Monday, July 1, 2024

दिलीप कुमारांसोबत साखरपुडा, किशोर कुमारांसोबत लग्न करणारी ‘मधुबाला’; ‘या’ कारणामुळे सोडली सर्वांनी साथ

‘मधुबाला’ म्हणजे हिंदी सिनेसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न. जवळपास ८० वर्षांपूर्वी मधुबाला यांनी अभिनयाच्या सृष्टीत पदार्पण केले. त्यांचे सौंदर्य पाहून त्याकाळातील सर्वचजण वेडे झाले होते, किंबहुना आजही त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा नेहमी रंगताना दिसतात. त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना दिवाने केले होते. ‘मुगल-ए-आझम’ या सिनेमातील ‘अनारकली’ या भूमिकेला त्यांनी अजरामर केले. नुकताच त्यांची जयंती (वाढदिवस) झाली. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या प्रेमाच्या अपयशाच्या दु:खद कहाणीबद्दल…

मुमताज बेगम जहां देहलवी उर्फ मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीतल्या एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांनी १९४२ साली ‘बसंत’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यावेळी त्या फक्त नऊ वर्षांच्या होत्या. १९४७ साली आलेल्या केदार शर्मा यांच्या ‘नीलकमल’ सिनेमातून त्यांनी मुख्य नायिका म्हणून चित्रपटांमध्ये एंट्री केली. १९४७ साली आलेल्या ‘दिल की रानी’ आणि १९४८ साली आलेल्या ‘अमर प्रेम’ या सिनेमांमधून राज कपूर यांच्यासोबत त्यांनी काम केले. आपल्या सर्व भावंडांमध्ये मधुबाला या सर्वात जास्त कमाई करायच्या. खूप कमी वयात त्यांनी काम करायला सुरुवात केल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. त्यांना फक्त उर्दू आणि हिंदी भाषा यायच्या. मात्र, त्यांना इंग्रजी बिलकुल येत नव्हते.

Photo Courtesy: Screengrab/YouTube/I-WITNESS

 

मधुबाला या चित्रपटांमध्ये जितक्या यशस्वी होत्या तितक्याच त्या त्यांच्या खऱ्या आयुष्यात प्रेमाच्या बाबतीत अपयशी ठरल्या. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे प्रेमप्रकरण खूप गाजले. मात्र, त्यांना प्रेमात कधीच यश मिळाले नाही.

एका मुलाखतीमध्ये मधुबाला यांच्या बहिणीने सांगितले की, “मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते बीआर चोप्रा यांच्या ‘नया दौर’ सिनेमाच्या वेळी संपुष्टात आले. या सिनेमांचे बरेच शूटिंग झाले होते. मात्र, पुढचे शूटिंग ग्वालियरला होणार होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर डाकू असलेले क्षेत्र असल्याने मधुबाला यांच्या वडिलांनी त्यांना तिकडे पाठवण्यास मज्जाव करत मेकर्सला मुंबईतच शूट करण्यास सांगितले. पण मेकर्स यासाठी तयार झाले नाही, तेव्हा मधुबाला यांच्या वडिलांनी त्यांना हा सिनेमा सोडायला लावत पैसे परत करण्याचे ठरवले.”

Photo Courtesy : Screengrab: Youtube/sHEMAROO

“तेव्हा दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे चोप्रा यांनी दिलीप कुमार यांना मधुबाला यांच्यासोबत बोलण्यास सांगितले. दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना खूप समजावले. मात्र, त्या वडिलांविरुद्ध जाण्यास तयार झाल्या नाही, तेव्हा चोप्रा यांनी मधुबाला यांच्या विरोधात केस दाखल केली. ही केस १ वर्ष चालली, आणि दिलीप कुमार यांनी मधुबाला विरोधात साक्ष दिली, आणि त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली.”

“त्यानंतर दिलीप यांनी मधुबाला यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मधुबाला यांनी कोर्टातील साक्षीबाबत वडिलांकडे माफी मागायला सांगितले, पण दिलीप यांनी नकार दिला. आणि हे दोघ वेगळे झाले. असे असूनही मधुबाला या शेवट्पर्यंत दिलीप कुमार यांच्या प्रेमात राहिल्या,” असेही त्या पुढे म्हणाल्या.

मधुबाला खूप आजारी होत्या, तेव्हा आम्ही त्यांना, लंडनमध्ये उपचारासाठी नेण्याची तयारी करत होतो, तेव्हाच किशोर कुमार यांनी त्यांना प्रपोज केले. मधुबाला यांच्या वडिलांची इच्छा होती की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बरे झाल्यावर लग्न करावे. मात्र, दिलीप कुमार यांच्यावर राग असलेल्या त्यांनी १९६० मध्ये लगेच किशोर कुमार यांच्याशी लग्न केले,” असे दिलीप कुमार यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या.

“जेव्हा किशोर कुमार यांना समजले की, त्या जास्त काळ जगू शकत नाहीत, तेव्हा त्यांनी एक डॉक्टर आणि नर्सच्या भरवश्यावर सोडून ते कामात व्यस्त झाले. चार महिन्यांनी एकदा ते मधुबालाना भेटायला येत. मात्र, शेवटी त्यांनी देखील मधुबाला यांना धोकाच दिला. एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या मधुबाला यांना त्यांच्या अखेरच्यावेळी कोणी भेटायला देखील आले नव्हते. वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला,” असे मधुबाला यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल बोलताना त्यांनी म्हटले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा