टिशू झाला इशू! गर्दीचा फायदा घेऊन दिपीकाची पर्स खेचण्याचा घडला प्रकार, घटनेचा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल


कलाकारांसाठी त्यांच्या फॅन्सचे प्रेम लपून राहिलेले नाहीये. फॅन्स नेहमी आपल्या आवडत्या कलाकारांची एक झलक बघण्यासाठी जीवाचे रान करत असतात. कलाकारांना अनेकदा त्यांचे वैयक्तिक जीवन जगत असताना फॅन्सच्या काही गोष्टींचा त्रास झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. कलाकरांना गराडा घालणे, त्यांचा पाठलाग करणे, घराखाली तासंतास उभे राहणे या गोष्टी तर आता अगदी सामान्य झाल्या आहेत. मात्र बॉलिवूडच्या मस्तानीला नुकताच एक वेगळा आणि चक्रावणारा अनुभव आला आहे.

दीपिका पदुकोण नुकतीच एका हॉटेलमध्ये जेवायला गेली होती. हॉटेलमध्ये दीपिका पदुकोण आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, आणि तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी हॉटेल बाहेर तुफान गर्दी केली. दीपिकाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा एवढी गर्दी पाहून जरा गोंधळली, पण याच गर्दीतून वाट काढत गाडीजवळ जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. दीपिकाने जशी गाडीजवळ जायला सुरुवात केली, तशी फॅन्सने तिच्याभोवती गर्दी केली. ही तोबा गर्दी दीपिकाच्या बॉडीगार्डसला देखील आवरली जात नव्हती.

ही गर्दी कमी वाटत असतानाच तिथे एक गरीब स्त्री टिशू पेपर विकत घेण्यासाठी दीपिकाला आळवू लागली. मात्र दीपिकाचे संपूर्ण लक्ष तिच्या गाडीवर होते. कशीबशी वाट काढत दीपिका तिच्या गाडीजवळ पोहचली. तिच्यासोबत फोटोग्राफर्स आणि चाहत्यांची गर्दी सुद्धा गाडीपर्यंत आली. दीपिका गाडीत बसत असताना टिश्यू विकणाऱ्या स्त्रीने संधी साधून तिची पर्स ओढली. मात्र दीपिका आणि तिच्या सहकाऱ्यांनी लगेच पर्स सोडवली आणि दीपिका गाडीत बसून निघून गेली.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल भियानी या इन्स्टा पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहे. काहींनी दीपिकाला तुझा मास्क कुठे आहे असा सवाल देखील विचारला आहे?

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती ‘८३’ सिनेमात दिसणार आहे. याशिवाय शकुन बत्रा दिग्दर्शित अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत एका सिनेमातही ती दिसणार आहे. ‘पठाण’ सिनेमात ती शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे. यानंतर दीपिका सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ सिनेमात काम करणार आहे. यात ती हृतिक रोशनसोबत अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.