Monday, February 26, 2024

धर्मेंद्र यांनी घातलेला ‘तो’ राडा, ज्यामुळे मोडले होते जितेंद्र आणि हेमा मालिनीचे लग्न, वाचा खास लव्हस्टोरी

बॉलिवूडमध्ये अभिषेक- ऐश्वर्यापासून ते अक्षय- ट्विंकलपर्यंत अनेक कलाकारांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटासारखी राहिली आहे. परंतु या सर्वांमध्ये एक भन्नाट लव्हस्टोरी आहे बॉलिवूडच्या सर्वात लाडक्या जोडीची म्हणजेच ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांना बऱ्याच आव्हानाचा सामना करावा लागला होता, कारण त्यादरम्यान माध्यमांमध्ये हेमा मालिनी आणि अभिनेते जितेंद्र कपूर यांच्यातील जवळीक वाढण्याच्या बातम्या होत्या. परंतु असे असूनही धर्मेंद्र यांनी कसं काय हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले?, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल…

हेमा मालिनी यांनी आपले आत्मचरित्र ‘बियाँड द ड्रीम गर्ल’मध्ये धर्मेंद्र यांच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र खूप आवडायचे. परंतु त्यांच्या आई-वडिलांना या नात्याबद्दल आक्षेप होता आणि त्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. त्यांनी खूप काळापर्यंत त्यांचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. केवळ शूटिंगदरम्यानच त्यांची भेट होत असायची. तरीही, लवकरच हेमा मालिनी यांच्या कुटुंबातील लोकांना याची माहिती मिळाली. खरं तर एकेदिवशी हेमा दिवसभर घरातून बाहेर होत्या आणि सायंकाळी घरी परतल्या होत्या. त्यावेळी हेमा मालिनी यांच्या आईला समजले होते की, आपल्या मुलीवर कडेकोट लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे हेमाचे लग्न करणे.

आता हे तर सर्वांनाच माहिती होते की, हेमा मालिनी यांच्या प्रेमात अनेक बॉलिवूड अभिनेता होते. जितेंद्र आणि संजीव कुमार हे तर हेमा मालिनी यांच्या प्रेमात इतके वेडे होते की, ते काहीही करण्यासाठी तयार होते. हेमा यांनाही जितेंद्र आवडू लागले होते. तरीही, त्यांनी आपले प्रेम खुलेपणाने व्यक्त केले नाही आणि दोघांची मैत्री तशीच कायम ठेवली.

दुसरीकडे हेमा यांच्या आईने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी अनेक योजना आखून ठेवल्या होत्या. त्यांना त्यांची मुलगी एका लग्न झालेल्या आणि मुलं- बाळं असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करावे, असे त्यांना वाटत नव्हते. अशाप्रकारे त्यांनाही हेमा यांचे लग्न जितेंद्र यांच्याशी व्हावे असे वाटत होते.

हेमासोबत लग्न करण्याबद्दल जितेंद्र यांनी म्हटले होते की, हा त्यांचा गैरसमज होता. ते म्हणाले होते की, “मला हेमा मालिनीशी लग्न करायचे नव्हते. माझे तिच्यावर प्रेम नाही. तिचेही माझ्यावर प्रेम नाही. परंतु आमच्या कुटुंबाला असे हवे होते. हेमा एक चांगली मुलगी आहे.” सुरुवातीला हेमा लग्नासाठी तयार नव्हत्या. परंतु नंतर त्या तयार झाल्या होत्या. या लग्नाची सर्व तयारी गुपचूप पद्धतीने केले होते. दोघांच्याही कुटुंबाला हे लग्न लवकरात लवकर उरकवायचे होते, त्यासाठी ते चेन्नईला (तेव्हाचे मद्रास) पोहोचले होते.

हेमा आणि जितेंद्र यांचे कुटुंबीय लग्नाची तयारी करत होते तेवढ्यात एका स्थानिक वृत्तपत्राला याची माहिती मिळाली. मग काय, ही बातमी आगीप्रमाणे परसली. जेव्हा मुंबईत असलेल्या धर्मेंद्र यांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना जोराचा धक्काच बसला. त्यांनी वेळ न घालवता जितेंद्र यांची गर्लफ्रेंड (सध्या पत्नी) शोभा सिप्पी यांना भेटण्याची योजना बनवली आणि दोघेही चेन्नईला पोहोचले.

धर्मेंद्र आणि शोभा थेट हेमाच्या घरी गेले, जिथे लग्न होणार होते. धर्मेंद्रला पाहून हेमा यांचे वडील रागाने लालबुंद झाले. त्यांनी धर्मेंद्र यांना घरातून बाहेर हाकलले. हेमा यांच्या वडिलांनी धर्मेंद्र यांना म्हटले की, “तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून दूर का जात नाही? तुझे लग्न झाले आहे. तू माझ्या मुलीशी लग्न नाही करू शकत.”

परंतु माघार घेतली ते धर्मेंद्र कसले. त्यांनी कंबर कसली आणि हेमा यांच्या कुटुंबाला समजवण्यात यशस्वी झाले. शेवटी कुटुंबातील व्यक्ती या गोष्टीवर सहमत झाले की, धर्मेंद्र हेमा यांच्याशी एकट्यात एका खोलीत चर्चा करतील. दुसरीकडे हेमा यांचे आई-वडील, जितेंद्र यांचे कुटुंब आणि शोभा हे सर्व त्यांची वाट पाहत होते.

धर्मेंद्र हेमा यांना जीव तोडून समजवू लागले. त्यांनी म्हटले की, “जर तू माझ्यासोबत लग्न केले नाही, तर ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल.” धर्मेंद्र यांनी जितेंद्रशी लग्न न करण्याची विनंती केली. एकीकडे धर्मेंद्र हेमा यांना समजावून सांगत होते, तर दुसरीकडे शोभा जितेंद्रवर आपला राग व्यक्त करत होती.

जेव्हा हेमा खोलीच्या बाहेर आल्या, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर होत्या की, आता त्या काय म्हणतील? त्यांनी थोडा वेळ सर्वांना खोलीतून बाहेर जाण्यासाठी म्हटले. जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी म्हटले की, “लग्न होणार असेल तर आताच होईल, नाही तर कधीही होणार नाही.”

जसे एखादा चातक पावसाची आतुरतेने वाट पाहतो, तसेच सर्वजण हेमा यांच्या उत्तराची वाट पाहत होते. हेमा यांनी गुपचूपपणे आपली मान हलवत नकार कळवला. त्यानंतर जितेंद्र यांच्या कुटुंबाने जबरदस्त राडा घातला. अशाप्रकारे जितेंद्र आणि हेमा यांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा यांच्याशी लग्न केले. दोघांनाही दोन मुली आहेत. त्यांची नावे ईशा देओल आणि अहाना देओल असे आहे.याव्यतिरिक्त धर्मेंद्र यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याकडून 2 अपत्य आहेत. त्यांचे नाव सनी देओल आणि बॉबी देओल असे आहे.(dharmendra landed up at hema malini home and stop her from marrying jeetendra throwback story)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
धर्मेंद्र यांनी चालत्या गाडीत मुलगा सनी देओलसाठी केला परफॉर्मन्स, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
सनी देओलच्या ‘त्या’ एका चुकीमुळे वडील धर्मेंद्र यांना बसला होता कोट्यवधींचा फटका! वाचा तो किस्सा

हे देखील वाचा