आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते, ज्यांच्या प्रत्येक सिनेमातून प्रत्येक कलाकाराला अभिनयाचे नवनवे पैलू शिकायला मिळतात अशा विश्वनाथ पाटेकर अर्थात नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस! नाना आज ७० वर्षांचे झाले. या त्यांच्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात फक्त चाळीस वर्षांची तर त्यांची चित्रपट कारकीर्द आहे. या चित्रपट करकीर्दीसोबतच गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन ही संस्था सुरू केली. याद्वारे ते शेतकऱ्यांची मदत करत असतात. मराठी नाटकांमध्ये काम करणारा एक कलाकार ते बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील एक मोठं नाव असा नाना यांचा प्रवास भला मोठा आहे. आपण आज या प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत सोबत नाना यांच्याबद्दलच्या आणखीन काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ साली मुरुड जंजिरा येथे झाला. सुरुवातीच्या काळात नानांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. इतपर्यंत की काही रुपये मिळवण्यासाठी त्यांना सिनेमाचे पोस्टर रंगवावे लागत असत. यानंतर त्यांच्या कुटुंबाने मुंबई गाठली. यानंतर नानांनी विजया मेहता यांची नाट्यसंस्था रंगायनमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक प्रायोगिक मराठी नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या.
यानंतर त्यांनी गमन या चित्रपटामध्ये एक लहानशी भूमिका साकारून हिंदी सिनेमामध्ये पदार्पण केलं. यानंतरचा काही काळ नाना मराठी सिनेमात काम करत राहिले. अचानक एक दिवस त्यांना ब्रिटिश टेलिव्हिजन सिरीज लॉर्ड माउंटबॅटन : द लास्ट व्हाइसरॉय मध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी हिंदी मध्ये बरेच सिनेमे केले परंतु त्यांना खरी ओळख मिळाली १९८९ साली आलेल्या परींदा सिनेमातील भूमिकेमुळे! परींदा मध्ये त्यांनी साकारलेला खलनायक इतका खरा वाटत होता की त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी जिंकला. याच भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा देखील सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.
१९९२ साली आलेल्या अंगार मधील खलनायकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नानांची कारकीर्द अशीच बहरत राहिली. त्यांनी पुढे हिंदीमध्ये तिरंगा, गुलाम ए मुस्तफा, अपहरण, अब तक छप्पन, राजनीती, वेलकम, वेलकम बॅक, द अटॅक्स ऑफ २६/११ या आणि अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. यानंतर त्यांनी पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट, आपला माणूस या मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ज्यात नटसम्राटमधील त्यांची आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका खूप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. २०१३ मध्ये नानांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
नाना पाटेकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत खूप कमाई केली. ठरवलं असतं तर आज ते एक आलिशान जगणं जगू शकले असते. परंतु आज त्यांची आयुष्यभराची संपत्ती किती आहे माहितीये! फक्त चाळीस कोटी… इतर सगळे पैसे, संपत्ती त्यांनी गरीब गरजूंना दान केली. आणि स्वतः अगदी साधं आयुष्य ते आज जगतायत.
याचाच पुढचा भाग म्हणूयात की काही वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रात सतत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं होतं. अशात त्यांनी आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि याच संस्थेच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या हितासाठी जितकी काही काम करता येतील तितकी करत आहेत.
नानांच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून खडतर वेळ सुरू आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने २००८ साली नाना पाटेकरांवर लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते. यानंतर मधला काही काळ ती देशाबाहेर होती आणि दहा वर्षांनंतर तिने येऊन पुन्हा तेच आरोप लावले होते. पण यातून नाना जरी निर्दोष सुटले असले तरी त्यांच्या हातात काहीच काम राहिलेलं नाही. जेव्हा हे आरोप पुन्हा एकदा झाले तेव्हा नाना हाऊसफुल ४ चं चित्रीकरण करत होते. या आरोपांमुळे नानांना हे चित्रीकरण मध्येच सोडावं लागलं आणि त्यानंतर नानांकडे आता फारसं काम नसल्याचं बोललं जात आहे.










