संपूर्ण महाराष्ट्राचे किंबहुना संपूर्ण जगाचेच आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज (२१ मार्च) जयंती आहे. ज्या महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वराज्याचे स्वप्न दाखवत अशक्य वाटणारे स्वराज्य शत्रूच्या तावडीतून सोडून संपूर्ण जनतेला मुक्त केले त्याच महाराजांची आज जयंती. शिवरायांचे कर्तृत्व आणि त्यांचा इतिहास हे कधीही न संपणारे आहे. याबद्दल किती आणि काय काय बोलू हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाला पडल्याशिवाय राहत नाही. छत्रपतींची कीर्ती आणि त्यांचे महान कर्तृत्व संपूर्ण जगाला आणि येणाऱ्या पिढीला समजावे यासाठी अनेक दिग्दर्शक ते पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील वेगवेगळे टप्पे चित्रपटरुपाने जनतेसमोर आणणारा लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर आता शिवचरित्रातील एक नवीन अध्याय जनतेसमोर आणण्यासाठी सज्ज झाला आहे.
पावनखिंड चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर दिग्पाल आता पुन्हा एकदा त्याच्या आगामी सिनेमातून महाराजांच्या शौर्याची कहाणी दाखवण्यासाठी तयार झाला आहे. ‘शेर शिवराज’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटानंतर दिग्पाल आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कोणती काठ प्रेक्षकांसमोर आणणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवजयंतीच्या मुहूर्तावर आता या चौथ्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची असणारी प्रतापगडाची लढाई ही सर्वांनाच माहित आहे. याच लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या दिग्पाल लांजेकर यांनी “आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह,” हे कॅप्शन देत हा टिझर पोस्ट केला आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरने देखील हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला. या टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
अंगावर शहरा आणणाऱ्या या ४५ सेकंदाच्या टीझरमध्ये अफझलखानाची ओझरती झलक दिसली असून, पुन्हा एकदा चिन्मय महाराजांच्या भूमिकेतून समोर येणार आहे. या सिनेमात अफझलखान नक्की कोण साकारत आहे याबद्दल अजून कोणतीच माहिती दिली गेली नसली तरी लवकरच त्याबद्दल समजेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-