Monday, May 13, 2024

Khuda Haafiz 2 | रिलीझसाठी सज्ज झालाय चित्रपट, पण रिलीझपूर्वीच निर्मात्यांना मागावी लागली माफी

विद्युत जामवालचा (Vidyut Jamwal) आगामी चित्रपट रिलीझसाठी सज्ज आहे, पण त्याआधीच तो वादात सापडला आहे. हा वाद एवढा वाढला आहे की, निर्मात्यांना याबद्दल माफी मागावी लागली आहे. खरं तर या चित्रपटाचे ‘हक हुसैन’ हे गाणे काही काळापूर्वी रिलीझ झाले होते. या गाण्यावर मुस्लिम समाजातील लोकांनी आक्षेप घेतला. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना या गाण्यासाठी मुस्लिम समाजाची माफी मागावी लागली आहे. ”हक हुसैन’ या गाण्याने ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यांची आम्ही माफी मागतो’, असे ते म्हणाले. यासंदर्भात निर्मात्यांनी एक निवेदनही जारी केले आहे.

काही काळापूर्वीच विद्युत जामवालच्या ‘खुदा हाफिज २’ या चित्रपटातील ‘हक हुसैन’ हे गाणे रिलीझ झाले होते. शिया समुदायाच्या लोकांनी या गाण्यावर संताप व्यक्त केला होता. गाण्यात हुसैन हा शब्द वापरण्यात आला असून, त्यात आक्षेपार्ह सीन असल्याचे त्यांनी सांगितले. हुसेन आणि जंजीर या शब्दाच्या वापरावर त्यांनी आक्षेप घेतला. आता निर्मात्यांनी याबद्दल माफी मागितली आहे आणि सोशल मीडियावर एक निवेदनही जारी केले आहे. (khuda haafiz chapter 2 film makers apologise)

निर्मात्यांनी निवेदनात लिहिले आहे, “शिया समुदायाचे मत लक्षात घेऊन आम्ही गाणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएफसी सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीने, आम्ही जंजीर काढून टाकले आहेत आणि ‘हक हुसैन’ बदलून ‘जुनून है’ केला आहे. आम्ही शिया समुदायाच्या लोकांची माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.” पुढे त्यांनी लिहीले की, “चित्रपटात कोणत्याही शिया समुदायातील सदस्याला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेले नाही किंवा शिया समुदायातील कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करताना दाखवण्यात आलेले नाही.”

निर्मात्यांनी पुढे लिहिले, “गाण्याच्या माध्यमातून त्यांना फक्त इमाम हुसैनची गौरवगाथा दाखवायची होती. आमचा हेतू कोणाच्याही धार्मिक भावनांच्या विरोधात जाण्याचा नव्हता. मात्र, शिया समाजाच्या भावना लक्षात घेऊन आम्ही बदल केले आहेत.” या चित्रपटात विद्युत जामवाल आणि शिवालिका ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा