चित्रपटप्रेमींसाठी वाईट बातमी! कर्नाटकमधील १५० थिएटर्स होणार कायमचे बंद, चित्रपट प्रदर्शक संघाचा निर्णय


मागील वर्षी आलेल्या कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले होते. यादरम्यान सामान्य नागरिकांसोबतच बड्या कलाकारांनाही या व्हायरसचा फटका बसला होता. देशातील लहान- मोठ्या उद्योगांवर परिणाम झाला होता. यात चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. अशामध्ये अनेक चित्रपटगृहदेखील बंद झाले. तब्बल सात महिन्यांनंतर चित्रपटगृह उघडण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी थिएटर्सची कमाई शून्य राहिली. यामध्ये कर्नाटक राज्यातील चित्रपटांचा समावेश आहे, ज्यांना आता बंद करण्याचा निर्णय कर्नाटक चित्रपट प्रदर्शक संघाने घेतला आहे. (Karnataka Film Exhibitors Association Decided To Shut Down Nearly 150 Single Screen Movie Theatres Due To Covid Pandemic)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक राज्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आता कोरोनाची प्रकरण कमी होत आहेत. त्यामुळे राज्य शासन हळूहळू लॉकडाऊनमध्ये सूट देत आहेत. दुसरीकडे कर्नाटकमध्ये सोमवारपासून (५ जुलै) मॉल आणि दुकाने तर उघडली जातीलच, परंतु चित्रपटगृह मात्र बंदच राहतील. कर्नाटक शासनाच्या या निर्णयाने चित्रपटसृष्टीला चांगलाच फटका बसला आहे. मात्र, अनेक कलाकारांनी कोरोना परिस्थिती पाहता याचे समर्थनही केले आहे. अशातच आता कर्नाटक चित्रपट प्रदर्शक संघाने निर्णय घेतला आहे की, राज्यातील एकूण ६४० सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांपैकी जवळपास १५० चित्रपटगृह कायमचे बंद केले जातील.

शासनाकडून नाही मिळाली मदत
शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार, कर्नाटक चित्रपट प्रदर्शक संघाचे अध्यक्ष केवी चंद्रशेखर म्हणाले की, “कोरोना व्हायरसदरम्यान सर्वप्रथम बंद होणारे आणि सर्वात शेवटी खुलणारे चित्रपटगृहच आहेत. मागील १५ महिन्यांमध्ये चित्रपटगृह १२ महिन्यांपासून अधिक काळ बंद राहिले आहेत. शासनाने आम्हाला मदत करण्यास नकार दिला आहे. अनेक चित्रपटगृहांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे आम्ही काही चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.”

चित्रपटगृह मालकांची अशी मागणी आहे की, कर्नाटक शासनाने मालमत्ता कर, परवाना नूतनीकरण शुल्क आणि वीज बिलावरील निश्चित शुल्क माफ करावे, जेणेकरून त्यांना थोडी सवलत मिळेल. त्यांनी पुढे असेही म्हटले की, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ शासनाद्वारे प्रदर्शकांना मदत करण्यात आली आहे. मात्र, कर्नाटक शासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, कर्नाटक चित्रपट चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डीआर जयराज यांनी म्हटले की, “मंगळवारी (६ जुलै) चेंबर आणि चित्रपटसृष्टीतील काही प्रतिनिधी कर्नाटक शासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि मदतनिधीची मागणी करतील.”

एका प्रदर्शकाने सांगितले की, “५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह उघडण्यात प्रदर्शकांना काहीही रस नाही. तसेच यातून आर्थिक फायदादेखील होत नाही.”

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “केवळ १०० टक्के क्षमतेनेच चित्रपटगृह उघडण्याची परवानगी मिळाल्यावरच आम्हा व्यावसायिकांना फायदा होईल. ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह उघडण्यावर आम्हाला बंद राहण्याच्या तुलनेत अधिक नुकसान होईल. जर राज्यात तिसरी लाट आली, तर इंडस्ट्री नष्ट होईल.”

या कोरोना व्हायरसमुळे अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही लांबणीवर पडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.