Thursday, April 18, 2024

हिरव्या रंगाची पैठणी, सोबत अंबाडा त्यावर गजरा अन् नाकात नथ, मुंबईत परतल्यावर कंगना सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

आपल्या सडेतोड वक्तव्यांनी नेहमी चर्चेत आणि वादात असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ट्विटर वाद जगजाहीर आहे. कंगना हा वाद झाल्यानंतर मुंबई बाहेर काही दिवस होती पण नुकतीच टी पुन्हा मुंबईत आली आहे. बऱ्याच दिवसानंतर कंगना मुंबईत परतल्यानंतर तिने तिच्या बहिणीसोबत सिद्धिविनायक गणपती आणि मुंबादेवी यांचे दर्शन घेतले.

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहेत. हे फोटो शेयर करताना तिने लिहले आहे की, ” माझ्या प्रिय मुंबई शहरासाठी उभे राहिल्यावर मला जेवढा तिरस्कार मिळाला, ते पाहून मी आश्चर्यचकित झाले आहे. आज मी सिद्धिविनाक आणि मुंबा देवी यांचे दर्शन घेत त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आता मला खूप सुरक्षित वाटत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.”

https://twitter.com/KanganaTeam/status/1343816766422577154

 

तत्पूर्वी कंगनाने काही महिन्यांपूर्वी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. शिवाय तिला मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे ट्विट केले होते.

मंदिरातून बाहेर येताना कंगनाने ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणत मीडियाशी बोलताना सांगितले की, “मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. मला फक्त गणपती बाप्पाची परवानगी पाहिजे. आता मला बाप्पाची परवानगी आणि आशीर्वाद दोन्ही मिळाले आहेत.”

यावेळी कंगना डोक्यापासून पायापर्यंत महाराष्ट्राच्या रंगात मिसळली दिसली. तिने हिरव्या रंगाची पैठणी घातली होती, सोबतच अंबाडा त्यावर गजरा आणि नाकात नथ अशा महाराष्ट्रीयन पेहरावात ती दिसली. मास्क घातलेली कंगना संपूर्ण सिक्युरिटी सोबत आली होती.

१४ सप्टेंबर २०२० ला कंगना मुंबईहून मनालीला तिच्या घरी परत गेली होती. सोमवारी जवळपास १०४ दिवसांनी ती पुन्हा मुंबई आली. तिच्यासोबत तिची बहीण रंगोली आणि भाऊ होता.

कंगना नुकतीच मुंबईत परत आली आहे. मुंबईत येण्यापूर्वी कंगनाने जयललिता यांची बायोपिक असणाऱ्या ‘थलाइवी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. लवकरच हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. यासोबतच कंगना ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या दोन चित्रपटाचे शूटींग करण्यात देखील व्यस्त आहे.

हे देखील वाचा