Sunday, June 23, 2024

वयाच्या 18 व्या वर्षी साजिद नाडियाडवालासोबत लग्न करण्यासाठी दिव्या भारतीने स्वीकारला होता ‘इस्लाम धर्म’

अभिनेत्री दिव्या भारती एक अशी अभिनेत्री होती जिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आज ती आपल्यात नाही तरी देखील तिच्या कामाच्या रूपाने ती सगळ्यांच्या मनात आहे. दिव्या तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे जेवढी चर्चेत राहिली आहे. तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. खास करून साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत असणाऱ्या रिलेशन आणि लग्नामुळे ती खूप चर्चेत होती. चला तर जाणून घेऊया तिच्या लव्ह लाईफबद्दल काही खास गोष्टी.

वयाच्या १४ व्या वर्षीच अभिनेत्री दिव्या भारतीने (divya bharati) हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या या छोट्याश्या कारकीर्दीतही अनेक हिट सिनेमे दिले. वयाच्या १९ वर्षापर्यंत तर दिव्याची लोकप्रियता कमालीची वाढली होती. सन १९९२ मध्ये साजिद नाडियावाला यांनी दिव्यासोबत लग्न केले. लग्नाच्या एका वर्षानंतरच साजिद यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. दिव्याने जगाचा निरोप घेतला होता. असे म्हटले जाते की, दिव्यासोबत साजिद यांचे खूप भांडण होत असायचे. त्यादरम्यान साजिद यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ- उतारांचा सामना केला.

गोविंदाने करून दिली होती भेट
दिव्या भारती जेव्हा अभिनेता गोविंदासोबत ‘शोला और शबनम’ चित्रपटाची शूटिंग करत होती, तेव्हा गोविंदानेच तिची भेट साजिद यांच्याशी करून दिली होती. दिव्या वयात येताच दोघांनीही १० मे १९९२ रोजी लग्न केले होते. यासाठी दिव्याने चक्क इस्लाम धर्मही स्वीकारला होता आणि आपले नाव ‘सना’ असे ठेवले होते. हे लग्न अत्यंत गुपचूप पद्धतीने झाले होते. कथितपणे दिव्याचे वडील या लग्नामुळे खूश नव्हते आणि त्यांनी तिच्याशी बोलणे बंद केले होते.

दिव्याच्या मृत्यूला इतका काळ लोटला असूनही आजही अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावले जातात. पोलिसांनी या प्रकरणात खास काही सापडले नाही, ज्यामुळे सन १९८८ मध्येच हे प्रकरण बंद करण्यात आले. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी दिव्याने मुंबईत ४ बीएचके फ्लॅट विकत घेतला होता आणि करारही केला होता.

लग्नानंतर दिव्या मुंबईच्या अंधेरी पश्चिम, वर्सोवामध्ये तुलसी अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होती. ४ एप्रिलला दिव्या चेन्नईमधून एका चित्रपटाची शूटिंग संपवून परतली होती. तिला दुसऱ्या दिवशी हैदराबादला जायचे होते. याचदरम्यान एका ब्रोकरने तिला एका फ्लॅटबद्दल सांगितले होते. दिव्याला बऱ्याच दिवसांपासून एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. तिने निर्मात्याला पायाला लागल्याचे सांगत २ दिवसांनी हैदराबादला येण्यास सांगितले.

फ्लॅटचा करार झाल्यानंतर दिव्या आपल्या घरी पोहोचली होती. त्याचवेळी रात्री १० वाजता फॅशन डिझायनर नीता लुल्ला आपले पती डॉ. शाम यांच्यासोबत तिला भेटायला पोहोचले. नीता लुल्ला आगामी चित्रपटाच्या ड्रेसबाबत दिव्याला भेटायला पोहोचल्या होत्या. तिघांनीही सोबत ड्रिंक्स घेतल्या. त्यावेळी दिव्याच्या घरात काम करणारी बाईसुद्धा होती. रात्री जवळपास ११ वाजता दिव्या लिव्हिंग रूममध्ये गेली, जिथे बाल्कनीच नव्हती. खिडकी पार्किंगकडे उघडलेली होती आणि त्यामध्ये ग्रिलदेखील नव्हती. दिव्या खिडकीवर चढली आणि बाहेर पाय टाकून बसली होती. मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी दिव्या नेहमी असेच करत होती.

दिव्याने एक हात खिडकीच्या चौकटीला पकडण्यासाठी पुढे केला, परंतु तिचा हात निसटला आणि ती खाली पडली. पाचव्या मजल्यावरून पडल्यामुळे दिव्याचे रक्त खूप गेले होते. जेव्हा नीता लुल्ला आणि त्यांचे पती खाली पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की, दिव्या तडफडत होती. त्यावेळी ती जिवंत होती. त्यांनी कपूर रुग्णालयात तिला नेले आणि तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला.

पोलिसांनी तपासात, नशेत बाल्कनीमधून पडल्याचे कारण सांगितले. दिव्याच्या मृत्यूचे गुपित आजही समजले नाही, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. जसे की, दिव्या अशाप्रकारे खिडकीमध्ये बसायची, तेव्हा तिचे मित्र तिला असे करण्यापासून रोखत का नव्हते? घरात नीता लुल्ला, तिचे पती आणि काम करणारी बाई होते, परंतु त्यांना आवाज का नाही आला? साजिद यांच्यावरही प्रश्न उपस्थित झाले की, ते त्यावेळी कुठे होते? या सर्वांचे कोणतेच उत्तर मिळाले नाही.

दिव्याच्या मृत्यूनंतर साजिद यांनी सन २००४ मध्ये दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव वर्धा खान असे आहे. साजिद आणि वर्धा एकसोबत अनेक पार्टीमध्ये आणि इव्हेंटमध्ये जाताना दिसतात. या दोघांनाही सुभान आणि सुफयान असे दोन अपत्य आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा