Saturday, July 27, 2024

अभिनेता होऊन झाडांमागे रोमान्स करणाऱ्यांमधले नव्हते प्राण, खलनायक साकारून नायकालाही दिली त्यांनी टक्कर

हिंदी सिनेसृष्टीमधे असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या दमदार आणि सशक्त अभिनयाने मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपेक्षा अधिक आणि मोठी लोकप्रियता मिळवली. आपल्या इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत खूप कमी वेळा असे झाले आहे, की खलनायक नायकावर भारी पडला आहे आणि फक्त खलनायकाची भूमिका करूनच तुफान लोकप्रियता मिळवली. अशीच मोठी ओळख मिळवणारे जेष्ठ अभिनेते म्हणजे प्राण. प्राण साहेब नुसते नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर त्यांच्या अनेक खलनायकी भूमिका उभ्या राहतात. त्यांची बोलण्याची अतिशय वेगळी शैली पुढे त्यांची ओळख बनली. प्राण साहेबांनी जवळपास 50 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केले. बुधवारी (दि. 12 जुलै)ला प्राण साहेबांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने जाणून घ्या प्राण साहेबांबद्दल अधिक माहिती.

आपल्या प्रत्येक भूमिकांत ‘प्राण’ ओतणारे अभिनेते म्हणजे प्राण. आज बुधवारी 12 जुलैला प्राण यांची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी 2013मध्ये प्राण साहेबांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी 1940 साली ‘जिद्दी’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. खलनायक आणि प्राण हे दोन्ही शब्द 1940 ते 1990 या पन्नास वर्षाच्या काळात एकमेकांना पूरक झाले होते. त्या काळी अनेक मोठमोठे कलाकार मुख्य भूमिका करून त्यांच्या अभिनयाचा डंका वाजत होते. मात्र, प्राण साहेबांनी त्यांना तोडीस तोड टक्कर देत, खलनायकी भूमिकांमध्ये त्या कलाकारांपेक्षा अधिक लोकप्रियता मिळवली. त्यांची भीती लोकांमध्ये एवढी होती की आपल्या मुलांचे ‘प्राण’ नाव ठेवणे देखील त्या काळी बंद झाले होते. प्राण यांनी त्यांच्या जिवंत अभिनयाने सर्वाना वेड लावले होते. अनेक मोठे कलाकार सिनेमात मुख्य भूमिकेत असले, तरी चित्रपटांमधील कलाकारांची नावे येताना शेवटी ‘आणि प्राण’ असे लिहून यायला लागले होते. यावरूनच आपल्याला अंदाज येईल की, प्राण यांची लोकप्रियता आणि त्यांचे चित्रपटात असणे किती महत्वाचे होते.प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी, 1920 रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्यांचे वडील कृष्ण सिकंद सिविल इंजीनियर होते. प्राण यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या. तरुणपणी त्यांना फोटोग्राफीचा खूप छंद होता. फाळणीपूर्वी प्राण यांनी अनेक पंजाबी सिनेमात काम केले होते. त्यांनी लाहोर येथे 1942 ते 1946 या चार वर्षात त्यांनी सुमारे 22 सिनेमे केले. मात्र, फाळणीनंतर ते भारतात आले आणि इथे त्यांना व्हिलनने प्रचंड ओळख मिळवून दिली.

प्राण यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमानंतर प्रत्येक चित्रपटात खलनायक साकारला. दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांनी ‘आजाद’, ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘राम और श्याम’ आणि ‘आदमी’ आदी सिनेमे, तर देव आनंद यांच्यासोबत ‘मुनीमजी’, ‘अमरदीप’ आदी चित्रपटात काम केले. असे अनेकदा सांगितले जाते की, ‘जंजीर’ सिनेमासाठी दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना प्राण यांनीच अमिताभ बच्चन हे नाव सांगितले होते. प्राण आणि अमिताभ यांची खूप चांगली मैत्री होती. या दोघांनी पुढे ‘जंजीर’, ‘डॉन’, ‘अमर अकबर ऍंथनी’, ‘मजबूर’, ‘दोस्ताना’, ‘नसीब’, ‘कालिया’,’शराबी’ आदी अनेक सिनेमात काम केले. त्यांना अभिनेता होऊन झाडांमागे रोमान्स करायला आवडत नसे. ते त्यांच्या अभिनयाच्या शैलीमुळे प्रत्येक भूमिकेत जीव ओतायचे. त्यांचा अभिनय इतका जिवंत होता की, खऱ्या आयुष्यातही लोकं त्यांना वाईटच समजायचे.

प्राण यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी 1945 साली शुक्ला अहलुवालिया यांच्यासोबत लग्न केले. त्यांना अरविंद, सुनील आणि पिंकी अशी तीन मुले आहेत. प्राण हे इंडस्ट्रीमध्ये मदत करण्यासाठी खूप ओळखले जायचे. ते सतत कोणाची ना कोणाची मदत करायचे.

प्राण यांनी त्यांच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास 350 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1997 साली त्यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला. शिवाय 2001साली त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.(legendary actor pran death anniversary)

अधिक वाचा-
प्राण यांच्यासोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची आलेली वेळ, बरं-वाईट होण्याच्या भीतीने थरथर कापत होती अभिनेत्री
गंमती गंमतीत झाले वांदे! प्राण यांनी अभिनेत्रीला अचानक खेचलेले पाण्यात, घाबरून तिनेही उचललेलं मोठं पाऊल

हे देखील वाचा