Monday, July 1, 2024

मुद्दे मांडण्याची कला अवगत असल्याने, किरण माने यांना ‘या’ अभिनेत्रीने दिला राजकारणात येण्याचा सल्ला

मागील बऱ्याच दिवसांपासून अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये तुफान गाजताना दिसत आहे. त्यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतून तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्याबद्दल किरण माने यांना मालिकेतून काढल्याचा आरोप त्यांनी केला. तर, याउलट त्यांच्या गैरवर्तनामुळे किरण मानेंवर ही कारवाई करण्यात आल्याच चॅनेलकडून आणि निर्मात्यांकडून सांगितले गेले. या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक असे दोन गट पडले असून, एक गट मानेंना पाठिंबा दिला तर दुसऱ्यांनी माने यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचे सांगितले आहे. आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करावा असे म्हटले आहे.

या प्रकरणावर दीपाली सय्यद म्हणाल्या, “हा संपूर्ण वाद सुरु होण्याच्या आधी मला किरण माने कोण आहेत, ते कोणत्या मालिकेत काम करतात, याबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यांच्या विधानानंतर त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले, हे सुद्धा मला माहीत नव्हते. मला समजल्यानंतर मी त्यांना त्यावेळी पाठिंबा दिला होता पण नंतर काही गोष्टी अशा घडू लागल्या की ज्यामध्ये त्यांनी, मालिकेच्या सेटवर काम नीट केले नाही, मालिकेतील महिलांशी त्याची वागणूक चांगली नव्हती आदी अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले. आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे कोणतीही व्यक्ती तिचे वैयक्तिक विधान मांडू शकते. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.”

पुढे दीपाली भोसले सय्यद म्हणाल्या. “केवळ आपले मत मांडण्यासाठी त्यांना मालिकेतून काढून टाकणे, त्यांच्याबद्दल अफवा पसरवणे खूपच चुकीचे आहे. किरण माने हे उत्तम वक्ता असून, त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्याची कला उत्तम पद्धतीने अवगत आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे असे मला वाटते,” असे त्या म्हणाल्या. किरण माने यांच्या सहकलाकारांनी देखील त्यांच्या सेटवरील चुकीच्या वागणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढल्याचे सांगितले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किरण माने यांना पाठिंबा दिला असून, शिवसेना, मनसे आणि भाजपाने किरण मानेंच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा