प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री बाबिलोना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. बाबिलोनाचा भाऊ विघ्नेश कुमारचा मृतदेह गुरुवारी त्याच्या राहत्या घरात आढळला. विघ्नेश 40 वर्षांचा होता आणि त्याचे निधन कसे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माध्यमातील वृत्तानुसार, विघ्नेश चेन्नईतील सालीग्रामम येथील दशरथ पुरममधील एका अपार्टमेंटमध्ये एकटाच राहत होता. गुरुवारी, त्याचा एक मित्र त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचा फोन उचलला जात नव्हता. मित्राने विघ्नेशच्या घरी जाऊन पाहिले, परंतु घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार ठोठावूनही कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मित्राला संशय आला आणि त्याने विरुगंबक्कम पोलीस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला. त्यांना बेडरूममध्ये विघ्नेशचा मृतदेह सापडला. विघ्नेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील अरकोनम तालुक्यात असलेल्या किलपक्कम गावातील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. अभिनेत्री बाबिलोनाच्या भावाचे निधन झाल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश गेल्या अनेक वर्षांपासून दारूच्या व्यसनामुळे ग्रस्त होता. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. त्यामुळे विघ्नेशचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
विघ्नेशची आई माया यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी विघ्नेशची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेशचा पोलिस ठाण्यात मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्याच्यावर अनेक गुन्ह्यांचा आरोप आहे, त्याला अनेकदा अटक झाली होती आणि तो तुरुंगातही राहिला होता. (Famous Tamil actress Babylona brother Vignesh Kumar passed away)
आधिक वाचा-
–एकेकाळी लता मंगेशकरांसाठी आव्हान होत्या अनुराधा पौडवाल, मात्र ‘या’ एका निर्णयाने बदलले करिअर
–सलमान आणि कतरिनाच्या कैफच्या ‘टायगर ३’ च्या चित्रपटाची ‘या’ दिवशी होणार ऍडव्हान्स बुकिंग सुरु, जाणून घ्या तारीख