×

‘पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणारे’ लाल सिंग चड्डा चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान (Aamir Khan) त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्डा’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटासाठी तो प्रचंड मेहनत घेताना सध्या दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता आमीर खान आणि करिना कपूरने (Kareena Kapoor) प्रमुख भूमिका साकारल्या असून सध्या दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकतेच या चित्रपटातील ‘मैं की करा गाणे’ आमीर खानने रिलीज केले आहे ज्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

अभिनेता आमीर खानचा बहुचर्चित ‘लालसिंग चड्डा’ चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नवनवीन कल्पना आणि क्लुप्या करताना सध्या दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आमीर खानने पॉडकास्टचा वापर करत या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से चाहत्यांना सांगायला सुरूवात केली होती. त्याच्या या कल्पनेचे अनेकांनी कौतुक केले होते.आता या चित्रपटातील मैं की करा गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  आमीर खानच्या प्रोडक्शन टीमच्या सोशल मीडियावरुन हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by T-Series (@tseries.official)

प्रत्येकाला पहिल्या प्रेमाची आठवण करुन देणारे असे हे सुंदर गाणे आहे. ज्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या गाण्याच्या पोस्टरमध्ये मुलगा आणि मुलगी यांची हातात हात घेऊन चाललेली पाठमोरी प्रतिकृती पाहायला मिळत आहे. याच गाण्याच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर आमिर खानच्या चित्रपटात पहिल्यांदाच गायक सोनु निगमचा बहारदार आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या पोस्टमध्ये त्याचेही आभार मानत “मैं की करा गाण्याला आवाज दिल्याबद्दल सोनु, प्रितम, आणि अमिताभ आभारी आहे” असा कॅप्शन दिला आहे.

दरम्यान हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याआधी निर्मात्यांनी प्रेक्षकांची चांगलीच उत्सुकता ताणली होती. या आधी त्यांच्याकडून तुम्ही कोणत्या वयात प्रेमात पडला, त्यावेळच्या तुमच्या आठवणी कोणत्या आहेत, असे विचारत हे गाणे तुम्हाला तुमच्या त्याच पहिल्या प्रेमाची आठवण करुन देईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे या गाण्याबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post