Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

काबाड कष्ट करून दिलीप जोशींनी १० वर्षे पटकावला ‘बेस्ट कॉमेडियन ऍक्टर’चा पुरस्कार, रंजक आहे प्रवास

आज आपण अनेक कॉमेडियन पाहतो, त्यांची कॉमेडी पाहून प्रेक्षक चांगलेच लोटपोट होतात, पण मंडळी एक असाही अभिनेता आहे, ज्याने आपल्या कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलंय. ‘ए पागल औरत, क्या तपलीक है आप को?’, ‘नॉन सेन्स’, ‘ए तू शांती रख ना भाई.’ यांसारखे डायलॉग्ज ऐकून तर आता तुम्ही ओळखलंच असेल की, आम्ही कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्याबाबत बोलत आहोत. अगदी बरोबर ओळखलंत बघा. तो अभिनेता इतर कुणी नसून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेठालाल गडा म्हणजेच दिलीप जोशी. आज जरी ते आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवत असले, तरीही त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा काही खायची गोष्ट नाहीये. त्यासाठी त्यांनी स्वत: अपार कष्ट घेतलंय.

दिलीप यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये एन्ट्री करण्यापूर्वी खूपच खस्ता खाल्ला. अनेक सीरियल्समध्ये काम केलं, अनेक प्रसिद्ध सिनेमातही ते झळकले, पण हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. सिनेमात जरी नोकराचा रोल साकारला असला, तरीही आज दिलीप हे टेलिव्हिजनचे सलमान खान आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सर्वाधिक काळ चालणाऱ्या टीव्ही शोचा भाग आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सलग १० वर्षे बेस्ट कॉमेडियन ऍक्टरचा अवॉर्डही पटकावलाय. मंडळी यश हे दुसऱ्या मिनिटाला मिळेल असं नसतं बरं का. त्यासाठी तुमच्याकडे तो संयम पाहिजे, ती जिद्द पाहिजे, जी दिलीप यांच्याकडे होती.

२६ मे, १९६८ रोजी गुजरातच्या पोरबंदरमधील गोसा गावात ब्राह्मण कुटुंबात दिलीप यांचा जन्म झाला. शाळेत असतानाच त्यांना एक रोल मिळाला होता. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी ऍक्टिंग केली होती. हीच ती वेळ. जेव्हा दिलीप यांना अभिनयाची गोडी लागली. त्यांना ऍक्टिंगमध्ये चांगलाच रस होता. पण नेहमीप्रमाणेच कुटुंबाचा दबाव होताच की, नाही. आधी शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे. यानंतर त्यांनी मुंबईच्या एमएम कॉलेजमध्ये कॉमर्स आणि इकोनॉमिक्समधअये ग्रॅज्युएशनसाठी नोंदणी केली. कॉलेजमध्ये असतानाच ते कॉलेजसोबतच ऍक्टिंगही करायचे. ते अनेक थिएटर ग्रूपशी जोडलेले होते. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळंच अभ्यासाला वेळ मिळत नव्हता, आणि जेव्हा परीक्षा झाल्या, तेव्हा निकाल हातात आला. नको तेच झालं. दिलीप नापास झाले. हे जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं, तेव्हा वडील काहीच बोलले नाहीत. हे पाहून दिलीपही शॉक झाले. त्यांना समजलं होतं की, कदाचित वडिलांनी आपला ऍक्टिंगमधील रस ओळखलाय आणि त्याला पुढे जाऊन अभिनेताच बनायचंय. मग काय मुलासाठी काहीपण.

वडिलांनी दिलीप यांना फुल सपोर्ट केला आणि शिक्षणासाठी फोर्सही केला नाही. तसेच ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठीही त्यांना फोर्स केला नाही. घरून तर त्यांना सपोर्ट मिळाला होताच, पण बाहेर मात्र त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या टॅलेंटवर विश्वास होता. त्यानंतर ते आले होते बॉलिवूडमध्ये आपला हात आजमावायला. त्यांनीही आपल्या स्ट्रगलची सुरुवात तिथून केली, जिथून अधिकतर ऍक्टर सुरुवात करतात. म्हणजेच मुंबईच्या पृथ्वी थिएटरपासून. तिथूनच ते रंगभूमीवर भाग घेऊ लागले. हळूहळू अनेक शोमध्ये झळकू लागले. तिथेच त्यांचा सिनेइंडस्ट्रीत एक ग्रूप बनला. त्यांनी अनेक गुजराती शो, तसेच सिनेमात काम केलं.

