हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयासोबतच आपल्या डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकवर्गाला पुरते घायाळ केले आहे. यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचा समावेश होतो, ती अभिनेत्री इतर कोणी नसून ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आहे. माधुरीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘अबोध’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटातील तिच्या स्मितहास्याने लाखो तरुणांची मने जिंकली होती. या चित्रपटानंतर ती एका पाठोपाठ एक अशा अनेक चित्रपटात झळकू लागली. पाहता पाहता तिने प्रसिद्धीचे शिखर गाठले आणि ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली. ती ज्या चित्रपटात काम करायची, तो चित्रपट आधीच हिट होणार असल्याचे समजले जायचे. कदाचित असा कोणतातरी व्यक्ती असावा, ज्याला माधुरीचे नाव माहिती नसेल. मात्र, असा एक व्यक्ती होता. त्याच्याबद्दल वाचून तुम्हीही चकित व्हाल.
खरं तर, माधुरीला संपूर्ण जग ओळखत होते. मात्र, तिचा होणारा पती डॉ. श्रीराम नेने हे तिच्याशी अपरिचित होते. त्यांनी तिचे नाव पहिल्यांदाच ऐकले होते. वाचून चकित झालात ना? माधुरीला पहिल्यांदा भेटण्यापूर्वी ते तिला ओळखत नव्हते. इतकेच नाही, तर त्यांनी हेदेखील माहिती नव्हते की, माधुरी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) माधुरी आणि श्रीराम आपल्या लग्नाचा २२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी आपण जाणून घेऊया त्यांची प्रेमकहाणी कशाप्रकारे सुरू झाली. चला तर मग सुरुवात करूया… (Happy Anniversary Shriram Nene Did Not Know Madhuri Dixit Before Marriage Love Story Started With Bike Ride)
पहिली भेट
एका मुलाखतीत माधुरीने खुलासा केला होता की, “डॉक्टरांशी (श्रीराम नेने) माझी पहिली भेट योगायोगाने भावाच्या पार्टीमध्ये (लॉस एंजेलिस) झाली होती. तिथे मी हे जाणून हैराण झाले होते की, त्यांना माहिती नाही की, मी एक अभिनेत्री आहे आणि बॉलिवूड चित्रपटात काम करते.”
बाईक राईडने सुरू झाली प्रेमकहाणी
आपल्या मुलाखतीत पुढे बोलताना माधुरीने सांगितले होते की, “आमच्या भेटीनंतर डॉ. नेने यांनी मला विचारले होते की, तुम्ही माझ्यासोबत पर्वतांवर बाईक रायडिंगसाठी याल का? मला वाटले की, ठीक आहे, पर्वतही आणि बाईकही. मात्र, पर्वतांवर गेल्यानंतर मला जाणवले की, हे कठीण आहे.”
डेटिंग
यानंतर पुढे बोलताना ती म्हणाली होती की, “यानंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो, ज्यानंतर आमच्यात प्रेम फुलू लागले. पुढे आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरू केले आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.”
जेव्हा माधुरीने नेने यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ती बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती.
अडकले लग्नबंधनात
माधुरीने श्रीराम नेने यांच्यासोबत १७ ऑक्टोबर, १९९९ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर ती श्रीराम यांच्यासोबत यूएसमध्ये शिफ्ट झाली होती. तसेच चित्रपटांपासून विश्रांती घेतली होती. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांचे नाव अरिन आणि रायन आहे.
लग्नानंतर माधुरीने सन २००७ मध्ये ‘आजा नचले’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शेवटची ती ‘कलंक’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, क्रिती सेनन, कियारा आडवाणी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता.
माधुरीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत ‘दयावान’, ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘दिल’, ‘बेटा’, ‘राजा’, ‘हम आपके हैं कौन’, ‘कोयला’, ‘देवदास’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केवळ ‘या’ अभिनेत्याला ओळखू शकले होते श्रीराम नेने, माधुरी दीक्षितने केला खुलासा
-माधुरीसोबत हिट देऊन एका रात्रीत बनला स्टार, तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं संजय कपूरचं नाव
-अल्प आयुष्यामुळे स्मिता पाटील यांच्या ‘या’ तीन इच्छा राहिल्या अपुऱ्याच; पाहा काय होती त्यांची स्वप्ने