Saturday, June 29, 2024

किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट; म्हणाले, ‘सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस…’

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा कायम आहे. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा उपोषण केले आहे. दुसऱ्या उपोषणाचा समारोप करताना त्यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या अल्टिमेटमच्या मुदतीत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर ते पुन्हा उपोषण करण्याची तयारी ठेवली आहे. जरांगे पाटील हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सामान्य जनतेप्रमाणे मराठी सिनेविश्वातील काही कलाकारांनी देखील पाठिंबा दिला आहे.

‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे समर्थक आहेत. त्यांनी जरांगे पाटील यांच्या साताऱ्यातील सभेचा एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किरण माने यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचे समर्थन केले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकार या प्रश्नावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

किरण माने यांनी पोस्ट करताना लिहिले की, “जरांगे पाटलांची राजधानी सातार्‍यातली सभा राजासारखी झाली… देखणी… रूबाबदार. मी खेडेगांवात लहानाचा मोठा झालोय. राजकीय नेत्यांसाठी सभेला गर्दी जमवणं किती सहजशक्य असतं, हे मी डोळ्यांनी पाहिलंय. कशा जीपा, ट्रक, टेम्पो भरून माणसं सभेला नेली जातात… कशा घोषणा दिल्या जातात. त्यानंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितीय…अशा परिस्थितीत एका सर्वसामान्य माणसाच्या सभेला उत्स्फूर्तपणे, मनापास्नं, स्वत:हून घरातून उठून सभेला जाऊन बसणारी माणसं बघायला मिळताहेत. भर उन्हात, रात्री दोन-दोन वाजेपर्यंत त्याची वाट पहातात. हे कुठल्याही नेत्याला आजच्या काळात शक्य नाही.

…मी सातारचं जरांगे पाटलांचं भाषण पूर्ण ऐकलं. जेवढ्या तळमळीनं लोक येतात, तेवढ्याच मनापासून, नितळ, स्पष्ट, परखड, सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस आहे. आरक्षणाविषयी सगळी कायदेशीर माहिती आहे. आरक्षणाचा लाभ घेणार्‍या इतर वर्गांविषयी जराही कटुता त्यांच्या मनात नाही. द्वेषभावना न पसरवता, ‘इतर जातीजमातींना दुखवू नका. ही नेत्यांनी निर्माण केलेली दुफळी आहे. मनातून आपण सगळे जातीधर्माचे लोक एक आहोत.’ असा सूर भाषणात असतो, जो आश्वासक आहे.

संविधान दिन जवळ आलाय. त्याचवेळी एका सामान्य नागरिकाच्या नेतृत्वाखाली, कुठल्याही राजकीय पाठबळाशिवाय, सांविधानिक मार्गाने एक भव्यदिव्य आंदोलन उभं रहाणं ही खूप प्रेरणादायी घटना आहे. जय शिवराय… जय भीम.” त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. (Kiran Mane post about Manoj Jarange Patal meeting in Satara and Maratha reservation)

आधिक वाचा-
‘गोष्टी चांगल्या होतील, तुमचा अभिमान आहे…’, टीम इंडियाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवावर बिग बींची प्रतिक्रिया
जॅकलीन डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण, ‘या’ वेब सीरिजमध्ये झळकणार अभिनेत्री

हे देखील वाचा