भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे पूर्ण होत असून या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘रागोपनिषध’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली आहे. यामधील आनंदाची बातमी म्हणजे पुण्यातील गायिका केतकी माटेगावकर (ketaki mategaonkar) हिचा या अल्बममध्ये सहभाग असणार आहे. या अल्बममध्ये देशभरातील ज्येष्ठ आणि आघाडीच्या गायकांसोबत केतकीने गायन केले असून ती या समुहामधील सर्वात तरुण गायिका आहे.
भारत सरकारकडून या अल्बमची निर्मिती होत असून यामध्ये पूर्णपणे शास्रीय संगीताचा समावेश आहे. अनेक पुरातन बंदिशी यामध्ये गायकांनी सादर केल्या असून हा वारसा जगभरातील संगीत विद्यापीठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. शास्रीय संगीत गायनाचा केतकीचा हा पहिलाच अल्बम असून तिने यामध्ये राग समेरी सादर केला आहे. राग समेरीतील बंदीश तिने गायली आहे. हरिहरन, राशिद खान, पं. व्यंकटेश कुमार, देवकी पंडित, सोनू निगम, जावेद अली, आरती अंकलीकर-टिकेकर, साधना सरगम, जसविंदर नरुला अशा ज्येष्ठ आणि आघाडीच्या गायकांनी या अल्बममध्ये गायन केले आहे.
संगीतकार डॉ. भरत बलवल्ली यांच्या संकल्पनेतून हा भव्य संगीत अल्बम तयार झाला असून यामध्ये भारतातील पुरातन बंदिशी सादर केल्या जाणार आहेत. ‘रागोपनिषध’ हा शतकानुशतके जतन केलेली प्राचीन हस्तलिखिते असलेला एक हस्तलिखितांचा ग्रंथ आहे. जो मूळतः जैन साधू भगवंत आणि मुनी यांनी २४ राग-मालांच्या स्वरुपात रचला आहे. यामध्ये सुमारे ५८ वेगवेगळ्या रागांचा उल्लेख, या रागांचे चित्रण करणारी सुमारे ३५०-४०० वर्षे जुनी चित्रे, भक्तीपूजेला वाहिलेल्या ९१ रागांमध्ये रचलेले ३८० श्लोक, १२६ विविध रागांचे वर्णन आणि एकूण १५४ वाद्यांची चित्रे आणि वर्णन दिलेले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील हा एक आगळावेगळा आणि भव्य प्रकल्प असणार आहे. हा अल्बम भारत सरकारद्वारे जगातील सर्व अग्रगण्य संगीत विद्यापीठांना भारतीय संगीताच्या प्रसारासाठी स्मरणिका म्हणून भेट दिला जाणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-