यानंतर ते झळकले सल्लू भाईच्या पहिल्याच सिनेमात. तो म्हणजे ‘मैंने प्यार किया.’ हा सिनेमा सुपरहिट झाला. पण याचा काहीच फायदा दिलीप यांना झाला नाही. कारण त्यांचा रोलच इतका छोटा होता. जो नोटीसच केला गेला नाही. यानंतर त्यांनी इतर सिनेमातही नशीब आजमावलं. त्यांना हम है बेमिसालमध्ये एक छोटा रोल मिळाला. पण त्याचंही ‘मैंने प्यार किया’ सारखंच झालं. २-३ वर्षे उलटली. त्यांनी सिनेमात फक्त काही सेकंदांचा रोल केलेला. त्याच काही सेकंदाच्या रोलमधून त्यांना विश्वास खूप मिळाला होता की, त्यांना कुठे ना कुठे संधी मिळेलच. मग तो काळ उजाडला. जेव्हा त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. ते डिरेक्टरही सेमच होते. सुरज बडजात्या. ते ‘हम आपके है कौन’ हा सिनेमा बनवत होते. स्टारकास्ट जवळजवळ सारखीच होती. फक्त बदलली होती ती, सिनेमाची लीड हिरोईन. यानंतर सुरज यांनी दिलीप यांच्यासाठी पुन्हा एकदा या सिनेमात एक छोटासा रोल ठेवला.

या सिनेमात त्यांनी भोलाप्रसादचा रोल साकारला. रोल छोटाच, पण सिनेमा मात्र प्रचंड मोठा. या सिनेमाने मागील सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. पण इथंही माशी शिंकलीच. दिलीप यांना या सिनेमातूनही काही चांगली प्रसिद्धी मिळाली नाही. या सिनेमाचं क्रेडिटही घेऊन गेले, सुरज बडजात्या, सलमान खान, माधुरी दीक्षित आणि मोहनीश बहल. बॉलिवूडच्या दोन सुपरहिट सिनेमाचा भाग होऊनही दिलीप जोशी यांना आजपर्यंत काम शोधावं लागत होतं. ते ठिकठिकाणी ऑडिशन्स देत होते. एक- दोन दिवसांच्या असाईनमेंट्स घेत होते. पण त्यांना कुणीही पर्मनंट काम देत नव्हतं. पण हार मानतील, ते दिलीप कसले. सिनेमात जरी त्यांचा सेकंदांचा असला, तरीही त्यांना माहिती होतं की, आता टीव्ही अजून बाकी आहे. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा हा टीव्हीकडे वळवला. तिथूनच त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत येण्याचं ठरवलं.

आता कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला स्ट्रगल करणे हे भागच असते. हे त्यांना समजलं होतं. टीव्हीसाठी ऑडिशन्स द्या, आणि तिथे आपला नेटवर्क वाढवा, पण त्यांनी हार मानलीच नाही. आणि त्यांनी टीव्हीत आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. १९९५ साली त्यांना मिळाला, ‘कभी ये कभी वो’ हा शो. यानंतर त्यांनी ‘क्या बात है’ हा शो केला. यात त्यांनी रंगास्वामीचा रोल केला होता. त्यांच्या या कॅरेक्टरची चांगलीच वाहवा झाली होती. त्यांना भरपूर काम मिळत होतं. त्यांचं नेटवर्किंगही वाढतच होतं. त्यांनी १९९९ मध्ये ‘ये दुनिया है रंगीन’ नावाचा शो केला. यानंतर त्यांचा ‘शुभमंगल सावधान’ हाही चांगलाच गाजला होता.

टीव्हीवर काम करता करता त्यांनी आपलं सिनेमातील कामही सुरूच ठेवलं. त्यांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘खिलाडी ४२०’, ‘हमराज’ यांसारख्या सिनेमात काम केलं. काम टीव्हीतूनही मिळत होतं आणि सिनेमातूनही पण आता गरज होती ती नावाची. कारण ते इंडस्ट्रीत १९८९ पासून होते. पण ते नाव अजूनही त्यांना मिळालं नव्हतं. आपल्या सर्वांनाच माहितीये की, बॉलिवूड कलाकारांसाठी वय हे खूप महत्त्वाचं असतं. जसजसं वय वाढतं, तसतसं अभिनेत्याला वाटतं की, असं काही काम करू, ज्यामुळं माझं नाव ओळखलं जावं. आणि माझ्या नावाचे उदाहरण दिले जावे. कुठे ना कुठे दिलीपही आयुष्याच्या त्या टप्प्यावर आले होते, तेव्हा त्यांना या नावाचं प्रेशरही सतावत होतं. इकडं वय वाढत होतं आणि तिकडं रोलही काही सेकंदाचेच मिळत होते.

