Friday, August 8, 2025
Home मराठी ‘कुठे चाललो आहोत आपण?’, चित्रपटांवरुन द्वेष पसरवणाऱ्यांवर विजू माने यांची संतप्त प्रतिक्रिया

‘कुठे चाललो आहोत आपण?’, चित्रपटांवरुन द्वेष पसरवणाऱ्यांवर विजू माने यांची संतप्त प्रतिक्रिया

सध्या भारतीय चित्रपट जगतात वास्तववादी चित्रपट तयार करण्याची जणु स्पर्धाच लागली आहे. हिंदी चित्रपटसृष्टी म्हणा किंवा मराठी सिनेसृष्टी म्हणा, एकापेक्षा एक नाविण्यपुर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र या चित्रपटांच्या कथांमुळे देशात सध्या वाद विवादाच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. यामध्ये ‘पावनखिंड’, ‘झुंड’ आणि ‘द काश्मिरी फाइल्स’ या बहुचर्चित चित्रपटांनी चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र या चित्रपटावरुन सध्या दोन गट पडल्याचे दिसत आहेत. काही लोक ‘झुंड’ चित्रपटाला जातियवादाचे लेबल लावत आहेत, तर काही लोकांनी ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाला असत्य कथा रंगवल्याचा आरोप केला आहे. लोकांच्या याच वृत्तीवर प्रसिद्ध दिग्दर्शक विजु माने (Viju Mane) यांनी सडकून टीका केली आहे.

दिग्दर्शक विजू माने आपल्या चित्रपटांइतकेच सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. देशात चालू असलेल्या अनेक मुद्द्यांवर ते आपले परखड मत मांडताना दिसत असतात. सध्या त्यांची फेसबूकवरील एक पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘पावनखिंड’, ‘झुंड’ आणि ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी देशातील लोकांच्या या विचार सरणीवरही चिंता व्यक्त केली आहे.

या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “कुठे चाललो आहोत आपण? सध्या जाती धर्माच्या भिंती आणखी मजबूत करण्याचं जे काम सुरु आहे ते पाहून हाच प्रश्न माझ्या सारख्याच्या मनात येतो.  कुठे चाललो आहोत आपण ? पावनखिंड विरुध्द झुंड विरुध्द काश्मीर फाईल्स ? ही कोणती द्वेषाची लढाई लढता आहात? काय मिळणार आहे असं करुन ? मी स्वतःला उजवा डावा पुरोगामी वगैरे मानत नाही. मी माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य देणारा आहे. एक चित्रपट बनतो त्यावर अम्मुक एका जातीचा शिक्का लावण्यापेक्षा  तो फक्त चित्रपट म्हणून का पाहिलं जात नाहीये ? सिनेमा म्हणून जर आवडला नाही तर तो प्रत्येकाच्या आवडी निवडीचा भाग आहे असं समजून त्यांच्या मताचा आदर का केला जात नाही ? शोले चित्रपट न आवडणारी  माणसं आहेतच कि, फक्त त्यांनी जय विरू आणि गब्बरची जात नव्हती पाहिली.  ‘मेरे देश कि धरती सोना उगले’ हे गाणं ऐकलं नाही तर तू देशभक्त नाहीस असा शिक्का नव्हता मारला. कुठून आलंय हे सगळं हे तुम्हालाही नीट  कळत असेल. चिथावाणाऱ्या पोस्टचं प्रोफाईल अनेकदा लॉक असतं. त्यांच्या एखाद दोन पोस्ट visible असतात. अर्थात ती अस्तित्वातली व्यक्ती नसतेच.  शेवटी आयटी सेल हा काही आता एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी राहिली नाही. जशास तसे उत्तर देणारे इकडेही होते आणि तिकडेही होते. आता मात्र पाणी डोक्यावरून गेलंय. विष पेरणारे इथेही आहेत आणि तिथेही, जे माझ्या मते रशिया युक्रेन युध्दाहून भयानक आहे. जातीचा आणि धर्माचा अभिमान असायलाच हवा, तो दुराभिमान आणि द्वेष बनला की त्याचं विष बनतं. अमुक एका जातीत किंवा धर्मात जन्माला आलोय ह्यात माझं कर्तृत्व काय? आणि माझ्या जाती धर्माचा अभिमान बाळगताना इतर जाती धर्मांना तुच्छ किंवा अन्यायकारी ठरवण्याचा अधिकार मला कोण देतं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याबद्दल पुढे बोलताना ते म्हणतात की, “आता फक्त काही जणांनी बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. ज्यांना हे विचार पटतात त्यांनी आता एकत्र यायला हवं, आपल्या मुलभूत हक्कांवर आता बोलायला हवं. आपल्या आदर्शांना वाटून घेण्यापेक्षा त्यांचे विचार वाटुन घेऊया. जाती धर्मांच्या विखारी पोस्ट पासून स्वतःला लांब ठेवूया. बदल शक्य आहे, त्याची सुरूवात फक्त आपल्यापासून करुया असे आवाहन त्यांनी केले आहे.”

सध्या त्यांच्या या परखड, स्पष्ट भाष्य करणाऱ्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या पोस्टवर अनेक दिग्गज कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा