हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचे नाव मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. अशातच तिच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीला देशाबाहेर जाण्यापासून पोलिसांनी मुंबई विमानतळावर अडवले आहे. २०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात जॅकलिनचे नावही ईडीच्या आरोपपत्रात सामील आहे. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, वसुली प्रकरणातील मास्टरमाईंड सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) जॅकलिनला १० कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्यात आलिशान गाडी, घोडे आणि इतर महागड्या वस्तूंचाही समावेश आहे.
दरम्यान ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) आणि जॅकलिन यांनी जानेवारी २०२१ पासून एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला १० कोटींहून अधिक किमतीच्या महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. महागड्या भेटवस्तूंमध्ये दागिने, हिरे जडवलेल्या दागिन्यांचा सेट, क्रॉकरी, चार पर्शियन मांजरी (सुमारे ९ लाख रुपये किमतीची एक मांजर) आणि ५२ लाख रुपयांचा घोडा यांचा समावेश होता. सुकेशने जॅकलिनच्या भावंडांनाही मोठी रक्कम पाठवली होती. ईडीने जॅकलिनचे जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.
याव्यतिरिक्त सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटी रुपयांहून अधिक होती. तिहार तुरुंगातून २०० कोटींच्या वसुलीसाठी मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात ही बाब समोर आली आहे.
सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात असताना तिथून तो बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनशी मोबाईलवर बोलायचा. जामीनावर बाहेर आल्यानंतर सुकेशने चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती. त्याने जॅकलिनसाठी मुंबई ते दिल्ली एक चार्टर्ड फ्लाईटही बुक केली होती. सुकेश आणि जॅकलिन चेन्नईतील एका हॉटेलमध्येही थांबले होते. जामीनावर तुरुंगाबाहेर असताना सुकेशने खासगी विमानातून विमान प्रवासासाठी सुमारे ८ कोटी रुपये खर्च केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…