यानंतर उजाडलं २००६. इथे दिलीप आपल्या करिअरच्या सर्वात खालच्या स्तरावर होते. त्यांना केवळ एक आणि दोन दिवसांचेच शूट मिळत होते. ते एफआयआर सारख्या शोमध्ये कॅरेक्टर रोल करत होते. म्हणजे असं की, जेव्हा तुमची गरज असेल, तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल. विशेष म्हणजे, तब्बल दीड वर्ष ते आपल्या घरीच बसून होते.

आणि तेव्हा उजाडलं दिलीप यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं वर्ष २००८. त्यावेळी डिरेक्टर असित कुमार एका शोवर काम करत होते. हा शो होता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ यावेळी त्यांनी १९९९ साली ‘ये दुनिया है रंगीन’मध्ये एकसोबत काम केलेल्या आपल्या मित्राची म्हणजे दिलीप यांची आठवण आली. त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये दिलीप यांना एक रोल ऑफर केला. पण मंडळी आज जो जेठालाल आपण छोट्या पडद्यावर पाहतो, त्यासाठी दिलीप यांची निवड केली नव्हतीच. त्यांची निवड असित यांनी चंपकलाल गडा म्हणजेच जेठालालच्या वडिलांच्या रोलसाठी केली होती. असित जवळचे मित्र असल्याने दिलीप यांनी त्यांना सांगितलं की, मी बापाच्या रोलमध्ये फीट बसणार नाही. पण जर तुम्हाला हवं असेल, तर मी जेठालालचा रोल करू शकतो. जेव्हा त्यांनी जेठालालच्या रोलसाठी ऑडिशन दिले, तेव्हा त्यांनी दिलीप यांनाच जेठालालचा रोल दिला. हा शो जेव्हा टीव्हीवर प्रसारित झाला, तेव्हा या शोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. खूप कमी काळात हा शो प्रसिद्ध झाला. कारण, त्यावेळी फक्त सास-बहू, कॉमेडी यांसारखे शो लागायचे, जे अनेकांना आवडत नव्हते. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो असा होता, जो संपूर्ण कुटुंब बसून पाहू शकत होते. त्यामुळे या शोला भरभरून पसंती मिळाली. दोनच वर्षात या शोने ‘बालिका वधू’ला मागे टाकत सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून पहिले स्थान पटकावलं. यामध्ये जेठालालचं म्हणजेच दिलीप यांचं अनन्यसाधारण योगदान आहे.

२००८ पासून सुरू झालेला हा शो आज २०२१ पर्यंतही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा शो टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारा शो आहे. या शोमधील प्रत्येक कॅरेक्टर आज खूप मोठा सेलिब्रिटी आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे मोठ-मोठे स्टार्सही आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी या शोमध्ये हजेरी लावत असतात. जसे की, सलमान, शाहरुख, आणि अमिताभ बच्चन. आज जेठालालचं कॅरेक्टर इतकं प्रसिद्ध आहे की, त्यांना जगभरात ओळखलं जातं. ते टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. विशेष म्हणजे २००९ पासून ते २०१९पर्यंत त्यांनी बेस्ट कॉमेडियन ऍक्टरचा अवॉर्ड जिंकला आहे. या शोने आतापर्यंत ३ हजार ३३३ एपिसोड्सही पूर्ण केले आहेत.

हेही पाहा- प्रेक्षकांना सलग १३ वर्षे हसवणाऱ्या जेठालालची संघर्षमय कहाणी माहितीये का? 

कुणी विचार केला होता की, जे दिलीप जोशी २००८ पूर्वी काही काम नव्हते म्हणून दीड वर्षे रिकाम्या हाती बसले होते. आता त्यांच्याकडेच मागील १३ वर्षांपासून ऍक्टिंग करण्याशिवाय इतर कामांसाठी वेळच नाहीये. असं आपण म्हणू शकतो की, एकेकाळी नशिबानं यांची मस्करी केली, पण आता तेच आपल्या कॉमेडीने सर्वांची मने जिंकत आहेत. स्ट्रगल तर त्यांना करावंच लागलं, पण आता ते करिअरच्या शिखरावर आहेत. आता त्यांच्याकडे कामही आहे आणि नावही आहे. तसेच ते आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा