टॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘देव’ ‘थलायवा’ म्हणजेच रजनीकांत यांचा आज ७० वा वाढदिवस. रजनीकांत यांनी अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, मेहनतीने सुपरस्टार हे बिरुद मिळवले. रजनीकांत यांनी सुरुवातीच्या दिवसात पैसे कमावण्यासाठी कुली पासून बस कंडक्टर पर्यंत अनेक कामे केली. हेच रजनीकांत आज टॉलिवूड इंडस्ट्रीचा ‘देव’ बनले आहे.
१२ डिसेंबर १९५० मध्ये बंगलोर मध्ये एका गरीब मराठी कुटुंबात रजनीकांत यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव शिवाजी गायकवाड हे आहे. ते ४ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. चार भावंडांमध्ये रजनीकांत सर्वात लहान, आई गेल्यानंतर उदर्निवाहासाठी कुलीचे काम स्वीकारले, त्यानंतर त्यांना बंगलोरच्या परिवहन मंडळात बस कंडक्टरची नोकरी मिळाली. तरीही मोठा पडदा त्यांना खुणवत होता.
चित्रपटात अभिनय करण्याची त्याची इच्छा अजून तशीच होती. रजनीकांत यांनी त्याचा मित्र राज बहादूर याच्या मदतीने मद्रासच्या फिल्म इन्स्टिटयूट मध्ये प्रवेश घेतला. अभिनयात डिप्लोमा घेऊन त्यांनी ‘अपूर्व रागनगाल’ या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला अनेक वर्ष त्यांनी नकारात्मक भूमिकाच निभावल्या. त्यानंतर ‘बिल्ला’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता निभावला. हा सिनेमा सुपरहिट झाला मग मात्र रजनीकांत यांनी मागे वळून कधीच पहिले नाही. त्यांची स्टाईल, त्याचे संवाद, त्यांचा डान्स आदीं गोष्टी त्यांची ओळख बनली आणि ह्या गोष्टी खूपच लोकप्रिय झाल्या. थिएटरमध्ये रजनीकांत यांच्या चित्रपटांचे पहाटे पासूनच शो सुरु होऊ लागले. त्यांना देवाचा दर्जा देऊन लोकं त्यांना दुधाचा अभिषेक देखील करत.
साऊथ मध्ये आपला दबदबा निर्माण करत असताना त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही प्रवेश केला. ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. त्यानंतर त्यांनी हिंदी मध्ये हम, चालबाज, बुलंदी, गिरफ्तार, मेरी अदालत, जॉन जॉनी जनार्दन, भगवान दादा आदी चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे रजनीकांत यांनी तामिळ, हिंदी भाषेसह तेलगू, बंगाली, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. रजनीकांत हे सर्वात जास्त फी घेणारे अभिनेते म्हणून देखील ओळखले जातात.
रजनीकांत यांना त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००० साली त्यांना सर्वोच्च असा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशा सुपरस्टार अभिनेत्याला दैनिक बोंबाबोंकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.