दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ‘मोस्ट व्हर्सटाईल अभिनेता’ पुरस्कार केके मेनन यांना जाहीर


केकेे मेनन हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. त्यांच्या संवाद बोलण्याच्या पद्धतीने प्रेक्षक नेहमी प्रभावित होत असतात. नकारात्मक पात्र किंवा खलनायकाची भूमिका बजावत असताना, त्यांच्या विरोधात उभे राहावे की त्यांना पाठिंबा द्यावा हे ठरवणे प्रेक्षकांना अवघड जाते. याचे कारण म्हणजे त्यांचा उत्तम अभिनय व बोलण्याची शैली. के के मेनन ज्या दृढतेने संवाद बोलतात ते खरंच आश्चर्यकारक आहे.

त्यांच्या अभिनयासाठी नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कारांतर्गत ‘मोस्ट व्हर्सटाइल अभिनेता’ म्हणून गौरविण्यात आले आहेे. या पुरस्काराची माहिती मेनन यांनी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये ट्रॉफीचे फोटो शेअर केले आहेत. यासह त्यांनी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्काराचे अधिकृत सोशल मीडिया हँडल टॅग करून, त्यांचे आभार मानले.

के के मेननच्या लेटेस्ट चित्रपटाविषयी बोलायचे झाले, तर ते ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सिरीजमध्ये दिसले होते. यामध्ये त्यांनी ‘हिम्मत सिंगची’ भूमिका साकारली होती. या पात्राला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला व सर्वांनीच त्यांचे कौतुकही केले.

के के मेनन यांनी ‘नसीम’ (1995) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच लहान होती, त्यामुळे त्यांना तेवढी ओळख मिळाली नव्हती. यानंतर मेनन हे 1999 मध्ये ‘भोपाळ एक्स्प्रेस’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. तसेच, त्यांना खरी ओळख 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्लॅक फ्राइडे’ या चित्रपटापासून मिळाली.

के के मेनन यांनी ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’, ‘दीवार’, ‘सिलसिले’, ‘सरकार’, ‘दंश’, ‘एक खिलाड़ी एक हसीना’, ‘कार्पोरेट’, ‘शून्य’, ‘सरकार राज’, ‘मुंबई मेरी जान’, ‘शौर्य’, ‘सिर्फ’, ‘द्रोण’, ‘गुलाल’, ‘संकट सिटी’, ‘लफंगे परिंदे’, ‘भेजा फ्राइ 2’, ‘भिंडी बाजार’, ‘चालीस चौरासी’, ‘लाइफ की तो लग गई’, ‘शाहिद’, ‘राजा नटवरलाल’, ‘हैदर’, ‘बेबी’, ‘रहस्य’, ‘बॉम्बे वेलवेट’, ‘सिंह इज ब्लिंग’, ‘सात उचक्के’, ‘द गाजी अटैक’ सारख्या अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.