते. पुढे त्यांनी कुस्तीच करायला सुरुवात केली. आखाडे गाजवत असतानाच दारा सिंग यांनी लहानपणी मेळे आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत कुस्तीच्या स्पर्धा जिंकल्या. १९४७ साली सिंगापूरमध्ये मलेशियाई चॅम्पियन असलेल्या तरलोक सिंग यांना हरवत त्यांनी पहिला मोठा विजय मिळवला. पुढे त्यांच्या पेहलवानीला मान्यता मिळाली आणि ते एक हुशार आणि उत्तम पेहलवान म्हणून ओळखू जाऊ लागले.
दारा सिंग यांना कुस्ती खूप आवडायची वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत ते कुस्ती खेळत होते. नुसते खेळत नाही, तर जिंकतही होते. १९५९ साली दारा सिंग हे जगतजेत्या जाॅर्ज गारडियान्का यांना हरवत कॉमनवेल्थमध्ये विश्व चॅम्पियन झाले होते. १९९६ साली ते विश्व चॅम्पियन लाऊ थेज यांना हरवत पुन्हा विश्व चॅम्पियन बनले. त्यांनी त्यांच्या जीवनात ५०० सामने लढले होते आणि जवळपास सर्वच सामने जिंकले होते.
दारा सिंग यांना किंग कॉन्ग यांच्यासोबत कुस्ती खेळण्याची खूप इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण होताना त्यांनी एक विक्रम देखील केला. या सामन्यात दारा सिंग यांनी ऑस्ट्रेलियाच्या २०० किलो वजनाच्या किंग कॉन्ग यांना डोक्यावर उचलून फेकले होते. तेव्हा दारा सिंग यांचे वजन १३० किलो एवढेच होते. या सामन्यानंतर दारा सिंग तर सर्वांसाठीच हिरो बनले होते.
सन १९५२ मध्ये आलेल्या ‘संगदिल’मधून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. दारा सिंग यांनी अभिनयाला सुरुवात तर केली, मात्र अभिनेत्रींना त्यांच्यासोबत काम करायला जरा अवघड वाटायचे. दारा सिंग यांनी अनेक सिनेमात काम केले होते. त्यांनी अभिनेत्री मुमताज यांच्या सोबत १६ चित्रपटांमध्ये काम केले. जवळपास सर्वच लहान मोठ्या कलाकारांसोबत दारा सिंग काम करत होते.
या सर्वांमध्ये दारा सिंग यांना रामानंद सागर यांनी त्यांच्या ‘रामायण’ मालिकेतील हनुमानाच्या भूमिकेसाठी निवडले होते. या भूमिकेनंतर दारा सिंग यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. ते हनुमान म्हणूनच ओळखले जाऊ लागले. बहुतेकरून त्यांनी सहाय्यक कलाकार, आजोबा, नाना, आदी भूमिका निभावल्या आहेत. करीना शाहिदच्या ‘जब वी मेट’ सिनेमात तिच्या आजोबांची भूमिका साकारली होती. २००३ ते २००९ सालापर्यंत त्यांना भाजपाने राज्यसभा सदस्य म्हणून नेमले होते. वयाच्या ८४ व्या वर्षी, १२ जुलै २०१२ साली त्यानी या जगाचा निरोप घेतला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेता रोहित रॉयने सोशल मीडियावर शेअर केले फोटो; गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल थक्क