मराठी चित्रपट जगतात सध्या अनेक नाविण्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. ऐतिहासिक कथा , सत्यकथा अशा अनेक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यामुळे मराठी चित्रपट जगताची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते प्रविण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला मुळशी पॅटर्न चित्रपटही असाच गाजला होता. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रविण तरडेंच्या (Pravin Tarde) दिग्दर्शनाची कमाल पडद्यावर पाहायला मिळणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन प्रविण तरडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रसाद ओकच्या (Prasad Oak) दमदार अभिनयाने आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा खूपच भारदस्त दिसत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा धमाकेदार टीजर रीलीज केला आहे. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. प्रविण तरडेंचा भारदस्त आवाज आणि जय महाराष्ट्रच्या घोषणांनी अंगावर काटा आणणारा हा टीजर खूपच जबरदस्त दिसत आहे. प्रसाद ओकची दमदार एंट्री आणि नजरेतला करारी बाणा प्रेक्षकांना वेड लावणारा असून, हा चित्रपट १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा टीजर शेअर करत प्रविण तरडेंनी “सगळेच राजकारणी सारखे नसतात काही ‘आनंद दिघे‘ असतात एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा मोठ्या पडद्यावर धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे” असे जबरदस्त कॅप्शन दिले आहे.
कोण होते आनंद दिघे –
धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष होते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी आणि व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि कायमचे एकनिष्ठ राहिले. आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे सामान्य लोकांत प्रंचड प्रसिद्ध होते. त्यांनी आपले घरदार सोडून जनता दरबार स्थापन केला आणि त्यातच ते राहायचे. त्यांच्याकडे आलेला कोणताही माणूस समस्येवर तोडगा निघाल्याशिवाय माघारी जात नव्हती ही त्यांची खासियत होती. असामान्य व्यक्तीमत्व असलेल्या आनंद दिघे यांचे आजही असंख्य कार्यकर्ते आहेत. ऑगस्ट २००१ मध्ये त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला .
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा