Tuesday, May 21, 2024

‘हा सन्मान माझ्या रसिकांच्या प्रेमामुळेच…’, ज्येष्ठ नाट्यकर्मी आशाताई काळे यांना जीवनगौरव पुरस्कर प्रदान

बालगंधर्व रंगमंदिरात मला चोखंदळ पुणेकर रसिकांनी अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने स्वीकारलं. त्याच रंगमंचावर मला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जातंय याचा अतिशय आनंद होतोय. इथे मला विलक्षण अनुभव आलेले आहेत.  राज्यभर नाटकाचे दौरे केले की थकायला व्हायच आता कसं व्हायच असा प्रश्न पडायचा पण या बालगंधर्व रंगमंदिरात आले की एक वेगळी ऊर्जा प्राप्त व्हायची.  माझ्या चित्रपटातील अनेक भूमिकांचे कौतुक झाले, मात्र मी नाटकवाली आहे, माझा आजचा सन्मान मला कलाकार म्हणून स्वीकारलेल्या रासिकांच्या प्रेमामुळेच मिळतोय असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने – नाट्य  अभिनेत्री आशाताई काळे यांनी केले. 

बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिर 55वा वर्धापन दिन सोहळा महोत्सवाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी आशाताई काळे यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात  आले. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर,अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,कवयत्री प्रतिभाताई मोडक, सूर्यादत्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय चोरडिया,सुषमा चोरडिया,लक्ष्मीकांत खबिया,अंकल खुटे,सह सचिव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संतोष बोबडे ,विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश देशमुख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आशा काळे म्हणाल्या, बालगंधर्व रंगमंदिरांच्या रंगमंचावर मी 50वर्षे वावरले. माझ्या अनेक नाटकांचे असंख्य प्रयोग मी इथे  सादर केले. आज पुरस्काराच्या निमित्ताने एक सांगू इच्छिते की बाललगंधर्वांच्या नावाने आज जीवनगौरव मिळत आहे, त्या बालगंधर्वांना मी पाहिले आहे, त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप देऊन आशीर्वाद दिलेला आहे, आज रसिकांच्या प्रेमामुळे त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. मला पुणेकरांच्या टाळ्यांची आस लागलेली असायची. कोणतीही नशा सुटेल मात्र रंगमंचांची आणि टाळ्यांची नशा न सुटणारी असे सांगत आशाताईंनी आपल्या कारकीर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला.

मेघराज राजेभोसले म्हणाले, बालगंधर्व रंगमंदीर हे एकमेव नाट्यगृह आहे, ज्याचा वर्धापन दिन सर्व कलाकार मिळून साजरा करतात. मात्र केवळ वर्धापन साजरा करणं हा आमचा उद्देश नाही. तर नाट्यगृह जगली पाहिजेत ही यामागाची भूमिका आहे. बालगंधर्व वाचाव कलाकारांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

उल्हास पवार म्हणाले, साक्षात पू. ल. देशपांडे यांच्या देखरेखीखाली निर्माण झालेल्या बालगंधर्व रंगमंदिरांचे आगळेवेगळे महत्व कलाकारांसाठी आहे.  या बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मेघराज राजेभोसले मागील अनेक वर्षांपासून रंगभूमीवरील उतुंग व्यक्तींचा सन्मान करत आहेत हे कौतुकास्पद आहे. आशाताई वयाच्या 14व्या वर्षांपासून रंगभूमीची सेवा करत आहेत, त्यांचे चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे.

स्वप्नील जोशी म्हणाले, काही कलावंतांच्या नावाच्या समोर आपण ‘सुपरस्टार’ असे बिरुद लावू शकतो आशा आशाताई आहेत. आशा काळे या नावाने माझ्या आजी- आजोबांपासून अलीकडच्या पिढीला देखील भुरळ पाडली आहे. इथून पुढील काळातही जेव्हा केव्हा लहान मूल रडेल तेव्हा तेव्हा आशाताईंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कलाकारांचे आयुष्य हे फार गमतीशीर असते. एखाद्यासाठी ती प्रेयसी असते, तर दुसऱ्यासाठी ती आई असते. आशा ताईंनी आपल्या कामातून आमच्या सारख्या व नव्या पिढीतील कलाकारांसाथी एक आदर्श घालून दिला आहे.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, कवयत्री प्रतिभाताई मोडक आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने मानपत्राचे वाचन केले. तसेच पराग चौधरी व शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.(Lifetime Achievement Award given to veteran theater artist Ashatai Kale)

अधिक वाचा-
अर्जून कपूरचा वाढदिवस, कथित बॉयफ्रेंडच्या बर्थडे पार्टीत 49 वर्षीय मलायकाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

रामानंद सागर यांच्या पणतीवर लैगिंक अत्याचार? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा