Monday, July 1, 2024

‘सीरियल किसर’ इमरान हाश्मीचा ‘तो’ सिनेमा पाहण्यासाठी थेट पाकिस्तानच्या थेटरात झालेली चेंगराचेंगरी

जेव्हाही छोट्या किंवा मोठा पडद्यावर एखादा किसींग सीन लागतो, तेव्हा चटकन डोळ्यांपुढे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी याचा चेहरा येतो. कारण त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीला सिनेमात इतके जबरदस्त सीन दिलेत की, त्याची ओळख ‘सीरियल किसर’ म्हणून पडलीये. खरं तर इमरान हाश्मी हा फिल्मी बँकग्राऊंड असलेल्या कुटुंबातून आला आहे, पण तुम्हाला माहितीये का?, इमरानला त्याची पहिल्याच सिनेमातून हाकालपट्टी केली होती. नंतर त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना झुकवले. यालाच म्हणतात बाऊन्स बॅक. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा या घटनेच्या ६ वर्षांनंतर त्याचा एक सिनेमा आला, तेव्हा भारतातील नाही, तर थेट पाकिस्तानच्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. हाच किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

इमरान हाश्मीने २००३ साली ‘फुटपाथ’ पकडून बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री केली होती. पण कुठंतरी माशी शिंकली. त्याचा ‘फुटपाथ’ फारशी कमाल दाखवू शकला नाही. पण सिनेमासाठी लावलेली रक्कम मात्र, यातनं वसूल झाली. यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच २००४ साली इमरानचा ‘मर्डर’ सिनेमा आला. हा सिनेमा त्यातील गाण्यांसाठी आणि इंटिमेट सीनसाठी लय गाजला. अभिनेत्री मल्लिका शेरावतसोबतच्या त्याच्या किसींग सीनने तर सर्वांनाच घायाळ केलं. त्याचा ‘मर्डर’ हा सिनेमा २००४ मधील सर्वात हिट सिनेमांपैकी एक मानला जातो. या सिनेमानंतरच इमरानला ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर तर त्याने आयुष्यात कधीच मागं वळून पाहिलं नाही.

यानंतर इमरानने ‘जहर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘अक्सर’ आणि ‘गँगस्टर’ सारख्या सिनेमात काम केलं. हे सिनेमे ठीकठाक चालले. पण कहर तर तेव्हा झाला, जेव्हा २००८ साली त्याच्या ‘जन्नत’ सिनेमाने एन्ट्री केली. या सिनेमाने इमरानला टॉप स्टार्सच्या यादीत स्थान मिळवून दिलं. मॅच फिक्सिंगवर आधारित असलेल्या या सिनेमात इमरानने बुकीची भूमिका लीलया पार पाडली होती. या सिनेमातील प्रपोजल सीनचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. भारतात तर हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमाने ४१ कोटींची कमाई केली होती. हाईट तर तेव्हा झाली, जेव्हा हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित झाला होता. पाकिस्तानात रिलीझ होताच, लाहोरमधील थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी अक्षरशः चेंगराचेंगरी झाली होती. आता यात कुणाला इजा झाली की नाही, याबाबत तर काही माहिती नाही, पण इमरानच्या या सिनेमानं पाकिस्तानात कहर केला होता, हे नक्की.

हा किस्सा तर आपण जाणून घेतलाच. आता त्याच्याबद्दल आणखी जरा माहिती घेऊन टाकू म्हणजे कसं एका दगडात दोन पक्षी.

यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या इमरानला कधीही अभिनेता व्हायचंच नव्हतं. त्याला अ‍ॅनिमेशन क्षेत्रात कारकीर्द करण्याची इच्छा होती. इमरानला बॉलिवूडमध्ये प्रवेश करायचा नसला, तरी त्याचे बॉलिवूडशी खूप जवळचे नाते होते. महेश भट्ट हे त्याचे काका आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरूनच इमरानने ‘राज’ आणि ‘कसूर’सारख्या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. यावेळी महेश भट्ट यांनी त्याला अभिनय करण्याचा देखील सल्ला दिला होता. इमरानचा ‘फुटपाथ’ हा डेब्यू सिनेमाही भट्ट कॅम्पचाच. इमरानने यात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

इमरानचे वैयक्तिक आयुष्य
इमरान हाश्मी सिनेमात येण्यापूर्वी रिलेशनशिपमध्ये होता. ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने १४ डिसेंबर, २००६ रोजी त्याची गर्लफ्रेंड परवीन शहानीसोबत लग्न केले. त्याला सतत विचारलं जातं की, त्याच्या सिनेमाबद्दल त्याच्या पत्नीचं काय मत आहे. या प्रश्नाच्या उत्तरात इम्राननं एक किस्सा सांगितला होता. तो म्हणाला होता की, आजपर्यंत त्याने परवीनसोबत फक्त एकच सिनेमा पाहिला आहे. तो म्हणजे ‘मर्डर’. या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी तो पत्नीसोबत बसला होता. सिनेमात कुठेही त्याचा किसिंग सीन आला की, त्याची बायको त्याला जोरात चिमटे काढायची. तो स्क्रीनिंगमधून बाहेर आला, तेव्हा त्याच्या हातावर अनेक ठिकाणी नखे कापल्याच्या खुणा होत्या. पण हळूहळू परवीनला समजले की, इम्रान पडद्यावर जे करतो, तो अभिनय आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कोणत्या भीतीमुळे इंदिरा गांधींनी घातली होती ‘आंधी’ सिनेमावर बंदी?
पालथ्या घड्यावर पाणी! जबरदस्त स्टारकास्ट असूनही सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ सिनेमे
आमिरने जुहीसोबत केले होते किळसवाणे कृत्य, मग तिनेही ७ वर्षे पाहिलं नव्हतं त्याचं तोंड

हे देखील वाचा