रमेश देव म्हणजे मराठीतले देखणे व्यक्तिमत्व. रमेश देव यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास अपूर्णच आहे. रमेश देव यांनी मराठी चित्रपटांमध्ये एन्ट्री केली आणि मराठी इंडस्ट्रीला एक राजबिंडा अभिनेता आणि खलनायक मिळाला. त्यांनी अतिशय उत्तम आणि लक्षात राहणारे सिनेमे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला दिले. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1926 साली कोल्हापूरमध्ये झाला.
रमेश देव यांचे मूळ राजस्थानमधल्या जोधपूरचे, मात्र त्यांचे इंजिनियर असलेले पणजोबा राजश्री शाहू महाराजांच्या महालाच्या निर्मितीसाठी कोल्हापूरमध्ये आले आणि इकडचेच झाले. रमेश देव यांचे खरे आडनाव ठाकूर. त्यांना देव हे आडनाव राजश्री शाहू महाराजांकडून मिळाले.
गेल्या अनेक दशकांपासून या क्षेत्रात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या रमेश देव यांनी 1951 साली आलेल्या ‘पाटलाची पोर’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. या सिनेमात त्याची भूमिका छोटी असली तरी लक्षात राहण्यासारखी होती. त्यानंतर 1956 साली आलेल्या राजा परांजपे यांच्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदाच मुख्य खलनायक रंगवला. त्यानंतर त्यांच्या अभिनयाचा अविरत प्रवास सुरु झाला.
रमेश देव यांनी जरी अनेक सिनेमात खलनायक रंगवला असला तरी त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वावर त्याकाळी अनेक मुलींचा जीव भाळला होता. रमेश देव यांनी असंख्य मराठी सिनेमांमध्ये नायक आणि खलनायक रंगवला. त्यांच्या प्रभावी आणि उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी रसिकांच्या मनावर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले.
एकीकडे मराठीमध्ये रमेश देव त्यांच्या प्रतिभेची भुरळ घालत असतानाच, दुसरीकडे राजश्री प्रॉडक्शनने त्यांना त्यांच्या 1962 साली आलेल्या ‘आरती’ या सिनेमात काम करण्याची संधी दिली, आणि त्यांचे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण झाले. रमेश देव यांनी त्यांच्या जिवंत अभिनयाने हिंदी प्रेक्षक, दिग्दर्शक आणि समीक्षक सर्वाना त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. 1971 साली आलेला ‘आनंद’ हा सिनेमा रमेश देव यांच्या हिंदी करियरला एक उंची प्राप्त करून देणारा सिनेमा ठरला. या चित्रपटातली डॉ. प्रकाश कुलकर्णी ही त्यांची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेबद्दलचा एक किस्सा त्यांनी त्यांच्या ‘या सुखांनो या’ आत्मचरित्रात सांगितला आहे.
रमेश देव हेमंत कुमार यांच्या ‘बीस साल पहले’ सिनेमाचे शूटिंग करत होते. या सिनेमात त्यांची भूमिका व्हिलनची होती. सिनेमातील एका सीनचे शूटिंग फिल्मीस्थान स्टुडिओमध्ये चालू होते. हा सीन भरपूर मोठा, बरेच संवाद आणि वेगवेगळे एक्सप्रेशन असलेला होता, मात्र रमेश देव यांनी हा सीन पहिल्याच टेकमध्ये ओके केला. त्यावेळी तिथे उपस्थित एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याजवळ येत त्यांचे भरभरून कौतुक केले. सोबतच त्या सिनेमाचे निर्माता – गायक हेमंत कुमार यांनी देखील त्याचे कौतुक करत त्या अनोळखी व्यक्तीला रमेश देव यांच्या मराठी चित्रपटांमधील कामाबद्दल सांगितले.
मराठीमधील आघाडीचे अभिनेते असूनही रमेश देव हिंदीमध्ये सहायक, छोट्या आणि नकारात्मक भूमिका करायला कसे तयार होतात, याचे त्या अनोळखी व्यक्तीला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी रमेश देव यांना याबद्दल विचारले देखील, त्यावर देव म्हणाले, ” मी आतापर्यंत फक्त दोन-तीन हिंदी चित्रपटांमध्ये काम केले, जर मी आतापासूनच भूमिकांबद्दल जास्त विचारू लागलो, किंवा मोठ्या भूमिकांसाठी अडून बसलो तर मला याही भूमिका मिळणार नाही.”
