Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

तुमच्या ‘या’ आवडत्या मराठी कलाकारांनी थाटलाय २०२१ मध्ये संसार, पाहा यादी

सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरूय. बॉलिवूडमधील अनेक मोठ-मोठे कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. मग अशामध्ये आपली मराठी सिनेसृष्टी कशी मागे राहील बरं. तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांनीही लग्नगाठ बांधली आहे. आपण अशाच काही मराठी कलाकारांबद्दल पाहणार आहोत, ज्यांनी २०२१ या वर्षात संसार थाटला.

नेहमीच आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना अडकवून ठेवणारी तसेच मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (sonalee kulkarni) सोनालीनं बऱ्याच मराठी सिनेमात काम केलंय. २००६ मध्ये तिनं तिच्या करियरची सुरुवात ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या सिनेमातून केली. हीच सोनाली यावर्षी लग्नबंधनात अडकली. ०७ मे, रोजी तिनं कुणाल बेनोडेकरसोबत संसार थाटला. कुणाल हा दुबईमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतो.

आपल्या अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे अभिज्ञा भावे (abhidnya bhave) नेहमीच चर्चेत असते. खरं तर सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अभिज्ञा एयर होस्टेस होती, हे तर सर्वांनाच माहित आहे, पण यापूर्वी तिचं लग्न झाल्याचं खूपच कमी जणांना माहितीये.अभिज्ञाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर २०१४ साली अभिज्ञा वरुण वैटिकरसोबत विवाहबंधनात अडकली होती. मात्र, काही कारणांमुळं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिज्ञानं मेहूल पैसोबत फोटो शेअर करत प्रेमात असल्याचं सांगितलं. अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. १५ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र, कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. ६ जानेवारी रोजी मुंबई येथे या दोघांच्या लग्नाची गाठ बांधली गेली.

‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून फेमस झालेल्या मानसी नाईकनं (manasi naik) लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. मानसीची खासियत म्हणजे ती एक उत्तम डान्सर आणि अभिनेत्री सुद्धा आहे. महेश कोठारेंच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. ‘बाई वाड्यावर या’ आणि ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांतून तिने मराठी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं. मानसीसुद्धा लग्नबंधनात अडकलीय. तिनं प्रसिद्ध बॉक्सर प्रदीप खरेरासोबत १९ जानेवारी रोजी संसार थाटला. कोरोनाचं संकट टळलं नसल्यानं योग्य ती काळजी घेत काही मोजक्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मानसीचा विवाहसोहळा पार पडला. अभिनत्री दिपाली सय्यद, रेशम टिपणीस यांच्यासह काही कलाकारांनीही मानसीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

‘बिल्लू बार्बर’ या हिंदी सिनेमात इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. (mitali mayekar) मितालीनं मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बाॅय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत २४ जानेवारी रोजी पुण्यातील ढेपे वाड्यात लग्न केलं. ते दोघेही २ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

‘शनाया’ या चंचल, नटखट आणि बिनधास्त पात्राने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. (rasika sunil) सर्वांची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील १८ ऑक्टोबर रोजी बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नबंधनात अडकली. अनेक महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनबाबत चर्चा चालू होत्या. तसेच त्यांनी सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यातून त्यांच्या अफेअरची सर्वांना चाहूल लागली होती. त्यांच्यातील बॉंडिंग पाहून चाहत्यांना देखील त्यांची जोडी खूप आवडायला लागली होती. परंतु त्यांनी कोणालाही कल्पना न देता लग्न केले आणि १५ दिवसांनी अधिकृतरीत्या ही माहिती सर्वांना दिली.

मराठी सिनेमा खासकरून मालिकांमधील सर्वांचा लाडका आणि प्रसिद्ध अभिनेता अशी ओळख असणाऱ्या सुयश टिळकने खूपच कमी काळात स्वतःचं मोठं प्रस्थ निर्माण केलं. विशेषतः मुलींच्या गळ्यातील ताईत झालेल्या सुयशनं डान्सर आणि अभिनेत्री असलेल्या आयुषी भावेसोबत २१ ऑक्टोबर रोजी लग्न केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेता संतोष जुवेकरने उघडली अभिनयाची शाळा, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?

अनुषा अन् करणचं ३ वर्षांचं गोड नातं ‘या’ कारणामुळे एका झटक्यात झालं कडू

हे देखील वाचा