आपल्या सुमधुर आवाजाने संपूर्ण देशाची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ९०० चित्रपटांमध्ये ३० हजाराहून अधिक गाणी गायली. गेली ७ दशकं गायनाला वाहून घेतलेल्या लताजींनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी गायनाला सुरुवात केली. त्यांचे संपूर्ण जीवन सुरमय होते. लता दीदींचे निधन चटका लावून गेले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. लता दीदी म्हणजे आपल्या भारताच्या संगीत सृष्टीतील एक सुवर्ण पानंच होते. अनेक गाण्यांना अजरामर करणाऱ्या लता दीदींना संपूर्ण जगात तुफान आदर होता. लता दीदींचे जगभरात लाखो करोडो चाहते असतील जे त्यांच्यासाठी काहीही करतील, मात्र त्यांचा एक फॅन चक्क त्यांचा मानसपुत्र झाला होता.
सर्वांनाच माहित होते की, लता दीदींचे क्रिकेटवर किती प्रेम होते. आता क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर हे वेगळे थोडीच आहे. लता दीदींना सचिन खूपच आवडायचा. सचिनसाठी देखील लता दीदी आई सामान होत्या. सचिन आणि दीदींचे नाते देखील खूपच वेगळे आणि खास होते. सचिनने देखील अनेकदा त्याचे दीदींवरील प्रेम व्यक्त केले होते. सचिनने जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्याआधीपासूनच लता मंगेशकर यांनी अनेकदा त्याला भारतरत्न द्यावा ही मागणी देखील केली होती.
सचिनसोबतच्या नात्याबद्दल सांगताना एकदा दीदी म्हणाल्या होत्या की, “सचिन मला आईसारखेच मानतो आणि मी देखील त्याच्यासाठी नेहमीच एक आई म्हणून प्रार्थना करत असते. त्याने जेव्हा मला पहिल्यांदा आई म्हटले तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. कारण माझ्यासाठी त्याने मला आई म्हणणे खूपच अनपेक्षित होते. शिवाय माझ्यासाठी ती गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती. मात्र मला त्यांचे ते दोन शब्द सुखावून गेले आणि त्याच्यासारखा मुलगा मिळाल्याने मी भाग्यवान सुद्धा झाली.”
हेही वाचा :