नाकातून गाण्यामुळे केले जायचे ट्रोल; तर आजही अबाधित आहे हिमेशच्या अल्बमने बनवलेले रेकॉर्ड; वाचा त्याचा प्रवास


हिंदी सिनेमे आणि गाणी या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. बॉलिवूड सिनेमे हे संगीत आणि गाण्यांशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाहीत. सिनेमांमध्ये कथा, अभिनय चांगला नसेल तरी गाण्यांच्या बळावरही चित्रपट हिट झाल्याची बरीच उदाहरणं आहेत. अशा या मोठ्या संगीत क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा सर्वांचीच असते. मात्र मेहनत, चिकाटी आणि नशिबाच्या साथीने या क्षेत्रात यश मिळवले जाते. खूप कमी लोकांमध्ये हे तिन्ही गुण असतात आणि यांच्याच बळावर ते यशस्वी होतात. या क्षेत्रात असे अनेक गायक आहेत ज्यांनी स्वबळावर यश संपादन केले आहे. असाच एक गायक आणि संगीतकार म्हणजे हिमेश रेशमिया. हिमेशने त्याच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवले आणि बॉलिवूडमध्ये एक गायक, संगीतकार ही ओळख निर्माण केली. त्याने त्याच्या हटके आवाजाने देखील एक वेगळीच ओळख मिळवली आहे. आज हिमेश त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

हिमेशचा जन्म २३ जुलै १९७३ रोजी गुजरातमध्ये झाला होता. त्याचे वडील विपीन रेशमिया हे गुजराती चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शक होते. हिमेशच्या वडिलांची खूप इच्छा होती की, त्याने संगीत क्षेत्रात करिअर करावे. त्यांनी हिमेशला या क्षेत्रात येण्यासाठी खूप मदत केली आणि पाठिंबा देखील दिला. वडिलांच्या इच्छेखातर त्याने या क्षेत्रात येण्याचे ठरवले आणि मेहनतीने यश देखील मिळवले. (happy birthday himesh reshammiya know his amazing facts)

हिमेशला त्याचा पहिला मोठा ब्रेक सलमान खानने दिला. सलमानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटासाठी हिमेशने संगीत दिले. या सिनेमातील गाणी तुफान गाजली आणि यशाने हिमेशचे स्वागत केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढे त्याने ‘बंधन’, ‘हमराज’, ‘हॅलो ब्रदर’, ‘दुल्हन हम ले जायेंगे” अशा चित्रपटांसाठी देखील संगीत दिले. २००३ साली आलेल्या ‘तेरे नाम’ सिनेमाला संगीत दिल्यानंतर तर त्याचे जीवनच बदलून गेले. या सिनेमाने त्याच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडत, त्याला अनेक पुरस्कारही मिळवून दिले.

हिमेश इंडस्ट्रीमध्ये आला आणि त्याने संगीत दिलेले सर्वच सिनेमांचे संगीत तुफान गाजले. मात्र तरीही हिमेशवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे तो गात असलेले नाकातून गाणे. मात्र, तरीही त्याने यासर्वांकडे दुर्लक्ष करत, आपले काम सुरुच ठेवले आणि नाकातून गाणे हीच त्याची नवीन ओळख बनली.

चित्रपटांना संगीत देत असतानाच २००७ साली हिमेशने त्याचा ‘आप का सुरूर’ म्युझिक अल्बम प्रदर्शित केला. या अल्बमने संगीत क्षेत्रात यशाची मोठी लाट निर्माण केली. हिमेशचा पहिला अल्बम असणारा ‘आप का सूरूर’ त्यावेळी तुफान गाजला. या अल्बमने भारतीय संगीत उद्योगाच्या इतिहासात अजूनही सर्वाधिक विक्री होणारा अल्बम म्हणून रेकॉर्ड तयार केले.

हिमेशने सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये आपली खास स्टाईल निर्माण केली होती. गाण्याच्या स्टाईलपासून ते कॅप परिधान केलेल्या लूकपर्यंत तो चाहत्यांना नेहमीच पसंत पडला. हिमेश सुरुवातीच्या काळात कधीच बिना टोपीचा दिसला नाही. जेव्हा तो पहिल्यांदा टोपीशिवाय दिसला, तेव्हा तर ही मोठी बातमीच बनली होती.

संगीतकार, गायक, गीतकार, लेखक, निर्माता अशा सर्वच भूमिका सांभाळणाऱ्या हिमेशने गाण्यात यश मिळवल्यानंतर अभिनयातही नशीब आजमावले. पण येथे त्याला म्हणावे तसे यश आणि चाहत्यांचे प्रेम जास्त मिळाले नाही. हिमेशने काही हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका सुद्धा केली होती. मात्र त्याला संगीतकार हीच ओळख मिळाली.

हिमेशला त्याच्या गाण्यांसाठी आजपर्यंत अनेक लहानमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये सादरीकरण करणारा हिमेश पहिला भारतीय कलाकार ठरला. इतकेच नाही तर दीपिकाला सर्वात आधी कॅमेरासमोर ‘दिल की सुर्ख दिवारो पे’ गाण्यातून पहिल्यांदा तोच घेऊन आला होता.

हिमेशने १९९५ साली कोमल नावाच्या महिलेसोबत लग्न केले. त्यांना स्वयम नावाचा एक मुलगा देखील आहे, मात्र लग्नाच्या २२ वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने २०१८मध्ये त्याच्या मुंबईतील घरी प्रेयसी सोनिया कपूरसोबत लग्न केले. हिमेश-सोनियाच्या लग्नाला त्याचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या सोहळ्याला त्याचा मुलगा स्वयम हाही उपस्थित होता.

आजपर्यंत हिमेशने ८०० पेक्षा अधिक गाणी लिहिली असून, १२० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. हिमेश नेहमीच वेगवेगळे रियॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसतो. सध्या तो इंडियन आयडॉलच्या १२ व्या पर्वाचे परीक्षण करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कुरूप तुम्ही नाही तर समाज आहे…’; जॅकलिन फर्नांडिसने केवळ टॉवेलने शरीर झाकत दिली फोटोसाठी पोझ

-वाढत्या वयात आईने भेट दिले होते ‘सेक्स एज्युकेशन’चे पुस्तक; इरा खानने सोशल मीडियावर केला खुलासा

-एकेकाळी कापड गिरणीमध्ये करायचा काम, तर आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; वाचा साऊथ इंडस्ट्रीच्या ‘सिंघम’बद्दल


Leave A Reply

Your email address will not be published.