टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये मागील काही काळापासून महान व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर आधारित मालिका येण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. हिंदी, मराठी दोन्ही भाषांमध्ये हे विषय सुपरहिट होत आहेत. अशा मालिकांमुळे प्रेक्षकांच्या सामान्य ज्ञानातही भर पडत आहे, शिवाय आजच्या पिढीला आपल्या अतिशय महान कर्तृत्व असणाऱ्या महान व्यक्तींची ओळखही होते. सध्या टीव्हीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘एक महानायक डॉक्टर बी. आर. आंबेडकर‘ ही मालिका सुरु आहे. संविधानाचे जनक असणाऱ्या बाबासाहेबांनी समाजाला योग्य दिशा, योग्य विचार देण्यासाठी जो काही लढा दिला त्याचे सविस्तर चित्रण या मालिकेत पाहायला मिळते.
अगदी कमी कालावधीत या मालिकेने लोकप्रियता मिळवली आहे. अजूनपर्यंत हिंदीमध्ये बाबासाहेबांची गाथा समोर आलीच नव्हती. मात्र या मालिकेने हे कार्य करत संपूर्ण देशातील नव्हे जगातील लोकांपर्यंत बाबासाहेबांना पोहचवण्याचे कार्य केले आहे. सध्या चालू असलेल्या मालिकेच्या भागात बाबासाहेबांच्या बालपणीचे चित्रण दाखवले जात आहे. मात्र लवकरच या मालिकेत लीप येणार असून, बाबासाहेबांचे किशोर वय यात दाखवले जाणार आहे. २० जुलैपासून या मालिकेतील नवीन चरण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बाबासाहेबांच्या किशोरवयीन भूमिकेत अथर्व कर्वे आणि रमाबाई यांच्या भूमिकेत श्रावणी अभंग दिसणार आहे.
या नवीन भूमिकेसाठी उत्साहित असलेल्या अथर्व कर्वेने सांगितले, “आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेळेसाठी प्रेरणा असणाऱ्या डॉ बी. आर. आंबेडकर यांची भूमिका निभावण्याची संधी मला मिळाली, ही माझ्याआधी खूप सन्मानाची गोष्ट आहे. मला ही भूमिका साकारण्याची खूप इच्छा होती. आज ही संधी मला मिळाल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचा वारसा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याची प्रतिभा आणि त्यांना मिळालेल्या उपलब्धी या अतुलनीय आहे. ते एक उत्कृष्ट नेता असण्यासोबतच एक महान विचारक, समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, अर्थशास्त्रज्ञ आणि आपल्या संविधानाचे जनक आहे.”
अथर्व पुढे म्हणाला, “या उच्च स्तरावरील व्यक्तिमत्वाची भूमिका माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या पुस्तकांनी मला खूप प्रेरित केले आहे. मी त्यांच्याबद्दल अनेक महान गोष्टी वाचत मोठा झालो आहे. मी कधीच हा विचार केला नव्हता की, मला डॉ. आंबेडकरांची भूमिका साकारायला मिळेल. मी त्यांच्यावर अजून अभ्यास करत आहे. डॉ. आंबेडकरांच्या पुस्तकांसोबतच आमच्याकडे त्यांच्यावर अभ्यास करणारे प्रतिष्ठित शोधक आहे, जे मला ही भूमिका साकारण्यासाठी खूप मदत करत आहे. लवकरच प्रेक्षक मला या भूमिकेत बघणार आहे. मी आशा करतो की त्यांना माझे काम आवडावे.”
तर रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारणारी श्रावणी म्हणाली, “या भूमिकेसाठी माझी निवड झाली याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या चांगल्या नशिबाला देते. ही भूमिका नक्कीच मला अतिशय आनंद देऊन जाणारी आहे, रमाबाई या देखील एक प्रेरणाच होत्या. त्यांच्याबद्दल असणारी माहिती खूपच मर्यादित आहे. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून लोकांना बाबासाहेब आणि रमाबाई यांच्याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. रमाबाई यांनी बाबासाहेबांना अतिशय गुप्त स्वरूपात मोठा पाठिंबा दिला. ही भूमिका मला साकारायला मिळाली, हे माझ्यासाठी खूपच सन्मानजनक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…