मराठी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले आणि संवेदनशील दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश यांनी आजपर्यंत मराठीमध्ये अनेक आशयप्रधान आणि हिट चित्रपट तयार केले. त्यात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मातीच्या चुली, काकस्पर्श, नटसम्राट, कुटुंब, लालबाग परळ आदी चित्रपटाचा समावेश आहे. महेश यांनी मराठीसह हिंदीमध्ये देखील त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. याच महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा नुकताच दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला थोबाडीत मारल्याचा प्रकार समोर आला आहे.
कैलास सातपुते या व्यक्तीने महेश मांजरेकर यांच्या गाडीला माझ्या गाडीचा धक्का लागल्यावर त्यांनी मला शिविगाळ करुन थोबाडीत मारली, अशी तक्रार केली आहे. ही तक्रार पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महार्गावर ही घटना घडली आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला मागून येणाऱ्या मारुती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीने धडक दिली. त्यानंतर मांजरेकर यांनी गाडीतून खाली उतरत गाडीची पाहणी केली. त्यावेळी झालेल्या वादात मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन गालात मारल्याचा आरोप कैलास सातपुते या इसमाने केला आहे.
आपल्या पुढे गाडी चालवणाऱ्या महेश मांजरेकर यांनी अचानक गाडीचा ब्रेक मारला. त्यामुळे आपली कार त्यांच्या कारला मागून धडकली. त्यानंतर मांजरेकर यांनी ‘तू पिऊन गाडी चालवतो का’ असे म्हणत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन चापट मारली असे कैलास सातपुते या व्यक्तीने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ तक्रारदाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या अपघातानंतर ज्या व्यक्तीची गाडी मांजरेकर यांच्या गाडीला पाठीमागून धडकली होती, त्या व्यक्तीने गंभीर आरोप केले आहेत. ‘माझं खानदान कधी दारू पीत नाही, तर मांजरेकरांनीच दारूव्यतिरिक्त अंमली पदार्थाचे सेवन केले होते काय? याचा तपास पोलिसांनी करावा,’ अशी मागणी कैलास सातपुते यांनी केली असून यासंदर्भात ते कोर्टात जाणार आहेत.