Wednesday, July 3, 2024

दुःखद! प्रसिद्ध गीतकार इब्राहिम अश्क यांचे निधन, कोरोनाची झाली होती लागण

बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गीतकार इब्राहिम अश्क (Ibrahim Ashk) यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. ७० वर्षीय इब्राहिम अश्क यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि या विषाणूमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

इब्राहिम यांचे रविवारी (१६ जानेवारी) दुपारी ४ वाजता, मुंबई जवळील मीरा रोड येथील मेडीटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूला त्यांची मुलगी मुसाफा खान हिने दुजोरा दिला आहे. इब्राहिम अश्क यांनी चित्रपट जगताला अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात ‘कहो ना प्यार है’ या लोकप्रिय चित्रपटाच्या टायटल सॉंगचा समावेश आहे. (famous lyricist ibrahim ashk dies due to corona virus)

मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम अश्क यांना शनिवारी (१५ जानेवारी) सकाळी खोकला झाला आणि त्यानंतरच त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तपासणी केली असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ते हृदयाचे देखील रुग्ण होते आणि त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. इब्राहिम अश्क यांच्यावर आज सकाळी मीरा रोड येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

इब्राहिम अश्क यांचा जन्म मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात झाला. ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘वेलकम’, ‘जानशीन’, ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी उत्कृष्ट गाणी लिहिली आहेत. याशिवाय ते कवीही होते. मात्र, त्यांनी पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा