Friday, July 5, 2024

कौतुकास्पद! ४ वर्षांत सयाजी शिंदे यांच्यासह निसर्गप्रेमींनी ‘या’ ओसाड परिसराचे केले हिरव्यागार वनराईत रूपांतरित

आज निसर्गाची होत असेलेली वाईट अवस्था पाहता अनेक कलाकार झाडे लावण्यासाठी पुढाकार घेत आहेत. जेणेकरून त्यांच्या या मोहिमेतून प्रेरणा घेत सर्वसामान्य लोकही त्याचा अवलंब करतील. या कलाकारांपैकी एक अभिनेते सयाजी शिंदे आहेत.

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रामवाडी गावाची गणना अवर्षणप्रवण क्षेत्रात होते. ४० वर्षांपूर्वीपर्यंत येथील जमीन नापीक समजली जात होती. पण आज तिथे पोहोचलात, तर तोच डोंगराळ भाग हिरव्यागार झाडांनी भरलेला दिसेल. मराठी आणि हिंदीसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या एनजीओने ही आश्चर्यकारक कमाल केली आहे.

एका अनोख्या उपक्रमात, एनजीओशी संबंधित निसर्गप्रेमींच्या गटाने गेल्या चार वर्षांत ३० हजारांहून अधिक झाडे लावून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील एका ओसाड डोंगराळ भागाचे हिरव्यागार जंगलात रूपांतर केले आहे. लातूर जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर रामवाडी गावाजवळ वनविभागाच्या अखत्यारीतील डोंगराळ भाग आहे.

प्रशासनही करेल सहकार्य
सयाजी शिंदे संचलित ‘सह्याद्री देवराई’ या स्वयंसेवी संस्थेच्या बॅनरखाली निसर्गप्रेमींनी २०१८ पासून जिल्ह्यातील चाकूर तालुक्‍यातील बालाघाट रांगेतील सुमारे २५ हेक्टर ओसाड डोंगर परिसरात वृक्षारोपण केले. या प्रयत्नाचे कौतुक करताना चाकूरचे तहसीलदार (महसूल अधिकारी) डॉ. शिवानंद बिडवे म्हणाले की, या मोहिमेला स्थानिक प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तहसीलदार बिडवे यांनी संस्थेच्या २५ हेक्टर डोंगराळ भागात वृक्षारोपण मोहिमेचे कौतुक केले. बिडवे यांनी वृक्षारोपण मोहिमेबद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचेही कौतुक केले.

४०० वर्ष जुन्या वटवृक्षापासून प्रेरित
एनजीओचे लातूर जिल्हा समन्वयक सुपरण जगताप यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “शिंदे यांनी २०१८ मध्ये लातूरमधील चाकूर तहसीलच्या झरी (खुर्द) गावात ४०० वर्ष जुना वटवृक्ष पाहिला आणि त्या झाडाखाली कार्यशाळा केली. ज्याने त्यांनी पर्यावरणवाद्यांना हा मुद्दा उचलण्यासाठी प्रेरित केले.”

संस्थेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर आणि शेतकरी अशा विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग होता. ते दर आठवड्याला या ठिकाणी जायचे, शारिरीक व्यायामासारख्या उपक्रमात गुंतून झाडे लावताना संबंधित सामाजिक विषयांवर चर्चा करत असत. जगताप म्हणाले की, त्यांनी डोंगराळ भागात वड, कडुनिंब, पिंपळ यासह सुमारे ६० जातींची ३५,००० हून अधिक झाडे लावली आणि त्यापैकी ३०,००० झाडे जगली आणि वाढली.

एक लाख झाडे लावण्याचे आहे लक्ष
जगताप म्हणाले की, “एक लाख झाडे लावण्याची आणि नंतर हा परिसर सर्वांसाठी अभ्यासकेंद्र आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची आमची मोहीम आहे.” संस्थेचे कार्यकर्ते भीम डुंगवे म्हणाले की, “अभिनेते सयाजी शिंदे यांनी लोकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने ही चळवळ सुरू केली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे.

स्थानिक पर्यावरणवादी आणि संघाचे सदस्य शिवशंकर चापुले म्हणाले की, अनेक भागात झाडे तोडल्यामुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांची संख्या घटली आहे. ते म्हणाले की, “पूर्वी पक्षी पिकांचा नाश करणारे हानिकारक कीटक खात असत. परंतु आता पक्ष्यांची लोकसंख्या कमी झाल्यामुळे, शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी कीटकनाशके आणि रसायनांची फवारणी करतात ज्याचा परिणाम मानवांवर आणि त्यांच्या जीवनावर होतो. म्हणूनच आम्ही या डोंगराळ भागाचे जंगलात रुपांतर करून समाजात निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यांनी हा उपक्रम राबवण्यामागचा उद्देश स्पष्ट केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा