Wednesday, July 3, 2024

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ ते ‘जहर’पर्यंत, करवाचौथच्या सीनमुळे ‘हे’ चित्रपट ठरले सुपरहिट

देशभरात रविवारी (२४ ऑक्टोबर) करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. त्यामुळे बॉलिवूड मागे कसे राहणार? सण आणि त्याचे महत्त्व दर्शवणारे अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत. मेहंदी, सर्गी, चाळणीतून चंद्र पाहण्यापासून ते उपवास तोडण्यापर्यंत, हा सण बॉलिवूड चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर आणि रोमँटिक पद्धतीने सादर केला जातो. या चित्रपटांतील करवा चौथच्या सीनलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. करवा चौथच्या गाण्यांमुळे अनेक चित्रपट कायमचे संस्मरणीय ठरले. सलमान आणि ऐश्वर्या राय यांचे सुपरहिट गाणे ‘चॉंद छुपा बादल में’ असो किंवा शाहरुख खान-काजोलचे ‘बोले चुडियाँ बोले कंगना’ आजही प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. चला जाणून घेऊया त्या चित्रपटांच्या करवाचौथ सीनबद्दल जे कायमचे अमर झाले.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
जेव्हा प्रेमाची गोष्ट येते, तेव्हा हा चित्रपट कसा विसरता येईल. या चित्रपटाने प्रेक्षकांना रोमान्स करायला शिकवले. या चित्रपटामुळे तरुणांनी आपले प्रेम उघडपणे व्यक्त करायला सुरुवात केली. करवा चौथचा सर्वात सुंदर सीन या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. जिथे सिमरन तिच्या राजची वाट पाहत आहे, जेणेकरून तो तिचा उपवास तोडेल.

कभी खुशी कभी गम
करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘बोले चुडियाँ’ हे गाणे तुम्हाला आठवत असेल. हे गाणे खास करवा चौथसाठी शूट करण्यात आले होते. या गाण्यावर ऋतिक रोशन, करीना कपूर, शाहरुख खान आणि काजोलने जोरदार डान्स केला. या गाण्याच्या दरम्यान काजोल भावुक होऊन तिचा उपवास तोडते.

बागबान
‘बागबान’ चित्रपट पाहून सहजच डोळ्यात पाणी येते. या चित्रपटातील प्रत्येक सीन भावनिक आहे. विशेषतः जेव्हा हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन एकमेकांपासून दूर असतात आणि एकमेकांसाठी करवाचौथचा उपवास ठेवतात. दोघेही फोनवर एकमेकांसोबत करवा चौथ साजरा करतात आणि भावनिक होतात.

हम दिल दे चुके सनम
‘हम दिल दे चुके सनम’ या बहुचर्चित चित्रपटातील ऐश्वर्या राय आणि सलमान खानची जोडी सर्वांनाच आवडली. या चित्रपटात करवा चौथमधील ‘चॉंद छुपा बादल में’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.

जहर
इमरान हाश्मी आणि शमिता शेट्टीच्या ‘जहर’ चित्रपटातील करवाचौथचा सीन खूप खास होता. हा सीन चित्रपटाच्या ‘अगर तुम मिल जाओ’ या हिट गाण्याच्या मध्यभागी दाखवण्यात आला आहे. जिथे पत्नी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यावर्षी ‘हे’ सेलेब्रिटी साजरे करणार त्यांचे पहिले करवा चौथ

-‘माझा या गोष्टींवर विश्वास नाही’, म्हणत रिया कपूरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हे देखील वाचा