Tuesday, July 9, 2024

तीन वर्षात तब्बल २० चित्रपट आणि ९० चित्रपटांना होकार दिलेल्या दिव्या भारतीचा मृत्यू आजही आहे न उलगडलेले कोडे

दिव्या भारती (Divya Bharti) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी अभिनेत्री होती, जिच्या नावावर कोणताही चित्रपट सुपरहीट होण्याची खात्री असायची. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे देशभरात असंख्य चाहते होते. हे चाहते दिव्या भारतीच्या अभिनयावर नेहमीच फिदा असायचे. मात्र या प्रतिभावान अभिनेत्रीचा झालेला धक्कादायक मृत्यू आजही अनेकांना विचार करायला भाग पाडतो. मंगळवारी (५ एप्रिल) रोजी दिव्या भारतीची पुण्यतिथी आहे. जाणून घेऊया तिच्याबद्दल.

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मृत्यूचा उलगडा आजपर्यंत झालेला नाही. यशाच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांनी अचानक या जगाचा निरोप घेतला ज्यामुळे अनेक प्रश्न आजही उपस्थित केले जातात. अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) असो किंवा जिया खान (Jiah Khan) या कलाकारांच्या निधनाने प्रत्येकाला धक्का बसला होता. यामध्ये पहिल्यांदा नाव घेतले जाते ते अभिनेत्री दिव्या भारतीचे. दिव्या भारती ही सर्वात तरुण अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात तामीळ आणि तेलुगू चित्रपटातून केली होती. दिव्याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ला मुंबईमध्ये झाला.

दिव्याने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने १९९० मध्ये ‘बेब्बिली राजा’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. तिला नशिबाने जोरदार साथ दिली आणि बघता बघता ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. दिव्याने अवघ्या तीन वर्षात तब्बल वीस चित्रपट केले. इतकेच नव्हे, तर ९० पेक्षा जास्त चित्रपटात तिने काम करण्यासाठी होकार दिला होता. मात्र विधात्याच्या मनात काही वेगळेच होते. याच काळात दिव्या भारतीचा धक्कादायक मृत्यू झाला. ज्यामुळे प्रत्येकाला जोरदार धक्का बसला होता.

दिव्या भारतीचा पाच एप्रिलला आपल्या राहत्या घरातील पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. मात्र ही हत्या होती की आत्महत्या याचा उलगडा आजही झालेला नाही. तिच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या आईलाही या घटनेने मोठा धक्का बसला होता. या घटनेचा त्यांनी इतका धसका घेतला की, त्या अनेक वर्ष डिप्रेशनमध्ये गेल्या. दिव्याच्या मृत्यूची अनेक वर्ष मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. शेवटी त्यांनी ही आत्महत्या असल्याचे सांगत हा खटला निकाली काढला. दिव्याच्या मृत्यूमध्ये तिचा पती साजिद नाडियाडवालाचा हात असल्याचाही संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र याबद्दल कोणतेही पुरावे मिळू शकले नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा