‘हा’ माणूस नसता तर सलमान सुपरस्टार झाला नसता, जाणून घ्या सलमानला ‘प्रेम’ नाव देणाऱ्या दिग्गजाबद्दल


हिंदी सिनेसृष्टीमधे आजपर्यंत सर्वच विषयांवर आधारित सिनेमे तयार झाले आहे. रोमँटिक सिनेमापासून ते थ्रिलर, सस्पेन्स, अगदी अनेक महान लोकांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या बायोपिक देखील आल्या. असे सिनेमे करत काही दिग्दर्शकांनी त्या विशिष्ट प्रकारच्या सिनेमांसाठी स्वतःची अशी ओळख निर्माण केली. उदाहरण द्यायचे झाले तर अनुराग कश्यप सर्वांचं माहित आहे. त्याच्या सिनेमांमध्ये अनेक शिव्या आणि वेगळ्या भाषेचा वापर जास्त असतो. करण जोहर सध्या जरी सर्व प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करत असला तरी दिग्दर्शक म्हणून त्याने अनेक रोमॅंटिक सिनेमे तयार केले.

असेच जर सुरज बडजात्या हे नाव घेतले तर सर्वाना आठवते ते कौटुंबिक सिनेमे आणि मुख्य म्हणजे सलमान खान. तसे पहिले तर सुरज बडजात्या यांनीच सलमान खानला सुपरस्टार बनवले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ९० च्या काळात सुरज यांनी ‘मैने प्यार किया’ सिनेमा दिग्दर्शित केला आणि बॉलिवूडला या सिनेमाने दोन उत्तम कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक दिले. आज ह्याच सुरज बडजात्या यांचा वाढदिवस.

सूरज बडजात्या यांचा जन्म २२ फरवरी १९६४ रोजी मुंबईमध्ये एका जैन परिवारात झाला. सुरज यांचे बालपण चित्रपटांच्या अवती भवतीचे गेले. त्यांच्या आजोबांनी १९४७ मध्ये राजश्री प्रोडक्शनची स्थापना केली. याच राजश्रीला यशाचा मेरू चढवला तो सुरज यांनी. त्यांनी राजश्रीला मोठे करतानाच ‘प्रेम’ला म्हणजेच सलमान खानला देखील मोठे केले. आज या लेखातून आपण सुरज यांच्या काही सुपरहिट सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत.

मैने प्यार किया :
१९८९ साली सुरज यांनी या सिनेमातून त्यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. याच सिनेमाने सलमान आणि भाग्यश्रीला प्रचंड स्टारडम मिळवून दिले. या सिनेमाला फिल्मफेयरच्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

हम आपके हैं कौन :
१९९४ साली सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असणारा ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एकच धमाका झाला. या सिनेमाला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यशाचे आणि कमाईचे नवीन रेकॉर्ड तयार केले. या चित्रपटात अनेक मोठ्या आणि दिग्गज कलाकारांची फौज होती. हम आपके हैं कौन मध्ये तब्बल १४ गाणे होते, आणि सर्व गाणे सुपरहिट. हा सिनेमा राजश्रीचा ‘नादिया के पार’ सिनेमाचा रिमेक होता. हम आपके हैं कौन सिनेमाने लग्न आणि लग्नातील रीतींना नवीन ओळख मिळवून दिली.

हम साथ साथ है :
सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, मोहनीश बहल, सोनाली बेंद्रे या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणारा १९९९ साली आलेला हा सिनेमा देखील तुफान लोकप्रिय झाला. हा सिनेमा देखील राजश्रीच्या मागील सिनेमाप्रमाणेच कुटुंब आणि कौटुंबातील नाती यांवर आधारित होता. या सिनेमातील गाणी देखील खूप हिट झाले. याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान आणि इतर काही कलाकारांवर हरणाची शिकार केल्याचा आरोप झाला होता. बाकी कलाकार तर या आरोपातून मुक्त झाले मात्र अजूनही सलमान या केसमधून बाहेर पडला नाहीये.

विवाह :
२००६ साली आलेल्या शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला. अरेंज मॅरेंजवर भाष्य करणाऱ्या या सिनेमातून शाहिद आणि अमृताच्या अभिनयाचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांसमोर आला. या सिनेमात शाहिद कपूरच्या पात्राचे नाव देखील प्रेम ठेवण्यात आले होते.

प्रेम रतन धन पायो :
२०१५ साली आलेल्या या सिनेमातून सुरज यांनी नऊ वर्षांनी कमबॅक केले. यावेळेस पुन्हा त्यांनी सलमान खान सोबत काम केले. या सिनेमातून त्यांनी आणि सलमान खान यांनी तब्बल १६ वर्षांनी सोबत काम केले. सलमान सोबत या सिनेमात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती.


Leave A Reply

Your email address will not be published.