Saturday, July 27, 2024

“महाराज असे रागीट खरंच दिसायचे…” दिग्दर्शक महेश टिळेकरांची रावरंभा पाहिल्यानंतरची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मराठी सिनेविश्वात मागील काही काळापासून ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच इतिहासातील अनेक मोठ्या दिग्गज व्यक्तींवर हे सिनेमे येत आहे. यातच सध्या चर्चा आहे ती रावरंभा या सिनेमाची. दमदार कलाकारांची फौज आणि ऐतिहासिक मात्र जरा वेगळा असा हा सिनेमा सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्र्राच्या इतिहासात एक दडलेली आणि कधीही जास्त लोकांच्या समोर न आलेली अशी एक प्रेमकथा जी या सिनेमातून सर्वांच्या समोर येणार आहे.

सोशल मीडियावर तर सिनेमाची जोरदार चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगलेली दिसत आहे. अशातच मराठीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असलेल्या महेश टिळेकर यांनी याच सिनेमाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी रावरंभा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांचा अनुभव शेअर केला आहे. महेश यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, “डोळ्यात आणि ह्रुदयात साठवावा ‘राव रंभा’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करीत प्रेक्षकांच्या आणि विशेषतः शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून सिनेमॅटिक लिबर्टी घेत इतिहासाची तोडमोड करणारे काही ऐतिहासिक सिनेमे अलीकडच्या काळात बरेच आले.पण याला एक अपवाद म्हणजे एखाद्या रुक्ष परिसरात सुंदर कमळ फुलांनी भरलेलं जलाशय दिसावं अगदी तसाच ‘राव रंभा’ सिनेमा आहे.

हा सिनेमा आपल्याला सर्वच बाबतीत तृप्त करून एक सुखद अनुभुती देतो. प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या मिळाव्यात म्हणून मुद्दाम घुसवलेले ,फिल्मी वाटावे असे संवाद ह्या सिनेमात नाहीत आणि म्हणूनच सिनेमा भावतो. प्रताप गंगावणे यांची पटकथा आणि संवाद कुठेही आपल्याला ” कधी संपतोय सिनेमा?” हा प्रश्न मनात येऊ देत नाहीत. सिनेमात विविध पात्रे साकारणारे कलाकार विनाकारण बेबिंच्या देठा पासून दात ओठ खात राक्षसा सारखे किंचाळताना दिसत नाहीत आणि याचमुळे कलाकारांचा अभिनय लक्षात राहतो.सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर याने साकारलेला खलनायक इतका चीड आणनारा की जुन्या जमान्यातील खलनायक राजशेखर यांची आठवण आली आणि खंत जाणवली की संतोष इतका गुणी कलाकार मराठीत असताना मराठीत त्याचं म्हणावं तितकं कौतुक झालं नाही.

सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये असणारे ओम भूतकर, मोनालिसा बागल ह्या जोडीचा सहज अभिनय हा स्मरणात राहील असा आहे. अभिनेता अशोक समर्थ यांनी साकारलेला तडफदार सरनोबत, त्यांच्या आवाजाची जरब एकदम लाजवाब.युद्धात धारातीर्थी पडतानाचा त्यांचा सीन अंगावर शहारे आणनारा.शंतनु मोघे महाराजांच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे जान आणतो.नाहीतर चेहरा उग्र ठेवून सतत कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार पाहिले की नेहमी प्रश्न पडायचा महाराज असे रागीट खरंच दिसायचे का?

या सिनेमात छोट्या भूमिकांमध्ये इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे. सिनेमाचं अर्ध यश हे प्रत्येक भूमिकेसाठी केलेली योग्य कलाकारांची निवड हे तर आहेच पण त्याबरोबर कॅमेरामन संजय जाधव यांच्यामुळे हा सिनेमा नेत्रदीपक झाला आहे हे प्रत्येक फ्रेम मध्ये जाणवते. चित्रपटातील साहस दृश्ये काळजाचा ठोका चुकविणारी आणि याआधी मराठीतल्या कुठल्याही ऐतिहासिक सिनेमात क्वचितच पहायला मिळालेली अशी आहेत.निर्मितीत कुठेही कसर न ठेवता प्रामाणिकपणे हा सिनेमा भव्य स्वरूपात साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक अनुप जगदाळे यांचं आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या निर्मात्यांचे… मराठी माणसाचा हा भव्य सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच पाहिल्यास ‘राव रंभा ‘ अनेक काळ डोळ्यात आणि हृदयातही राहील.”

दरम्यान महेश टिळेकर यांना नेहमीच इंडस्ट्रीमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये ‘मराठी तारका’ या शोमुळे ओळखले जातात. या शोने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. याशिवाय त्यांनी अनेक उत्तम सिनेमांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

हे देखील वाचा