काही दिवसांनी देव यांना एक फोन आला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी भेटायला बोलवले गेले. रमेश देव दिलेल्या वेळेच्या अर्धा तास अधिक त्या ठिकाणी पोहचले. जेव्हा ते तिथे पोहचले तेव्हा त्यांना ती अनोळखी व्यक्ती सुद्धा तिथे दिसली, आणि थोड्या वेळाने त्यांना समजले की, ती अनोळखी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध चित्रपट निर्माता हृषिकेश मुखर्जी आहेत. त्या बैठकीत मुखर्जी यांनी रमेश देव आणि सीमा देव यांना आनंद सिनेमातील डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि सुमन कुलकर्णी या विवाहित जोडप्याच्या भूमिकेची ऑफर दिली. देव यांनी देखील ती ऑफर आनंदाने स्वीकारली आणि पुढे हीच भूमिका त्यांची ओळख बनली.
रमेश देव यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सुमारे 300 हिंदी सिनेमे, 200 मराठी सिनेमे, 40 च्या आसपास नाटकं शिवाय काही हिंदी, मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. रमेश देव यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील खूपच इंटरेस्टिंग आहे, आणि त्यातच त्यांची प्रेम कहाणी तर अजूनच इंटरेस्टिंग.
रमेश देव यांनी 1953 साली अभिनेत्री सीमा देव यांच्यासोबत लग्न केले. या दोघांची पहिली भेट खूपच रंजक होती.
सीमा देव सिनेमात काम मिळावे म्हणून फिल्मीस्थानमध्ये ऑडिशन देण्यासाठी त्यांच्या आईसोबत चर्नी रोडवरून लोकलमध्ये चढल्या. त्यावेळी सीमा फक्त 15 वर्षांच्या होत्या. त्या त्यांच्या आईची साडी नेसून मोगर्याचा गजरा डोक्यात माळून ऑडिशनसाठी निघाल्या होत्या. ग्रँटरोडवर रमेश देव त्याच लोकलमध्ये चढले. त्या वेळी ‘आंधळा मागतो एक डोळा’ चित्रपट प्रदर्शित झाला असल्याने रमेश देव यांना लोकांनी ओळखण्यास सुरुवात केली होती. त्या सिनेमात रमेश यांची खलनायकाची भूमिका होती.
सीमा यांनी त्यांना पाहताचक्षणी ओळखले आणि आईला सांगितले, हेच आंधळा मागतो एक डोळा सिनेमातील दुष्ट खलनायक आहे. त्यावर त्यांच्या आईने त्यांना रागावून त्यांच्याकडे बघू नको असे सांगितले. सीमा यांनी लावलेल्या मोगर्याच्या गाजऱ्याचा संपूर्ण डब्यात सुगंध पसरला होता.
संपूर्ण डबा रिकामा असतानाही रमेश देव सीमांच्या बाजूला जाऊन बसले. ते पाहून सीमाच्या आई रागावल्या. तर त्यांना रमेश यांनी तुम्ही सगळा डबा विकत घेतला आहे का? असा प्रतिप्रश्न केला. हा प्रश्न ऐकून सीमांच्या आई शांत झाल्या. हीच रमेश आणि सीमा देव यांची पहिली भेट होती. पहिल्या भेटीतच रमेश सीमांच्या प्रेमात पडले. सुंदर मुलगी आहे आता हिला पटवावे असेच त्या वेळी माझ्या मनात आल्याचे रमेश देव आज प्रांजळपणे कबूल करतात.
काही वर्षांनी या दोघांनी लग्न केले. या दोघांनी अजिंक्य आणि अभिनव असे दोन मुलं आहेत. रिअल-लाइफ कपलने तब्बल 73 चित्रपटांमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नचा 50वा वाढदिवस झाला तेव्हा त्याच्या मुलांनी हा वाढदिवस खूप जंगी साजरा करत आई-बाबांच्या लग्नाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे लग्न लावून दिले होते. विशेष म्हणजे यासाठी खास पत्रिका छापण्यात आल्या होत्या. या लग्नाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अनिल कपूर, हेमामालिनी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
रमेश देव यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक मोठ्या पुरस्करानी देखील सन्मानित करण्यात आले आहे.
अशा या दमदार आणि जेष्ठ कलाकाराला दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.(evergreen marathi ractor amesh deo turns 92 today the legendary actor in the hindi marathi film industry)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रेखाच्या मांडीवर दिसणारी ही चिमुरडी आहे तरी काेण? आज आहे बाॅलिवूडची स्टार
इलियाना डिक्रूझ रुग्णालयात दाखल! अभिनेत्रीच्या प्रकृतीसाठी चाहत्यांची प्रार्थना