Thursday, June 13, 2024

किशोर कुमारांनी केले होते तब्बल 4 विवाह; घटस्फोटानंतर एका अभिनेत्रीने थाटला मिथुन चक्रवर्तीसोबत संसार

‘किशोर कुमार…बस नाम ही काफी हैं.’ किशोर कुमार या नावातच सर्व काही सामावलेले आहे. अभिनय आणि गायन या क्षेत्रात त्यांनी जे कर्तृत्व गाजवले, त्याची सर कधीच कोणाला येऊ शकणार नाही. आधीच्या तर आधीच्या मात्र आपल्या आजच्या पिढीतही किशोर कुमार यांचा कोणी फॅन नसेल अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यांचा आवाज आणि त्यांचा अभिनय म्हणजे निव्वळ त्यांना मिळालेली एक दैवी देणगीच होती. त्यांच्याबद्दल काय आणि किती लिहावे हा प्रश्न सर्वांनाच पडत असेल. किशोर कुमार म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. गायन आणि अभिनयासोबतच त्यांनी लेखक, पटकथा लेखक, निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले होते. बुधवारी (4 ऑगस्ट) किशोर कुमार यांची आज 94 वी जयंती. त्या निमित्ताने जाणून घेऊया किशोरदांबद्दल काही खास गोष्टी…

किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट, 1929 ला मध्यप्रदेशातील खंडवा येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव आभास कुमार गांगुली असे होते. प्रसिद्ध गायक के. एल. सहगल यांचा त्यांच्यावर प्रचंड मोठा प्रभाव होता. त्यामुळेच ते गायकीकडे वळले. त्यांचे वडील कुंजलाल हे वकील होते, तर आई गौरीदेवी या गृहिणी होत्या. त्यांच्या आई चांगल्या मोठ्या घरातून कुंजलाल यांच्या घरी लग्न करून आल्या होत्या. किशोर कुमार यांना अशोक कुमार, सती देवी, अनुप कुमार अशी तीन भावंडे होती. अशोक कुमार देखील बॉलिवूमधील नावाजलेले अभिनेते होते.

किशोर कुमार यांच्या संगीत क्षेत्राच्या कारकिर्दीची सुरुवात 1946 साली आलेल्या ‘शिकारी’ सिनेमातून झाली. या चित्रपटात अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते, या दोन्ही भावांनी मिळून ‘भाई-भाई’, ‘दूर का राही’, ‘चलती का नाम गाड़ी’, ‘बंदी’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. किशोर कुमार यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केले.

पुढे आभास कुमार गांगुली यांनी त्यांचे नाव बदलून किशोर कुमार ठेवले. त्यांनी देखील मुंबई गाठली आणि इथे येऊन कोरसमध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली. ते अतिशय मस्तमौला आणि दिलखुलास स्वभावाचे होते. त्यांचे गायक आणि अभिनेते म्हणून असणारे करिअर शिखराला टेकत होते. मात्र, त्यांच्या वैयक्तिक जीवनात खूपच अस्थिरता होती.

किशोर कुमारांनी केली चार लग्नं
त्यांनी त्यांच्या आयुष्यात चार लग्नं केली. त्यांनी पहिले लग्न रूम गोष्ट यांच्याशी 1950साली केले. मात्र, केवळ आठच वर्षात म्हणजे 1958साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न सौंदर्याची क्वीन मधुबाला यांच्याशी केले. त्यासाठी त्यांनी त्यांचा धर्म देखील बदलला आणि मुस्लिम धर्म स्वीकारत करीम अब्दुल या नावाने त्यांनी मधुबालांसोबत 1960 साली निकाह केला. मात्र, लग्नानंतर केवळ नऊच वर्षात मधुबाला यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी 1976 साली तिसरे लग्न केले ते अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी. त्यांचे लग्न तर केवळ दोनच वर्ष टिकले आणि त्यांनी 1978साली घटस्फोट घेतला. यानंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केले. किशोरदा यांनी चौथे आणि शेवटचे लग्न 1980साली केले लीना चंद्रावरकर यांच्याशी केले. त्यानंतर फक्त सातच वर्षात किशोर कुमार यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. लीना आणि किशोर यांच्यामध्ये तब्बल 20 वर्षाचे अंतर होते.

किशोर कुमार यांनी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करण्यासाठी कधीच कोणतेच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. त्यांनी त्यांच्या संपूर्ण गायनाच्या कारकिर्दीत सर्वच भाषणामध्ये जवळपास 1500 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. एका मुलाखतीमध्ये अशोक कुमार यांनी एकदा सांगितले होते की, लहानपणी किशोर कुमार खूपच बेसूर गायचे, त्यांचा आवाज खूपच विचत्र होता. मात्र, तरीही त्यांनी या क्षेत्रात स्वतःचे नाव खूप मोठे केले.

भावाच्या ७६ व्या वाढदिवशीच झाले किशोरदांचे निधन
किशोर कुमार यांचे निधन त्यांचे मोठे भाऊ असणाऱ्या अशोक कुमार यांच्या 76 व्या वाढदिवसाच्या दिवशीच झाले. किशोर कुमार यांना या सिनेजगतात आणणारे त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमारच होते. अशोक कुमार यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवायचे असे स्वप्न किशोर कुमारांचे होते. त्यांनी ते पूर्ण देखील केले. कारण, 80/90 च्या दशकातील सर्वात महाग गायकांपैकी एक किशोर कुमार होते. वयाच्या केवळ 57 व्या वर्षी किशोरदांनी या जगाचा निरोप घेतला.

एका मुलखातीदरम्यान किशोर कुमार यांचा मुलगा असलेले अमित कुमार म्हणाले होते की, किशोर कुमारांना इंग्लिश गाणी खूप आवडायची. सोबतच इंग्लिश क्लासिक सिनेमे पाहणे देखील त्यांचा छंद होता. त्यांनी एकदा अमेरिकेहून येताना अनेक इंग्लिश सिनेमांच्या कॅसेट्स आणल्या होत्या. ते के. एल. सहगल यांचे खूप मोठे फॅन होते. सहगल साहेबांसारखेच किशोर कुमार देखील मोठे गायक बनू इच्छित होते. किशोर कुमार यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

अधिक वाचा- 
लवकरच येतोय… ‘भिंतीपलिकडचं जग’, जाणून घ्या मराठमोळ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही
अभिनेत्री अपूर्वा गोरेच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा; पाहा फोटो

हे देखील वाचा